बिचारे बैल आणि विनोदवीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2021   
Total Views |

NEWS _1  H x W:




तसे ते देशभर या ना त्या निवडणुकीत इथे ना तिथे पडतच असतात. पडणे ही त्यांच्यासाठी अभूतपूर्व घटना आहे किंवा त्यांना पडताना पाहणे म्हणजे काही नवीन घटना आहे, असे अजिबात नाही. २०१४ नंतर त्यांच्या भाळी आता एकच शब्द कोरला गेला आहे तो म्हणजे ‘पडणे.’ पण लोक ना इतके नतद्रष्ट आहेत की, त्यांच्या पडण्याच्या चर्चा अष्टदिशांतून होत आहेत. पडले पडले... जणू काही त्यांच्या पडण्याने एक अतिश्रेष्ठ मनोरंजन झाले आहे. आता काही सुज्ञांचे म्हणणे आहे की, भाई जगताप काँग्रेस नेते आपल्या कार्यकर्त्यांसह बैलगाडीतून पडले. त्यावेळी ते भाजपविरोधात आंदोलन करत होते. यावर काहींचे म्हणणे आहे, ते ज्या बैलगाडीतून पडले ते बिचारे बैल ठीक आहेत की नाही? ते भाई जगताप आणि त्यांचा ‘तो’ मीच सर्वज्ञ असा असलेला मोठा गैरसमज आणि ‘भाई जगताप व्हाया नाना व्हाया दिल्ली’ तख्ताला खूश करू पाहणारे ते कार्यकर्ते. पण छे, बैलांनी ती आतुरता एका क्षणात पार विस्कळीत केली. बैल का असे सैरभैर झाले असतील? काँग्रेस त्यातही राहुलबाबाचे नाव घेताक्षणीच असे काय झाले? सगळे काँग्रेसी सरळ तडमडून खाली कोसळले? असो. विनोद करणे हा आता या पक्षाचा स्थायी भावच झाला आहे म्हणा. पक्षाचे राजकुमारच जर जनतेच्या मनोरंजनात कोणतीच कसर सोडत नाहीत, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरी मागे का राहावे? तेही बिचारे ‘मम’ म्हणत जमेल तशी ’कॉमेडी’ करत राहतात. पण ‘कॉमेडी’ करताना थोडा विचार तरी करावा. कितीजण आणि कसे त्या बैलगाडीवर उभे राहणार? कोरोनाचे नियम पाळले जाणार आहेत की नाही? काही नियोजन केले का? गल्लीबोळात एक बैलगाडी चालवता आली नाही. मात्र, देश चालवण्याचा यांना अकारण सोस भारी. बाकी ‘गिरे तो भी टांग उपर’ म्हणण्याची सोयसुद्धा यांना बैलांनी ठेवली नाही, हे विशेष. बिचारे कोण? बैल की विनोदवीर..
 
 

कार्यकर्त्यांचे श्रद्धा स्वातंत्र्य

 
 
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या आजारी आहेत. नेमके त्याचवेळी समाजात बर्‍याच घडामोडी घडत आहेत. ‘स्टॅन’चा मृत्यू आणि कोरेगाव-भीमा संदर्भातल्या काही विशेष घटना घडत आहेत. पण बायपास शस्त्रक्रिया झाल्यामुळे सध्या प्रकाश आंबेडकर यांनी विश्रांती घेतली आहे. तीन महिने आपण समाजमाध्यमांपासून दूर राहणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे सध्या ते सामाजिक राजकीय वगैरे घडामोडीपासून थोडे दूर आहेत. चालायचंच! माणूस म्हटला की चालायचंच. पण या दरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. प्रकाश आंबेडकरांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून त्यांच्या अनुयायांनी भगवान शंकराला दुग्धाभिषेक, तर कुणी हनुमंताला साकडेही घातले. या घटनेने समाजात एक चर्चा उमटली. कोरेगाव-भीमा प्रकरणात आणि त्यानंतरही गल्ली स्तरावरचे अनेक जण हिंदू देव-देवता-श्रद्धा यावर वाटेल ते बरळताना दिसले. अर्थात, त्यांची ती अभिव्यक्ती असावी, असे समजले तरी ती भाषा आणि ते विचार समाजाला सहनीय नव्हते. दुर्दैवाने समाजाची चळवळ म्हटली की, बहुसंख्यकांना वाटते की हिंदू देव-देवतांना शिवीगाळ केली, त्यांच्या श्रद्धांची टिंगलटवाळी केली की झाली सामाजिक चळवळ. त्यामुळेच की काय, सध्या कोणत्याही पुरोगामी विद्रोही वगैरेंशी चर्चा करायला घेतली की त्यांची गाडी हिंदू देव-देवता आणि श्रद्धा यावरच अडकते. सध्या प्रकाश आंबेडकर आजारी आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धाभावाने ईश्वराला प्रार्थना केली आहे. आस्तिक किंवा नास्तिक असणे ही ज्याची त्याची अभिव्यक्ती. पण या अभिव्यक्तीवरचा घाला आजकाल चळवळीतल्या लोकांकडूनही घातला जातो. विनोदवीर भाऊ कदम यांना हा आघात झेलावा लागला. गावकुसामध्ये तर सोडा, मुंबई-पुण्यासारख्या शहरातही कुणी घरात देवाची पूजा करते का? गणपती किंवा देवी बसवतात का? याचा शोध घेऊन त्या भाविकाला समाजाबाहेर काढण्याचे कारस्थान काही समाजद्वेषी करत आहेत. या परिप्रेक्षात प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी जपलेले त्यांचे श्रद्धा स्वातंत्र्य केव्हाही ‘ग्रेट’च!

@@AUTHORINFO_V1@@