मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील पाणथळ जागेमधून तब्बल १ हजार ७४ किलो प्लास्टिक गोळा केला (sindhudurg wetland cleanup). महिनाभर १० पाणथळींवर ही मोहिम सुरू होती (sindhudurg wetland cleanup). या उपक्रमात दै. मुंबई तरुण भारत (महा MTB) सहयोगी संस्था म्हणून सहभागी झाली होती.(sindhudurg wetland cleanup)
कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील महत्त्वाच्या १० पाणथळ जागांवर प्लास्टिक स्वच्छता मोहिम राबवली. जागतिक वारसा स्थळ लाभलेले धामापूर तलाव, मालवण तालुक्यातील ऐतिहासिक पेंडूर व ठाकूरवाडी तलाव, जैवविविधतेने समृद्ध असे पाट तलाव, वेंगुर्ला तालुक्यातील निशांत तलाव, सावंतवाडी तालुक्यातील पाळणेकोंड तलाव, कणकवली तालुक्यातील ओझरम व ओसरगाव तलाव, ओरस येथील दाबाचीवाडी तलाव आणि कुडाळ तालुक्यातील धार्मिक दृष्ट्या प्रसिद्ध वालावल तलाव, अशा १० पाणथळ जागांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ४ मे २०२५ ते २ जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील १० पाणथळ जागांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतून १०७१.४१ किलो प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या मदतीने परुळे बाजार येथे असणाऱ्या प्लास्टिक प्रक्रिया केंद्रामध्ये पुढील प्रक्रिया (रिसायकल) करण्यात आली. वन विभाग सावंतवाडी, वन शक्ती फाउंडेशन, देशपांडे फाउंडेशन (हुबळी, कर्नाटक), महा एमटीबी मुंबई आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा सहयोग या स्वच्छता मोहिमेला मिळाला होता.
या स्वच्छता मोहिमेमधून पाट तलावातून २००.१० किलो प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यात आला. तसेच धामापूर ११५.३६ किलो, दाबाचीवाडी १६०.१५ किलो, ठाकूरवाडी ५०.८५ किलो, पालनकोंड ८०.६० किलो, निशांतलाव ८.२६ किलो, वालावल १७४.२३ किलो, ओझरम ६५.२० किलो, ओसरगाव १३५. ८ किलो, पेंडूर १५.६२ किलो इतका प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करण्यात आला. संत राऊळ महाराज महाविद्यालय हे नेहमीच अशा प्रकारे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाचे कार्यक्रम व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून पर्यावरणाबद्दल नेहमीच जागरूक राहत आले आहे. या स्वच्छता मोहिमेचे मुख्य आयोजक डॉ. योगेश कोळी तसेच प्रवीण सावंत व मयुरी चव्हाण यांनी संपूर्ण मोहिमेचे यशस्वी असे आयोजन करून मोहीम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या स्वच्छता मोहिमेसाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, प्रा. डॉक्टर अनंत लोखंडे, प्रा. प्रशांत केरवडेकर तसेच क. म. शि. प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जवळपास एक १ टनापेक्षा जास्त प्लास्टिक सदृश्य कचरा फक्त पाणथळ जागा मधून गोळा करून संत रावळ महाराज महाविद्यालयाने शैक्षणिक व सामाजिक स्तरावर आपले नाव लौकिक केले आहे.