अमेरिकन हिंदू वाघिणीचा एल्गार

    13-Oct-2022   
Total Views |

तुलसी गॅबार्ड 
 
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या जो बायडन यांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेने घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळेही बायडन यांच्याविरोधात अमेरिकेत मोठा रोष पाहायला मिळाला. त्यातच अमेरिकेत बायडन आल्यापासून वर्णद्वेषाला खतपाणी घातले जात असल्याचाही आऱोप केला जातो. त्याचाच परिपाक म्हणून नुकतेच अमेरिकेतील पहिल्या हिंदू महिला खासदार तुलसी गॅबार्ड यांनी बायडन यांच्या नेतृत्वाखालील डेमोक्रॅटिक पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
 
 
पक्षावर वंशवादाचा आरोप करत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. समाजमाध्यमांवर त्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पक्ष सोडण्याची घोषणा केली. “मी डेमोक्रॅटिक पक्षात यापुढे राहू शकत नाही. हा पक्ष भ्याड असून देशाच्या प्रत्येक मुद्द्याला जातीयवादाचे रूप देऊन फूट पाडतो. हा पक्ष काही उच्चभ्रू लोकांच्या ताब्यात गेला असून ते वंशवादाला प्रोत्साहन देऊन लोकांना भडकावण्याचे काम करतात,” असा आरोप गॅबार्ड यांनी बायडन आणि पक्षावर केला आहे. माझा विचार ज्यांना मान्य असेल अशा अन्य लोकांनीही पक्ष त्वरित सोडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
 
 
अमेरिकेतील लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा अवमान केल्याबद्दल डेमोक्रॅटिक पक्षावर गॅबार्ड यांनी जोरदार टीका करत बायडन सरकार एक शक्तिशाली खानदानी सरकार असल्याचे म्हटले आहे. युक्रेन-रशिया युद्धादरम्यान अमेरिकेच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. युक्रेन मदतीसाठी अमेरिकेकडे आस लावून बसला. परंतु, त्यांना अमेरिकेने सकारात्मक प्रतिसाद सोडा, परंतु साधा मदतीचा हातदेखील पुढे केला नाही. त्यामुळे बायडन यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेत उजवी विचारसरणी जोर धरून होती. बायडन आल्यानंतर हिंदू धर्माविषयीचा आकस स्पष्ट समोर येऊ लागला. गॅबार्ड यांचाही हाच आक्षेप.
 
 
गॅबार्ड यांनी वयाच्या 21व्या वर्षी ‘स्टेट हाऊस’साठी त्यांनी निवडणूक लढवली होती. 2013 साली हवाईमधून ‘युएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या हिंदू होत्या. विशेष म्हण्जे, हवाईमधून त्या चार वेळा खासदार राहिल्या आहेत. अमेरिकेत जन्म होऊनही त्या हिंदू संस्कृती विसरलेल्या नाहीत. अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार होण्याचा मान मिळवलेल्या गॅबार्ड यांनी 2013 साली पवित्र भगवद्गीतेवर हात ठेवून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’चे अध्यक्ष जॉन बोहेनर यांनी त्यांना शपथ दिली होती. दोन वर्षांपूर्वी हिंदू विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ला त्यांनी संबोधित केले होते.
 
 
या भाषणात त्यांनी, कठीण काळात भगवद्गीतेतून शक्ती आणि शांती मिळते. भक्ती, योग आणि कर्मयोगाच्या सरावाने शक्ती आणि शांती मिळवता येते, असे सांगितले. त्याचप्रमाणे शिकागोतील ’काली बारी’द्वारे आयोजित सरस्वती पूजेलाही त्या उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी संसदेत जाणारी पहिली हिंदू असल्याचे अभिमानाने सांगितले. यावेळी त्यांनी अमेरिकेत हिंदू समाजाकडून करण्यात येत असलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गॅबार्ड यांना काही अमेरिकन माध्यम संस्थांनी आणि लोकांनी ’हिंदू’ असल्याबद्दल लक्ष्य केले होते, जेव्हा त्यांना वारंवार ’हिंदू-अमेरिकन’ म्हणून दाखवले जात होते. जणू काही हिंदू असणे गुन्हा आहे, अशा पद्धतीने त्यांना ट्रोल केले जात होते. अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या तुलसी या पहिल्या हिंदू महिला आहेत.
 
 
 
त्यांना हिंदू-अमेरिकन म्हणून हिणवण्यात आले. केवळ धर्म हिंदू असल्यामुळे त्यांना अमेरिकन राजकारणात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धार्मिक भेदभाव सहन करावा लागला. परंतु, असे असले तरीही अमेरिकेतील या हिंदू वाघिणीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. 2014 साली देशात मोदी लाटेने सत्तांतर घडले. मोदींनी संपूर्ण विश्वात भारताची हरवत चाललेली ओळख पुन्हा एकदा जीवंत केली. त्यामुळे जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक ताठ कण्याने भारतीय म्हणून आपले वर्चस्व दाखवून देत आहे. अमेरिकेतही गॅबार्ड यांनी हिंदू असल्याचा अभिमान बाळगत बायडन यांच्याशी पंगा घेतला. हिंदू हितासाठी आग्रही आणि हिंदूभिमानी असलेल्या या वाघिणीचे कौतुक करावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.