मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळा नीलपंख म्हणजेच ओरियन्टल डाॅलरबर्ड या पक्ष्याचे प्रथमच दर्शन घडले आहे (dollarbird spotted in sindhudurg) . बुधवार दि. ७ मे रोजी दोडामार्ग तालुक्यात पक्षीनिरीक्षकांना या पक्ष्याचे दर्शन घडले (dollarbird spotted in sindhudurg) . या दर्शनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष्यांच्या यादीत भर पडली आहे. (dollarbird spotted in sindhudurg)
सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या पक्ष्याच्या विविधतेसाठी ओळखला जातो. मात्र, डाॅलरबर्ड हा पहिल्यांदाच सिंधुदुर्गात दिसल्याने जिल्ह्यातील पक्ष्यांच्या यादीत नव्या पक्ष्याची भर पडलीय. ७ मे रोजी बांद्यातील पक्षीनिरीक्षक प्रवीण सातोसकर हे वाईल्ड ग्राम या संस्थेची पक्षीनिरीक्षणासाठी सहल घेऊन तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना डाॅलरबर्ड हा फांदीवर बसलेला दिसला. त्यावेळी पक्षीनिरीक्षकांनी लागलीच याची छायाचित्र टिपली. उडताना या पक्ष्याच्या पखांवर असलेले पांढऱ्या रंगाचे डाॅलरच्या आकाराचे वर्तुळ दिसते म्हणून याला डाॅलरबर्ड म्हणतात. हा पक्षी प्रामुख्याने भारतामध्ये पश्चिम घाट आणि हिमालयीन प्रदेशात दिसतो. पश्चिम घाटात देखील तो मध्य कर्नाटकापासून खाली केरळपर्यंत आढळतो. महाराष्ट्रात यापूर्वी या पक्ष्याची लोणावळ्यातून नोंद आहे. सिंधुदुर्गात हा पक्षी पहिल्यांदाच दिसलाय. त्यामुळे सिंधुदुर्गात आढळणाऱ्या पक्ष्यांची यादी ही ४१५ झाली आहे.
नीलपंख कुळात महाराष्ट्रामध्ये तीन प्रजाती आढळतात. त्यामधील हा एक पक्षी. यामधील प्रौढ पक्ष्याची चोच चमकदार लाल रंगाची असते. उडताना हा पक्षी मैनेसारखा दिसू शकतो. परंतु लांब पंख, मोठे डोके यामुळे त्याचे वेगवेगळे ओळखता येऊ शकते. उन्हाळी हंगामात हे पक्षी झाडांच्या छिद्रांमध्ये घरटी बांधतात. बहुतेकदा वीज तारांवर किंवा उंच झाडांच्या वरच्या भागात बसलेले दिसतात.