तुमचे शिक्षण तुमची जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2021   
Total Views |

Varsha Gaikwad _1 &n
 




लोकांना काही कामच नाही! राज्य सरकारने एखादा निर्णय घेतला की, त्यावर उलटपालट बोलल्याशिवाय त्यांचे भागतच नाही. आता हेच बघा ना, एकदाच्या शाळा सुरू होणार आहेत. बारावीपर्यंत महाविद्यालयेही सुरू होणार आहेत. लोकांनी हा निर्णय शांतपणे ‘एन्जॉय’ करावा ना! कारण, हा निर्णय कधी क्षणात बदलेल, हे कुणीही सांगू शकत नाही. पण या निर्णयावर काही जळके लोक मत मांडत आहेत की, बारावीच्या पुढे पदवीपर्यंतची महाविद्यालये का सुरू होणार नाहीत? बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोरोना होत नाही का? की बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांनाच कोरोना आपला शिकार बनवतो. तसेच या लोकांचे म्हणणे आहे की, अजून मोठ्यांना, पालकांनाच कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले नाहीत. लहान बालकांना आणि १८ वर्षांच्या आतील युवक-युवतींना कुठून हे डोस मिळणार? त्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे कोरोनाची लस घेतली नसतानाही या लहान विद्यार्थ्यांची शाळा उघडण्याचे कारण काय असावे? संभाव्य तिसरी लाट लहान मुलांवर येणार, अशी गेले वर्षभर हाकाटी पिटली गेली. यथासांग त्यावर परिसंवाद आणि चर्चासत्रेही झडली. तिसरी लाट बालकांवर पण प्रशासन सज्ज अशा बातम्या रकाने भरून लिहिल्या गेल्या. यामध्ये एकही प्रसारमाध्यम मागे नव्हते. पण सुदैवाने तसे काही भारतात घडले नाही. या अनुषंगाने राज्यात कोरोना आणि लहान मुलांचे आरोग्य, लसीकरणाबद्दल काय भूमिका आहे? आरोग्य खाते किंवा शिक्षण खाते यासंदर्भात काही स्वत: जबाबदारी घेणार आहे का, याबद्दल काही स्पष्टीकरण आहे का? तसेही एखादा निर्णय घेताना सर्व खात्याचे मंत्री एकत्रित विचारविनिमय करत असतील का? याबद्दल जनतेला शंका आहेच. आता यावरही लोक म्हणतात की, ‘मिल बाट के’ खाण्याची संस्कृती यांना कुणीही शिकवू नये. फक्त जनतेच्या भल्याचे निर्णय घेताना ‘मिल बाट के’ निर्णय घेणे यांना जमत नाही. त्यामुळेच शाळा सुरू झाली तर लहान मुलांच्या आरोग्याबाबत काय काळजी घेतली जाईल, यावर लोकांनी राज्य सरकारला प्रश्न विचारू नये. कारण, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा सरकारचा मंत्र आहे. अख्खा कोरोना काळ सरकारने या मूलमंत्राचा जागर केला. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्यावर तुमचे शिक्षण तुमची जबाबदारी, तुमचे आरोग्य हीसुद्धा तुमची जबाबदारी. बाकी उर्वरीत एफबी लाईव्ह येऊन काहीही बोलणे ही यांची जबाबदारी...
 

शांतीवर ज्ञान देतेय कोण?

 
’पंतप्रधान मोदी माझ्यावर जळतात’ म्हणून त्यांनी मला रोमला जाण्याची परवानगी दिली नाही, इति ममता बॅनर्जी. ममताबाईंचे बोलणे ऐकून त्यांच्या एकंदर स्वभाव आणि बुद्धीचीही कुवत कळली. भारतीय राजकारणात आणि जगभरात मोदींना मान आहे. मोदींसारखेच आपणही अतिशय लोकप्रिय आहोत, हे सांगण्यासाठी भारतातले अनेक भावी पंतप्रधान काही ना काही सोंग करत असतात. त्यापैकीच ममतांचे हे एक सोंग आहे. संपूर्ण देशाचे पंतप्रधान असलेली व्यक्ती स्वत:च्या मतदारसंघात निवडणूक हरलेल्या व्यक्तीची ईर्ष्या करू शकते, हा अजब शोध ममता यांनी लावला आहे. रोममध्ये एका स्वयंसेवी संस्थेने ‘विश्वशांती’ विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. त्यामध्ये म्हणे ममता बॅनर्जींना आमंत्रित केले आहे. ममता अशा कोणत्या हुशार, बुद्धिमान, अभ्यासू, तत्त्ववेत्या आहेत की, त्या विश्वशांतीवर चिंतनपर तत्त्वज्ञान सांगतील? प.बंगालमध्ये किती निष्पापांचा खून झाला, याची गणती नाही. सत्तेचा प्याला भरण्यासाठी किती लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले याबद्दल न बोललेले बरे. या सगळ्यांना मूक समर्थन किंवा कारणीभूत असलेल्या ममता यांनी विश्वशांतीवर बोलावे? रोममधल्या त्या परिषदेला ममता प. बंगालमधल्या धुमसत्या हिंदूंच्या भावनांच्या भयग्रस्त शांतीवर बोलणार का? नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नक्षलग्रस्त भागात मतांसाठीची याचना, आवाहन करणार्‍या ममता बॅनर्जी. आंतरराष्ट्रीय स्तरावर देश, देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्म याबद्दल त्या काय गरळ ओकू शकतात, हे शहाण्या माणसाला सांगायला नकोच. आता काहींचे म्हणणे आहे की, सध्या भारताचे सामर्थ्य वाढत आहे. त्यामुळे देशाबाहेर काही लोकांचा पोटशूळ उठला आहे. ममतांसारख्या व्यक्तींना या अशा थातुरमातूर पण आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावर बोलावून भारताची निंदा वदवून घेण्याचे कारस्थान असणार! रोमचे पोप फ्रान्सिसही परिषदेमध्ये आहेत, हे विशेष. काहींचे म्हणणे मोदींसारखी मीही हुशार, बुद्धिमान आणि जगभरात लोकप्रिय आहे, हे दाखवण्यासाठी ममता यांनी या परिषदेत जाण्यासाठी ‘सेटिंग’ लावली असेल. नाहीतर ममता आणि विश्वशांती? पहिली प. बंगालची नव्हे नव्हे जिथून आता निवडणूक लढवत आहेत, त्या मतदारसंघाची तरी शांती सांभाळा म्हणावे...


@@AUTHORINFO_V1@@