वनविभागाची ‘शेरनी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2021   
Total Views |

rajashree keer _1 &n

वनविभागासारख्या पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या क्षेत्रात एक सक्षम महिला वनाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री चंद्रकांत कीर यांच्याविषयी...
 
 
 
वनविभागामध्ये सध्या महिला कर्मचारी विविध पदांवर कार्यरत असल्या तरी दशकभरापूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. या विभागामध्ये महिलांचा प्रवेश हा खडतर होता आणि वातावरणही प्रतिकूल स्वरूपाचे होते. अशा काळात वर्दीच्या सेवेचे स्वप्न बाळगून या स्त्रीने वनविभागात प्रवेश मिळवला. त्यानंतर विभागाच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील ‘पहिल्या महिला वनपाल’ पदापर्यंत मजलही मारली. नवे काहीतरी शिकण्याची इच्छा मनी ठेवून काम केले. साहसी कामांची ओढ असल्याने जिगरबाजपणे बिबट्यांचा बचाव केला. या कामांचे फलित म्हणजे नुकतीच त्यांना चिपळूण ‘वनपरिक्षेत्र अधिकारी’ पदावर पदोन्नती मिळाली आहे. पुरुषांचे कार्यक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या वनविभागात निडरपणे काम करून महिलांचे प्रतिनिधित्व करणारी ही स्त्री म्हणजे राजश्री कीर.



मुंबईतील चेंबूरमध्ये दि. जून, १९७७ साली कीर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांनी वर्दीच्या सेवेचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे शालेय आणि पदव्युत्तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. २००० साली वडील निवृत्त झाल्यावर त्यांनी रत्नागिरीतील जुवे या आपल्या मूळ गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. वडिलांबरोबर कीरदेखील रत्नागिरीत आल्या. या ठिकाणी आल्यावर त्यांनी खासगी स्वरूपात काही छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या. मात्र, अंगावर वर्दी चढविण्याचे स्वप्न त्यांना काही शांत बसू देत नव्हते. त्याच ओढीने त्यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. नोकरी करून रत्नागिरीमध्ये शरद पोंक्षे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत या अभ्यासाला सुरुवात झाली आणि त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.




एमपीएससी’चा अभ्यास करत असताना पोंक्षे यांच्या सांगण्यावरून कीर निरनिराळ्या परीक्षा देत होत्या. त्यावेळी २००५ साली वनविभागाची भरती निघाली. कीर या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या आणि उत्तमरीत्या सर्व टप्पे पूर्ण केल्याने त्यांची निवड झाली. २००६ साली त्या कोल्हापूर वनविभागामध्ये ‘वनरक्षक’ पदावर रुजू झाल्या आणि वर्दीची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. २००७ साली त्यांची लांजा वनपरिक्षेत्रामध्ये बदली झाली. त्यावेळी आंबा घाटामध्ये नव्याने तयार केलेल्या मुर्शी चेकनाक्यावर त्यांना पोस्टिंग मिळाली. हा चेकनाका नवीन असल्याने त्या ठिकाणी एक महिला म्हणून काम करणे जोखमीचेच होते. अशा परिस्थितीत निडरपणे दोन-तीन दिवस सलग रात्र-रात्रभर जागून त्यांनी या चेकनाक्यावर काम केले. २००८ साली ‘सरळसेवा वनपाल’ भरती सुरू झाल्यावर त्यांनी विभागाअंतर्गत परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना ‘वनपाल’पदावर पदोन्नती मिळाली आणि सोबतच रत्नागिरी वनविभागाची ‘पहिली महिला वनपाल’ होण्याचा मानही मिळाला.



वनपाल’पदावर कार्यरत होण्यापूर्वी कीर यांचे चिखलदरा येथे वर्षभर प्रशिक्षण झाले. २००९ साली त्या सामाजिक वनीकरण विभागामध्ये ‘वनपाल’ म्हणून रुजू झाल्या. या विभागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचे काम त्यांनी केले. सोबतच ‘राष्ट्रीय हरित सेना मोहिमे’अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. कीर या सतत नवीन काही शिकण्याची संधी शोधत असल्याने त्यांनी २०१३ साली गुहागर प्रादेशिक वनविभागामध्ये बदली करून घेतली. या विभागामध्ये काम करत असतानाच त्यांनी पहिल्यांदा बिबट्या बचावकार्याचा अनुभव घेतला. त्यावेळी त्यांना वन्यजीव आणि त्यासंबंधीच्या बचावकार्यांची ओळख झाली. यादरम्यान त्यांनी गुहागर किनार्‍यावर समुद्री कासव संवर्धनाचेही काम केले. त्या काळात गुहागर किनार्‍यावर कासव संवर्धनाचे काम नव्यानेच सुरू झाले असल्याने त्याची घडी बसवण्याचे काम कीर यांनी केले. तसेच किनार्‍यावर जखमी अवस्थेत वाहून येणार्‍या कासवांना जीवदानदेखील दिले.



राजापूर वनपरिक्षेत्रामध्ये महिन्यामधून एकदा बिबट्या बचावाचे काम व्हायचे. त्यामुळे वन्यजीव बचावकार्यांच्या ओढीने कीर यांनी २०१५ साली आपली बदली राजापूरमध्ये करून घेतली. राजापूर येथील कार्यकाळात त्यांनी मोठ्या हिमतीने बिबट्या बचावाचे काम केले. एका घटनेवेळी पूर्ण वाढलेल्या नर बिबट्याचा पाय हा सापळ्यात अडकला होता. अशा वेळी त्याला वाचवण्यामध्ये मोठी जोखीम होती. कारण, बिबट्या हा पूर्ण वाढ झालेला असल्याने त्याने जोर लावल्यास तो सापळ्यामधून सुटण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीमध्ये तो वनकर्मचारी आणि जमलेल्या जमावावर हल्ला करू शकत होता. अशा वेळी मोठ्या शिताफीने आणि सबुरीने त्यांनी या बिबट्याचा बचाव आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने केला. त्यानंतरही थरारक पद्धतीने कीर यांनी कधी विहिरीत पडलेल्या, तर कधी सापळ्यात अडकलेल्या बिबट्यांची सुखरूप सुटका केली.


२०१९ साली त्यांची बदली सावर्डे येथे झाली आणि त्यानंतर आता मे महिन्यामध्ये त्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांनी चिपळूण वनपरिक्षेत्रामध्ये ‘वनक्षेत्रपाल’ पदाचा पदभार स्वीकारला आहे. चिपळूणमधील ‘मानव-मगर संघर्षा’वर काम करण्याची त्यांची इच्छा आहे. वनविभागामधील आजवरचा हा प्रवास आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच यशस्वी झाल्याचे त्या नमूद करतात. कोणत्याही क्षेत्रात मुलीला करिअर घडवायचे असल्यास आई-वडिलांनी तिला साथ देण्याचे आवाहनही कीर यानिमित्ताने करतात. वन विभागातील पुढील वाटचालीकरिता राजश्री कीर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!

 




@@AUTHORINFO_V1@@