होऊ दे खर्च...

    01-Nov-2022   
Total Views |
 
अरविंद केजरीवाल
 
 
 
 
 
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवालांना सध्या दिल्ली, पंजाबनंतर गुजरात काबीज करण्याची दिवास्वप्न पडू लागली आहेत. पंजाब आणि दिल्लीत ‘आप’ने काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले. पण, गुजरातमध्ये ते इतके सोपे नाही. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भाजप इथे सत्तेत आहे. एवढं सगळं माहीत असूनही दिल्लीचा कारभार हाकण्याऐवजी तेथील जनतेला वार्‍यावर सोडून केजरीवाल गुजरात पिंजून काढत आहेत. केजरीवालांचा खोटेपणा उघड करणारी एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. पंजाबमधील ‘आप’ सरकारवर आता केवळ जाहिरातींसाठी फेसबुकला तब्बल 2 कोटी, 27 लाख रुपये दिले गेल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा खर्च केवळ मागील एक महिन्याचा असल्याचे बोलले जात आहे. यापैकी सर्वाधिक खर्च हा गुजरात विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवून करण्यात आला. भाजपचे ‘आयटी सेल’ प्रभारी अमित मालवीय यांनीदेखील पंजाब सरकारवर जनतेच्या पैशांचा दुरूपयोग केल्याचा आरोप लावला आहे.
 
 
 
ते म्हणाले की, “मागील एका महिन्यात पंजाबमधील ‘आप’ सरकारने फेसबुकच्या जाहिरातींसाठी 2 कोटी, 27 लाख रुपये खर्च केले आहे. यापैकी 1 कोटी, 58 लाख रुपये म्हणजेच जवळपास 69 टक्के पैसा गुजरातच्या निवडणुका समोर ठेवून करण्यात आला.” म्हणजेच गुजरात निवडणूक समोर ठेवून प्रचार करण्यासाठी पंजाबच्या जनतेला भुर्दंड कशाला, हा जनतेच्या पैशांचा दुरूपयोगच म्हणावा लागेल. पंजाब सरकारच्या फेसबुक पेजवरील ‘विज्ञापन लायब्ररी’नुसार पंजाब सरकारने दि. 2 ऑक्टोबरपासून जाहिराती प्रसारित करायला सुरुवात केली. दि. 29 सप्टेंबर ते दि. 28 ऑक्टोबर दरम्यान फेसबुकला फक्त जाहिरातींसाठी तब्बल 2 कोटी, 37 लाख, 35 हजार, 527 रुपये देण्यात आले आहे. या कालावधीत एकूण 136 जाहिराती प्रसारित करण्यात आल्या. म्हणजे, सरासरी प्रत्येक जाहिरातीमागे 1 लाख, 74 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. मागील आठवड्यात म्हणजेच दि. 22 ऑक्टोबर ते दि. 28 ऑक्टोबर दरम्यान, पंजाब सरकारने 33 जाहिरातींसाठी तब्बल 91 लाख, 38 हजार, 39 रुपये खर्च केले. त्यामुळे दुसर्‍यांना ‘इव्हेंटबाज’ म्हणणारे आता कोणत्या स्तराला पोहोचले आहेत, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
 
 
 
मोरबी दुर्घटनेवरून राजकारण
 
 
 
गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 141 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेवेळी पुलावर 400 हून अधिक जण उपस्थित होते. पूल कोसळल्यानंतर अजूनही जवळपास 200 हून अधिक जण बेपत्ता आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली. परंतु, त्यावरही आता राजकारण सुरू झाले आहे. त्यातच गुजरात विधानसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राजकारणाला तर आणखी उत आला आहे. अनेक अफवा पसरवल्या जात असून एका आघाडीच्या ‘न्यूज पोर्टल’ने याठिकाणी छटपूजा साजरी करण्यासाठी नागरिक जमले असल्याची अफवा पसरवली. अफवा पसरवण्यास ‘आम आदमी पार्टी’चे नेतेही हातभार लावत आहेत. ‘आप’ नेते नरेश बालियान यांनी एका ‘न्यूज पोर्टल’ची बातमी शेअर करत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. नंतर झालेल्या गोंधळानंतर या ‘न्यूज पोर्टल’ने बातमीच्या शीर्षकात बदल केला. एवढेच नव्हे, तर घटनेच्या एक दिवस आधी अनेक आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी शंकास्पद ट्विट केले होते.
 
 
 
 उद्या भाजपची कब्र खोदली जाईल, गुजरातच्या राजकारणात दोन मोठे धमाके होणार, भाजपच्या पायाखालची जमीन सरकरणार असल्याचे अनेक ट्विट्स करण्यात आले. त्यामुळे या दुर्घटनेमागे काही कारस्थान तर नाही ना, असाही प्रश्न निर्माण होतो. ही घटना थांबवता येणे शक्य होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही तरुण पुलावर चढून जोरजोराने हलवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू झाले. परंतु, इतके योगायोग जुळून येणे हीदेखील विचार करण्याजोगी गोष्ट आहे. काँग्रेस आणि ‘आप’ने गुजरात विधानसभेसाठी आपला प्रचार सुरू केला आहे. केजरीवाल तर गुजरातेत तळ ठोकून आहेत. पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनास्थळाचा दौरा केला. तसेच, त्यांनी या दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूसही केली. मात्र, काँग्रेसने मोदींच्या या दौर्‍यावरदेखील टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी हा दौरा ‘इव्हेंट’बाजीचा प्रकार असल्याचा आरोप केला. त्यामुळे दुर्घटनेत सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असताना तिथे ‘आप’ आणि काँग्रेसकडून मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारणाचे खेळ रंगवले जात आहेत, जे अतिशय दुर्दैवी आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.