मुंबई (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी अरुणचाल प्रदेशमधून टाचणीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे (New damselfly species). नव्या टाचणीचे नामकरण कलिफिया सायनुफुरकाटा (Caliphaea sinuofurcata) असे करण्यात आले आहे (New damselfly species). इंग्रजीमध्ये या टाचणीला त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या दाट काळ्या केसांसारख्या काट्यांमुळे 'बियर्डेड ब्रॉन्झबॅक' असे नाव देण्यात आले आहे. (New damselfly species)
डॉ. दत्तप्रसाद सावंत, शंतनू जोशी आणि डॉ. कृष्णमेघ कुंटे यांनी कलिफिया जातीच्या नव्या टाचणीचा शोध अप्पर सियांग आणि लोअर दिबांग या दोन जिल्ह्यांतून लावला आहे. या शोधाचे वृत्त २० मे २०२५ रोजी झूटॅक्सा या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले. डॉ. कुंटे यांच्या नेतृत्वाखाली अरुणाचल प्रदेशात अप्पर सियांग आणि लोअर दिबांग या दोन जिल्ह्यांत गेली तीन वर्षे कीटकांवर संशोधनाचे काम सुरू आहे. याच प्रकल्पाअंतर्गत त्यांना एक तांबूस शेवाळी रंगाची टाचणी २०२२ साली मिळाली. सुरूवातीला ही टाचणी कलिफिया कन्फ्युजा (Caliphaea confusa) ही प्रजात असावी असे समजून त्यांनी टाचणीचे काही नमुने गोळा केले. मात्र, बंगळुरू येथील 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (एन.सी.बी.एस.) या संस्थेत नमुन्यांचे पृथःकरण करताना डॉ. सावंत यांना ही प्रजात इतर सर्व कलिफिया टाचण्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले. त्यांनी ही गोष्ट शंतनू जोशी आणि डॉ. कुंटे यांच्या निदर्शनास आणली आणि यावर शोधनिबंध लिहून नव्या टाचणीला जगासमोर आणण्याचे निश्चित केले.
या नव्या टाचणीच्या नराच्या शेपटीकडील उपांगांच्या बारीक वळणदार आकारावरून तसेच टोकाकडे असणाऱ्या खाचेवरून त्याला सायनुफुरकाटा हे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. या तांबूसपाठी टाचण्यांच्या जगात एकूण सहा प्रजाती याआधी ज्ञात होत्या. त्यापैकी भारतात केवळ एकच प्रजातीचा आढळ सिक्कीम व पूर्व हिमालयात होता. मात्र या 'दाढीवाल्या तांबूसपाठी' टाचणीमुळे भारतातल्या कलिफिया टाचण्यांच्या प्रजातींची संख्या दोन झाली आहे. तब्बल १६५ वर्षांनंतर कलिफिया जातीमध्ये एका नवीन प्रजातीचा शोध भारतीय उपखंडातून लागला आहे. सध्या ही टाचणी फक्त अरुणाचल प्रदेश राज्यात आढळून आली असून ती ईशान्य भारताच्या इतर राज्यांतही असण्याचा अंदाज आहे. या संशोधनात डॉ. सावंत, शंतनू जोशी, डॉ. कुंटे यांच्यासह उज्वला पवार आणि विराज नावगे या एन.सी.बी.एस. येथील पी.एच.डी. विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
"कलिफिया टाचण्या या एकमेकांपासून वेगळे ओळखणे फार कठीण असते. त्यांच्या शेपटीकडील उपांगांचे निरीक्षण केल्यावरच त्यातील प्रजाती वेगवेगळ्या ओळखू येतात. ही नवी प्रजात म्हणजे या शोधमोहीमेचे मोठे यश आहे." - डॉ. दत्तप्रसाद सावंत.
"अप्पर सियांग जिल्हा हा जैविविधतेने समृद्ध असून या परिसरातून अनेक नव्या प्रजाती भविष्यात शोधल्या जाऊ शकतात. आमची या भागातून शोधलेली ही तिसरी टाचणी असून यापुढेही वेगवेगळ्या भागातून आम्ही जैवविविधतेचा अभ्यास करीत राहू." - शंतनू जोशी.