मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मुंबईत फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीत ८९ पैकी ४९ दिवस हवेतील प्रदूषणकारी पीएम१० कणांची पातळी ‘राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकां’पेक्षा जास्त असल्याची नोंद करण्यात आली आहे (mumbai air quality). म्हणजेच एकूण कालावधीमध्ये ५५ टक्के दिवस हवेची गुणवत्ता पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक खालावली असल्याची माहिती ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या (सीपीसीबी) आकडेवारीच्या विश्लेषणातून समोर आली आहे (mumbai air quality). ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅण्ड क्लीन एअर’ (CREA - सीआरईए) या संस्थेने या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. (mumbai air quality)
हिवाळी हंगामात मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेबरोबर आल्याची नोंद झाली होती. यासंबंधीचे विश्लेषण आता समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईत सर्वच्या सर्व २८ दिवसांमध्ये, मार्च महिन्यात ३१ पैकी १७ दिवसांमध्ये आणि एप्रिल महिन्यात ३० पैकी चार दिवसांमध्ये मुंबईच्या हवेतील पीएम१० कणांची पातळी ही राष्ट्रीय मानकांच्या निर्धारित पातळीपेक्षा अधिक होती. मुबईतील हवा गुणवत्तेच्या नोंदी ३० कंटिन्युअस अँबिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्सद्वारे (CAAQMS) केले जाते. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये पीएम१०ची मासिक सरासरी पातळी अनुक्रमे १३० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर (µg/m³), १०८ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर (µg/m³) आणि ७८ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर (µg/m³) इतकी नोंदवण्यात आली. दरम्यान या काळात पीएम२.५ कणांची पातळी निर्धारीत मानक मर्यादेत राहीली होती.
“मुंबईतील प्रत्येक प्रदूषणग्रस्त भागाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रस्तावित एअरवाइझ (AIRWISE) प्रणालीसह प्रत्यक्ष वेळेत स्रोताचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, म्हणजे वाहतूक, उद्योग, बांधकाम की कचरा जाळणे यापैकी नेमके कशामुळे प्रदूषण होत आहे, हे ओळखता येईल. त्याचप्रमाणे, ठोस उपाययोजना प्रभावीपणे राबवता येण्यासाठी आणि या उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यासाठी क्षमताबांधणी उपक्रमांचीही तितकीच गरजेची आहे”, असे सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅण्ड क्लीन एअर (CREA) येथील विश्लेषक मनोज कुमार म्हणाले. पीएम१०ची पातळी कायम उच्च असलेली देवनारसारखी प्रदूषणयुक्त ठिकाणे निश्चित करणे अत्यावश्यक आहे. या प्रदूषणाच्या वाढीमागची कारणे शोधून काढणेही तितकेच गरजेचे आहे, असे वातावरण संस्थेचे संस्थापक आणि मुंबई क्लीन एअर नेटवर्कचे सदस्य भगवान केसभट यांनी नमूद केले.
मर्यादा किती ?
‘सीपीसीबी’ने पीएम१०ची (१० मायक्रॉन व्यासाच्या कणांसाठी) २४ तासांच्या सरासरीसाठी १०० मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर (µg/m³) इतकी मर्यादा निर्धारित केली आहे. तर पीएम२.५ (२.५ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा लहान व्यासाच्या कणांसाठी) ही मर्यादा ६० µg/m³ इतकी आहे.