उरलो उपकारापुरता..

    27-Oct-2022   
Total Views |
mansa



जयंत दांडेकर उर्फ तात्या दांडेकर. धर्म आणि समाजासाठी स्वतःपासून सुरुवात करावी अशा आग्रही मताचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा इथे घेतलेला मागोवा...

जयंत दांडेकर हे एक सामाजिक आणि धार्मिक व्यक्तिमत्त्व. ‘माऊली पांडुरंग चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक, गेली 25 वर्षे आळंदी-पंढरपूर यात्रा आयोजित करतात. गेली अनेक वर्षे ‘माऊली उत्सव’ शिबिराचेही ते आयोजन करतात. दापोली येथे ‘पांडुरंगाचे राज्य’ नावाचे एक छोटेसे विश्वही त्यांनी निर्माण केले होते. मूळचे हर्णे, दापोली गावचे असणारे तात्या, अत्यंत धार्मिक चित्पावन ब्राह्मण कुटुंबातले.

वडील शेतकरी, तर आई गृहिणी; पण घरी खाणावळ चालवायची. तरीही घरची गरिबी. वयाच्या चौथ्या वर्षापासून जयंत यांनी गावचा कोंडवाडा सांभाळायचे काम केले. मोकाट पशूंना इथे बांधून ठेवायचे. त्यांचा चारापाणी करायचे. मूळ मालक आले की,त्यांना शुल्क घेऊन ते पशुधन परत द्यायचे असे ते काम. लहानपण कष्टातच गेले. तसे ते अभ्यासात हुशार. भरपूर कष्ट करून भरपूर पैसे कमवायचे, असे त्यांना लहानपणापासूनच वाटे. कारण, आजूबाजूचे गरिबी आणि कष्टाचे वातावरण. त्यामुळे जुनी दहावी झाल्यानंतर ते मुंबईत आले.

नातेवाईकांकडे राहून एका कंपनीत काम करू लागले. ते करता करताच घाटकोपर येथे भिक्षुकी करत. संध्याकाळी घाटकोपर स्टेशनसमोर बिस्कीट, चॉकलेट, गोळ्या विकण्याची गाडी लावत. कष्टाचे चीज होतेच. त्यांचेही झाले अन् आर्थिक स्थिती बदलली.

मात्र, लहानपणापासून त्यांचे मन भजन-कीर्तनामध्ये रमायचे. एकदातरी आयुष्यात पंढरपूरची वारी करावी, अशी त्यांची इच्छा होती. वयाच्या 46व्या वर्षी तसा योगही जुळून आला. महाराष्ट्राच्या गावखेड्यातून जमलेले लाखो श्रद्धाळू तहानभूक सगळे विसरून आहे त्या परिस्थितीत पदयात्रेत सामील झालेले. तात्याही अशाच एका दिंडीत सामील झाले. मात्र, आपण लाखो श्रद्धाळू भक्तांइतके दैववान नाही, दिंडीतही दैनंदिन सोयीसुविधा नसतील, तर आपल्याला त्रास होतो हे त्यांना समजले.

योगायोग म्हणा, पण त्यानंतर सुखवस्तू घरातील अनेक लोकांनी त्यांच्या मनातली सल तात्यांना सांगितली की, ”त्यांनाही दिंडीत सामील व्हायचे आहे. मात्र, वयोमानाप्रमाणे पदयात्रा किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर किंवा कशीही निवास व्यवस्था यामुळे त्यांना त्रास होणार म्हणून ते दिंडीला जात नाहीत. मात्र, मृत्यूपूर्वी एकदा तरी त्यांना दिंडीला जायचे आहे.” तात्यांनी मग विचार केला की, अशा सगळ्या व्यक्तींसाठी दिंडीचे आयोजन केले तर? ज्यात ज्येष्ठ नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील आणि ते अगदी आरामात दिंडीला जाऊ शकतील.

ज्येष्ठांचा विचार करून अंतरंग पांडुरंगाच्या भक्तीचे आणि भेटीच्या ओढीचे असेल, अशी दिंडी आयोजित करायला हवी. त्यामुळे तात्यांनी ‘दांडेकर दिंडी’चे आयोजन केले. दिंडीला यंदा 25 वर्षं पूर्ण झाली. तात्याही आता निवृत्त झाले. त्यावेळी कुटुंंबासोबत ते ठाण्याला राहायचे. मात्र, निवृत्तीनंतर त्यांनी दापोलीला ‘पांडुरंगाचे राज्य’ नावाची संकल्पना वास्तवात आणली. इथे लोक काही दिवस राहून भक्तिमय, शांतीमय जीवन जगतील असा त्यामागचा हेतू. दहा वर्षे त्यांनी यासाठी कामही केले. मात्र, नंतर कोरोनाचा कहर आला. तात्यांनाही कोरोना झाला. त्यामुळे पुन्हा ते ठाण्याला परतले. या सगळ्या धकाधकीत ते ‘माऊली उत्सव’ शिबिराचे आयोजन करतात.


तात्यांच्या मते, विज्ञानामुळे भौतिक प्रगती झाली आहे, मात्र मानसिक शांती हरवली आहे. ती शांती मिळवून देण्याचे काम हे शिबीर करते.तात्या ही अजब वल्ली. त्यांनी वडिलोपर्जित संपत्तीवर तुळशीपत्र ठेवले आणि अगदी शून्यातून संपत्ती निर्माण केली. ठाण्याला घर घेतले. ऑफिस घेतले. मूलं मोठी झाल्यावर त्यांना राहायला घर आणि ऑफिसही दिले, मात्र भाड्याने. कारण, मुलांना कष्टाचा हिशोब समाजावा. भाडे येते, त्याचे तात्या काय करतात? तर ते समाजकार्यासाठी उपयोगात आणतात. एक आठवण म्हणजे, तात्या ठाण्याला स्थिरस्थावर झाले. पहिल्याच वर्षी घरात त्यांनी एकादशीला भजन-कीर्तन केले. मात्र, सोसायटीतल्या एका व्यक्तीने यावर आक्षेप घेतला. काय भजन-कीर्तनं करायची ती समोरच्या झोपडपट्टीत करा, असे सांगून तो भांडू लागला.


तात्यांनी खरच सोसायटीच्या समोरील झोपडपट्टीतील मुलांना एकत्र केले. दररोज संध्याकाळी त्यांच्यासोबत भजन- कीर्तन आणि संस्कारवर्गच सुरू केले. दर एकादशीला ठाणे भास्करनगर ते येऊरपर्यंत ते या मुलांची दिंडी काढत असत. 18 वर्षे ही दिंडी सुरू होती. या परिसरात हनुमानाचे मंदिर आणि प्रभू श्रीरामाचेही मंदिर आहे. मूल आणि नागरिक या दोन्ही मंदिरांची उत्तम देखरेख ठेवू लागले.



कधी नव्हे तो तेव्हापासून आजतागायत इथे हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. इतकेच काय तर आषाढी एकादशीला भंडाराही आयोजित केला जातो. त्यापूर्वी या वस्तीत असे काही सामुदायिक भक्तीपूर्ण वातावरण नव्हते.पण, तात्यांनी काही दशकांपूर्वी सुरू केलेल्या वस्तीतली दिंडी आणि भजन-कीर्तन यामुळे वस्तीचे रूप पालटले. बीज छोटेच असते, पण त्यापासून निर्माण होणारा वटवृक्ष विराट असतो. तसेच तात्यांचे कार्य प्रत्येक स्तरावर बीजस्वरूपात असेल, पण त्याची निर्मिती आणि परिणाम समाजासाठी भव्यच आहेत. तात्यांना विचारले “पुढे काय?” तर ते म्हणतात, “उरलो उपकारापुरता...”



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.