मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील वनस्पती संपदेत दुरंगी माकडशिंगी या नव्या वनस्पतीची भर पडली आहे (Caralluma bicolor). लातूरमध्ये आढळलेल्या या वनस्पतीची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद आहे (Caralluma bicolor). ही वनस्पती दक्षिणेकडील राज्यात आहे असे समजले जात होते. (Caralluma bicolor)
दुरंगी माकडशिंगी या वनस्पतीला सामान्यतः शिंदळमाकडी म्हणूनही ओळखले जाते. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही वनस्पती आढळली. दुर्मीळ वनस्पतीचा अभ्यास करणारेशिवशंकर चापुले, प्रा. जय पटवारी आणि मिलिंद गिरधारी यांना एका वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षणात ही दुरंगी माकडशिंगी आढळून आली. या वनस्पतीचे संवर्धन कार्य हाती घेण्याचा मनोदय जळगाव येथील वनस्पतीशास्त्राचे प्रा. तन्वीर खान आणि रेवन चौधरी यांनी व्यक्त केला आहे . ही वनस्पती शुष्क डोंगराळ वा खडकाळ भागात आढळून येते. अधिवास नष्ट होणे, अतिशोषण या कारणामुळे ती दुर्मिळ झाली आहे. माकडशिंगी ही वनस्पती मूळव्याध, पित्त, मधुमेह यावर गुणकारी आहे.
ही वनस्पती एक क्षूप असून खोड मांसल असते. ती टायगर प्रजातीच्या फुलपाखराची खाद्य वनस्पती आहे. तिची उंची एक फूटापर्यंत वाढते आणि तिला फुटवे फुटून बेट निर्माण होते. शिवाय फळधारणा होऊन जोडीने शेंगा येतात. शेंगा वाळल्यानंतर आतील बिया रेशीम धाग्यांच्या रूपात पंख असल्याने हवेत उडून प्रसारित होतात. या वनस्पतीचा महाराष्ट्रातील आढळ हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. ही वनस्पती कोरड्या आणि उष्ण हवामानात वाढते असल्यमुळे ती महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागांमध्ये अनुकूल ठरू शकते. यामुळे स्थानिक जैवविविधतेत नवीनता येऊ शकते आणि वनस्पतीशास्त्रज्ञांसाठी अभ्यासाच्या नवीन संधी निर्माण होऊन भविष्यातील संशोधनासाठी नवीन दिशा मिळू शकते.