गोगलगाईंचे पर्यावरणीय महत्त्व काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2021   
Total Views |
snail_1  H x W:


महाराष्ट्रामधून नुकताच गोगलगाईंच्या दोन नव्या प्रजाती आणि एका पोटजातीचा शोध लावण्यात आला आहे. खासकरून पावसाळ्यात दिसणार्‍या इवलाशा गोगलगाई या पर्यावरणीय परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, वाघ-बिबट्यांसारख्या मोठ्या जीवांभोवती आपल्या देशातील वन्यजीव संवर्धनाचे धोरण केंद्रित असल्याने गोगलगाईंसारख्या सूक्ष्मजीवांच्या संशोधनाकडे कानाडोळा केला जातो. गोगलगाईंसारख्या सूक्ष्मजीवांच्या संवर्धनाचे नेमके हेच दु:ख आहे. म्हणूनच गोगलगाईसारख्या जीवासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी त्यावर संशोधन करणारे संशोधक डॉ. अमृत भोसलेंची ही मुलाखत...



 
गोगलगाईंचे पर्यावरणीय महत्त्व काय?
हवामान बदल आणि त्यामुळे निसर्गामध्ये सूक्ष्म स्वरुपात होणार्‍या बदलांची गंभीर समस्या आज आपल्यासमोर उभी आहे. अशा पद्धतीने पर्यावरणीय परिसंस्थेमध्ये होणार्‍या अत्यंत सूक्ष्म बदलांचा सूचक असणारा एक जीव म्हणजे गोगलगाय. गोगलगाईंना जीवंत राहण्यासाठी साधारणपणे ८२ ते ९५ टक्के आर्द्रता लागते. मात्र, हवामान बदलामुळे झालेल्या तापमानवाढीचा परिणाम गोगलगाईंवर पडतो. शिवाय त्यांच्या हालचालीमधील वेग हा मंद असल्याने त्यांना स्थलांतर करणेही कठीण जाते. त्यामुळे आर्द्रता कमी झाल्यावर त्या जीवंत राहू शकत नाहीत. गोगलगाई या निसर्गातील सफाई कर्मचारीही आहेत. कारण, कुजलेला पालापाचोळा आणि मृत कीटकांच्या अवशेषांवर त्या जगतात. तसेच त्या अन्नसाखळीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्या अनेक प्राणी आणि पक्षी प्रजातींचे खाद्य आहेत. त्यामुळे गोगलगाई या छोट्या जरी दिसत असल्या, तरी त्या पर्यावरणीय परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
 
 
गोगलगाईंमध्येही काही प्रकार आढळून येतात का?
भारतामध्ये साधारणपणे गोगलगायींच्या १,३०० ते १,४०० प्रजाती आढळून येतात. तर काही परदेशी प्रजातीही (exotic) देशात आढळतात. पश्चिम घाटाचा विचार केल्यास, या भूक्षेत्रामध्ये गोगलगाईंच्या ६४ पोटजाती, २३ फॅमिली आणि साधारण २७७ प्रजाती सापडतात. गोगलगाईंचा शंख हा कॅल्शियमचा मोठा स्रोत असतो. गोगलागाईंचे दोन प्रकार आहेत. काही गोगलगाईंमध्ये नर आणि मादीचे लिंग हे एकाच जीवामध्ये असते. याला ’हर्माफ्रोडाइट्स’ असे म्हणतात. तर काही गोगलगाईंमध्ये दोन्ही लिंग स्वतंत्र असतात. काही गोगलगाई या मांसभक्षी असतात. म्हणजेच आजबाजूला असणार्‍या दुसर्‍या गोगलगाईंची शिकार करुन त्या खातात. शंखामध्ये शिरून त्या गोगलगाईंची शिकार करुन आपला उदरनिर्वाह करतात. काही गोगलगाई या केवळ मृत झालेल्या जीवांवर अन्नग्रहण करतात. महाराष्ट्रात केवळ दोन मांसभक्षी प्रकाराच्या गोगलगाईच्या प्रजाती आढळतात. त्यामधील ’पेरोटेटिया राजेश गोपाली’ या एका प्रजातीचा काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यामधून शोध लावण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये गोगलगाईंचा प्रजनन हंगाम असल्याने या काळात त्या आपल्याला प्रामुख्याने नजरेस पडतात.
 
 
snail_1  H x W: 
 
 
 
गोगलगाईंचा अभ्यास दुर्लक्षित राहिला आहे का? त्यामागची कारणे काय आहेत ?
हो. भारतामध्ये नक्कीच गोगलगाईंचा अभ्यास दुर्लक्षित आहे आणि त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. भारतात ब्रिटिश राजवटीमध्ये गोगलगाईंचा मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला. स्वातंत्रप्राप्तीनंतर फार मोजक्याच स्वरुपात गोगलगाईंच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यात आले. आजही गोगलगाईंच्या पोटजातींची किंवा प्रजातींच्या शंखावरील आधारित शास्त्रीय वर्णने ही इंग्रजी किंवा खास करून लॅटिन भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय साहित्याची अनुपलब्धता आणि भाषेची अडचण असल्याने अनेक संशोधक गोगलगाईंच्या संशोधनात्मक अभ्यासाकडे वळत नाहीत. तसेच वाघ-बिबट्यासांरखा मोठ्या मांसभक्षी वा हत्तीसारख्या तृणभक्षी प्राण्यांच्या संशोधनासाठी मिळणारा आर्थिक पाठिंबा हा गोगलगाईंसारख्या सूक्ष्मजीवांच्या संशोधनाकरिता मिळत नाही. शिवाय या संशोधनाला प्रसिद्धीचे वलयही नाही. त्यामुळे वन्यजीव संशोधन कार्यात नव्याने येऊ पाहणारी पिढी याकडे वळत नाही. सध्या सूक्ष्मजीवांमधील बेडूक किंवा पालींवर संशोधनकार्य हे केंद्रित झाले आहे. हे केंद्र गोगलगाईंकडेही वळणे आवश्यक आहे.
 
 
गोगलगाईंच्या संशोधनामध्ये येणारे अडथळे कोणते ?
जीवासंबंधी संशोधनकार्य करताना ’टॅक्सोनॉमी’ ही आवश्यक असते. हे काम ‘टॅक्सोनॉमिस्ट’ करतो. आज देशामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके गोगलगाईंवर संशोधन करणारे संशोधक आणि ‘टॅक्सोनॉमिस्ट’ आहेत. सद्यपरिस्थितीत गोगलगाईंची ’टॅक्सोनॉमी’ ही कमी प्रमाणात केली जाते. त्यासाठी आवश्यक असणारे अपुरे शास्त्रीय साहित्य आणि तुलना करण्यासाठी आवश्यक नमुन्यांची अनुपलब्धता हे त्यामागील कारण आहे. शिवाय देशात गोगलगाईंवर काम करणारी तज्ज्ञ मंडळी उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोगलगाईंच्या डिटेक्शनचे काम करताना म्हणजेच शरारीतील अवयवांविषयी समजून घेताना बर्‍याचदा अडचण निर्माण होते. अशावेळी परदेशातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा लागतो.
 
 

snail_1  H x W: 
 
 
गोगलगाईंच्या संशोधनाच्या अनुषंगाने सह्याद्रीमध्ये क्षमता आहे का ?
पश्चिम घाटामध्ये गोगलगाईंच्या २७७ प्रजाती आढळत असून श्रीलंकेमध्ये ही संख्या २७० आहे. शिवाय देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच संशोधक गोगलगाईंवर काम करत असून महाराष्ट्रामध्ये ही संख्या एक ते दोन संशोधकांएवढीच आहे. त्यामुळे नक्कीच सह्याद्रीमध्ये गोगलगाईंच्या संशोधनासाठी मोठी संधी आहे. नुकताच सह्याद्रीमधून गोगलगाईंच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लागल्याने या भूक्षेत्राची क्षमताही लक्षात येते. तसेच सह्याद्रीमधील संवर्धनाच्या दृष्टीने या भूप्रदेशातील सूक्ष्मजीवांचा अभ्यास होणे महत्त्वाचा आहे.
 
 
गोगलगाईंच्या परदेशी प्रजातींचा (exotic) स्थानिक परिसंस्थेवर काय परिणाम पडतो?
आज भारतामध्ये स्थानिक प्रजातींबरोबरच परदेशी प्रजातीही आढळून येतात. या प्रजाती फार वर्षांपूर्वी भारतीय पर्यावरणीय परिसंस्थेमध्ये अनवधानाने दाखल झाल्या किंवा सोडल्या गेल्या. ज्यामुळे यामधील काही प्रजाती या भारतभर पाहावयास मिळतात. त्या स्थानिक जैवसाखळीला धक्का लावण्याबरोबर पिकांचेही नुकसान करतात. उदाहरणार्थ, आज ’जायन्ट आफ्रिकन स्नेल’ ही परदेशी प्रजात मोठ्या संख्येने पाहायला मिळते. ही प्रजात मूळची आफ्रिकन. फार वर्षांपूर्वी ती भारतात आली आणि आज ती देशातील ११ राज्यांमध्ये सहजपणे आणि मोठ्या संख्येने सापडते. अशा पद्धतीने गोगलगाईंच्या नव्हे, तर कोणत्याही जीव प्रजातींमधील परदेशी प्रजाती या स्थानिक जैवविविधतेला हानिकारक असतात. परदेशी प्रजातींमुळे स्थानिक पर्यावरणीय परिसंस्थेतील अन्नसाखळीला धक्का बसतो. खास करून भक्षक साखळीवर याचा परिणाम दिसून येतो.
 
 
@@AUTHORINFO_V1@@