पवारांचे फसवे चिन्हसंकेत...

    11-Oct-2022   
Total Views |

Sharad Pawar
 
 
 
राज्यातील अभूतपूर्व अशा सत्तानाट्यानंतर अखेर फडणवीस-शिंदे यांनी जनादेशाचा सन्मान करणारे सरकार राज्यात स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी लोकांच्या भावनांशी आणि त्यांच्या मताधिकाराशी खेळणार्‍या उद्धव ठाकरेंना चारी मुंड्या चित करत खरी शिवसेना कुणाची, हे दाखवून दिलेच. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयाच्या दरबारी गेले आणि तिथेही एकनाथ शिंदे यांनीच बाजी मारली. आता चिन्ह आणि पक्षाचे नाव यावरून संघर्ष सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हच गोठवून टाकले. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटात नाव आणि चिन्हासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
 
 
परंतु, या सगळ्या संघर्षामध्ये शरद पवार मात्र ‘मी त्यातला नाहीच’ असे दाखवण्याचा खटाटोप करताना दिसले. “निवडणूक चिन्ह गेल्याने काहीही फरक पडत नसून, असे होईल याची खात्री होतीच,” असे पवारांनी म्हटल्याने शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. पवार म्हणाले की, “मी स्वतः पाच चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकली. सुरुवातीला बैलजोडी चिन्हानंतर गायवासरू, चरखा, हाताचा पंजा आणि आता घड्याळ अशी चिन्हांवरही निवडणुकीत जिंकलो. त्यामुळे सेनेचे निवडणूक चिन्ह भले गोठवले असेल. परंतु, त्याचा शिवसेनेला काही फरक पडत नाही,” असा दावा पवारांनी केला. पवारांच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे असले तरीही पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून कशी आणि का माघार घेतली, हे वेगळे सांगायला नको.
 
 
ठाकरेंच्या या जखमेवर मीठ चोळणार्‍या पवारांच्या वक्तव्यावर मात्र शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पवार ‘बर्मुडा ट्रँगल’ असून 2014 पासून त्यांना शिवसेना संपवायची होती, अशा शब्दांत शिवतारे यांनी पवारांवर टीका केली. मुख्यमंत्री पद देऊन सगळी महत्त्वाची पदे पवारांनी राष्ट्रवादीकडे ठेवली. 2014 सालीदेखील भाजपला न मागता पाठिंबा देऊन शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी साथ सोडल्यानंतरही पवार उद्धव यांना पाठिंबा देत राहिले आणि उद्धव आणि शिंदे यांच्यातील दरी आणखी वाढली.
 
 
काही दिवसांपूर्वीच भाषणाच्या मुद्द्यांवरून पवारांचे पुतणे अजितदादा भर व्यासपीठावरून निघून गेले होते. इकडे सुळेताई आणि अजितदादांमधील रूसवे फुगवे दूर करण्याची गरज असताना पवारांना ठाकरेंची चिंता आहे, तीही बनावटी. अशा बेभरवशाच्या स्वभाव अन् भूमिकांमुळेच साहेब कायम ‘भावी पंतप्रधान’च राहिले, हेच खरे.
 
 
 
नवी ‘ऑपरेशनल ब्रँच‘
 
 
 
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतीय हवाई दलाला प्रथमच एक नवी ‘ऑपरेशनल ब्रँच’ मिळाली आहे. केंद्र सरकारने या ब्रँचच्या स्थापनेला नुकतीच मंजुरी दिली. भारतीय हवाईदलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी हवाई दल दिनाच्या दिवशी एका कार्यक्रमात याविषयी माहिती दिली. या नव्या ‘ऑपरेशनल ब्रँच’ला मिळालेल्या मंजुरीचे अनेक फायदे आहेत. सरकारच्या ‘फ्लाइंग ट्रेनिंग’च्या खर्चात यामुळे मोठी कपात होईल. त्यामुळे तब्बल 3 हजार,400 कोटी रुपयांच्या महसुलात बचत होणार आहे. नव्या ब्रँचसह ‘कॉम्बॅट युनिफॉर्म’ मिळणार असून एअर चीफ मार्शल यांनी नव्या गणवेशाचेदेखील सादरीकरण केले.
 
 
वेपन सिस्टम ब्रँच जमिनीवरून जमिनीवर व जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांसह रिमोट पायलट ‘एअरक्राफ्ट’ व ट्विन तथा ‘मल्टी क्रू एअरक्राफ्ट’चे संचलन करणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. लष्कराच्या गणवेशासारखा असलेला भारतीय हवाई दलाच्या नव्या गणवेशाचा ‘डिजिटल’ पॅटर्न सर्वच भागांसाठी अनुकूल आहे. वाळवंट, डोंगराळ भाग, जंगल यांसारख्या भागांसाठी हा गणवेश अनुकूल असून ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी’ने (छखऋढ) तो डिझाईन केला आहे. भारतीय हवाई दल जगातील चौथ्या क्रमांकाचे ‘ऑपरेशनल एअर फोर्स’ म्हणून ओळखले जाते. ज्याची प्रचिती आपल्याला पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून कळली. हा पंतप्रधान मोदींचे युग असलेला भारत आहे. त्यामुळे भारताची हवाई शक्तीदेखील दिवसेंदिवस मजबूत करण्यावर मोदींचा भर आहे.
 
 
 
मागील महिन्यात हवाई दलाचा ध्वजदेखील बदलण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची प्रेरणा समोर ठेवून निश्चित केलेल्या नव्या ध्वजाचे अनावरण पार पडले. मोदी सरकारच्या काळात हवाई दलात महिलांचा समावेश वाढला. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये हिंडन एअरफोर्स स्टेशन आशियातील सर्वांत मोठे ‘एरअरबेस’ म्हणून ओळखले जाते. हे ‘एअरबेस’ जगातील आठवे सर्वात मोठे ‘एअरबस’ मानले जाते. दरम्यान, भारतात आता लढाऊ विमानांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य ‘नभं स्पर्शं दीप्तम्’ हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातून घेतलेले बोधवाक्य सार्थ ठरवण्यासाठी मोदी सरकार तत्पर आहे. नवी ‘ऑपरेशनल ब्रँच’ त्याचाच एक भाग म्हणावी लागेल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.