आम्ही ही जगतोय माणसांसोबत संघर्षमय जीवन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2021   
Total Views |
wildlife _1  H




महाराष्ट्रातील ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ हा आजतागायत केवळ वाघ आणि बिबट्यांभोवती केंद्रित राहिला आहे. मात्र, तसे असले तरी स्थानिक पातळीवर हा संघर्ष इतर वन्यजीव प्रजातींमुळे चिघळला आहे. ‘मानव-वाघ संघर्षा’चे नियोजन करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाला इतर प्रजातींमुळे होणार्‍या मानवी संघर्षाचे निराकरण करण्यास वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष अधिक गंभीर होत आहे. वाघ आणि बिबट्यांव्यतिरिक्त राज्यात इतर वन्यजीव प्रजातींची मानवासोबत सुरू असलेल्या संघर्षाची काय परिस्थिती आहे, याविषयी त्या त्या प्रजातीवर काम करणार्‍या तज्ज्ञ अभ्यासकांकडून जाणून घेतलेली मते...
 
 
  
संख्या छोटी, मात्र संघर्ष मोठा - अमित साटम - वन्यजीव अभ्यासक (दोडामार्ग)
 
२००० साली हत्ती हे कर्नाटकामधून दोडामार्ग जिल्ह्यातील मांगेलीमार्गे तिलारीच्या जंगलात दाखल झाले. या जंगलात बांबू, आंबा, फणस, कुंभा, औदुंबर, भेडले माड इत्यादी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हत्तींनी या ठिकाणी अधिवास केला. काही काळानंतर हत्ती हळूहळू गावातील शेतांमध्ये येऊ लागले. हत्ती पहिल्यांदा शेतात आल्यावर गावकर्‍यांनी त्यांच्या पायांच्या ठशांची पूजा केली. हत्ती म्हणजे साक्षात गणपतीचे रूप असल्याने त्याच्या पावलांनी आपल्या शेतीची भरभराट होईल, अशी तिलारी खोर्‍यातील गावकर्‍यांची भावना होती. शेतात आलेल्या हत्तीची शेपटी धरून ढोल-डब्बे वाजवून लोक त्यांना शेतीपासून लांब जंगलात सोडून यायचे. त्यानंतर हत्ती पुन्हा कर्नाटकात परतले. मात्र, दोन वर्षांनी पुन्हा महाराष्ट्रात येताना त्यांची संख्या वाढलेली होती. त्यावेळी ‘मानव-हत्ती संघर्ष’ सुरू झाला. 2002 साली तिलारी खोर्‍यात वसलेली गावे येथील तिलारी धरणामुळे स्थलांतरित झाली. त्यानंतर या परिसरातील जंगलसदृश खासगी जमिनींवर रबर आणि अननसाची लागवड वाढली. जंगलातील खाद्य कमी होऊ लागले. हत्तींना केवळ मुबलक पाणीच महत्त्वाचे नाही, तर त्याबरोबर अन्नदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ हत्ती हेवाळे, आयनोडे, बांबर्डे, विजघर, पाटणे, तिलारी नगर, चंदगड या भागात फिरू लागले. पाटणे येथे ऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही हत्ती येथे स्थायिक झाले. ऊस हे हत्तीचे आवडते खाद्य असल्याने लोकांच्या पिकांचे नुकसान दिवसागणिक वाढू लागले. ऊसतोडणीनंतर हे हत्ती विजघर परिसरात भात आणि केळीच्या शेतीमध्ये येऊ लागले. सध्या ‘तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा’तील गावांमध्ये ‘मानव-हत्ती संघर्षा’चा प्रश्न चिघळलेला आहे. उन्हाळ्यात हा प्रश्न अधिकच गंभीर होतो. कारण, जंगलामध्ये खाण्याची कमतरता झाल्यामुळे हत्ती गावात किंवा शेतात शिरण्याच्या घटनांमध्ये वारंवारता वाढते. यासाठी वनविभागाबरोबरच स्थानिक शेतकरी आणि गावकर्‍यांकडून साध्या साध्या उपाययोजना राबवून हा प्रश्न हाताळता येऊ शकतो. शेतकर्‍यांनी मधमाशी पालन, ‘फायर बॉल’, ‘ट्रिप अर्लाम’, ‘सोलार फेन्सिंग’, ‘कम्युनिटी गार्डनिंग’ यांसारखे उपाय करून हत्तींना शेतापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे ‘मानव-हत्ती संघर्ष’ कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
 
 
 
 
पाण्यातही संघर्ष - धनश्री बगाडे, सागरी जीवशास्त्रज्ञ, मॅंग्रोव्ह फाऊंडेशन
 
महाराष्ट्र त्याच्या समुद्री जैवविविधतेसाठी सर्वश्रुत आहे. आपल्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनार्‍यावर असंख्य समुद्रीजीव आढळतात. महाराष्ट्राच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही समुद्रकिनार्‍यांवर सागरी कासवे अंडी घालण्यासाठी येतात.अशा वेळी समुद्रात मासेमारी करताना अनेकदा काही कासव मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गासारख्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या किनार्‍यालगत ‘डॉल्फिन’, ‘व्हेल’ प्रजातीचे समुद्री सस्तन प्राणी कित्येकदा मासेमारी करताना मच्छीमारांना दिसतात. अशावेळी हे जीव मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेले मासे खातात. वसई, पालघर आणि डहाणूलगतच्या समुद्रात बोक्षी (डोलनेट)जाळ्यातील जवळा आणि छोटी मासळी खाण्याकरिता कित्येकदा बहिरी (व्हेलशार्क) माशाने जाळ्याचे नुकसान केल्याच्या बातम्या ऐकण्यात आल्या आहेत. यामध्ये मच्छीमारांचे शारीरिक नुकसान होत नसले, तरी आर्थिक नुकसान होते. कारण हे जीव जाळ्यात पकडलेली मासळी खाऊन टाकतात शिवाय जाळ्याचेही नुकसान करतात. म्हणजेच, जंगलात ज्याप्रमाणे ‘मानव-वन्यजीव संघर्षा’च्या घटना घडतात, तशाच घटना समुद्रातदेखील घडल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. या संघर्षामध्ये कधी समुद्रीजीवांचे, तर कधी मच्छीमारांचे नुकसान होते. अशा नुकसानाला आळा घालण्यासाठी वनविभागाचा ‘कांदळवन कक्ष’ आणि ‘मत्स्य व्यवसाय’ विभाग डिसेंबर 2018पासून ‘नुकसानभरपाई योजना’ राबवत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 178 मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यात आली असून, त्याद्वारे 145 समुद्री कासवांना जीवदान मिळाले आहे. शिवाय 30 बहिरी माशांची सुटका करण्यात आली आहे. अशाप्रकारे काही शाश्वत उपाययोजनांद्वारे समुद्रातील ‘मानव-सागरी जीवसंघर्ष’ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
 
 
 
सहजीवन हाच मार्ग - केदार भिडे, सर्प अभ्यासक
 
‘साप-मानव संघर्षा’कडे अनेक दृष्टिकोनातून पाहता येईल. अज्ञान, अंधश्रद्धा, भीती, सर्पदंश मृत्यू आणि ‘सर्पमित्र चळवळ’ अशा अनेक पैलूंनी हा विषय खूपच क्लिष्ट होत गेला आहे. खरंतर साप अनेक वर्षं काठीचा मार खात आहेत. फक्त काठी ज्याच्या हातात आहे, त्याचा हेतू आधी मारण्याचा असायचा आता तो बर्‍याचदा वाचविण्याचा असतो. मात्र, हेतू कितीही चांगला असला, तरी अजूनही बहुतांश ‘मानव-साप संघर्षा’मध्ये साप आपले प्राण गमावतात. ‘सर्पमित्र चळवळी’मुळे अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर होण्यासाठी खूप मोठी मदत झाली आहे. त्याचबरोबर मानवी वस्तीमधील शिरणार्‍या सापांचे प्राण तात्पुरते नक्कीच वाचले गेले.परंतु, ही चळवळ थोडीशी साप पकडणे आणि सोडणे, या चक्रातच अडकून पडली. सर्पदंशमृत्यूचे प्रमाण (वर्षाला 58 हजारांच्या आसपास) हे खूप मोठे असल्याकारणाने भीती आणि अंधश्रद्धा निर्मूलन या दोन्ही आघाड्यांवर अजूनही सामाजिक जागरूकतेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ‘सर्पमित्र चळवळ’ जोपर्यंत विस्तृत होऊन सापांच्या अधिवासाची गरज, सर्पदंश मृत्यू कमी करणे आणि शास्त्रीय अभ्यास या तीन तत्त्वांवर काम करत नाही, तोपर्यंत ‘साप-मानव संघर्ष’ हा साप-मानव सहजीवनापर्यंत पोहोचणे अवघड आहे. मानवी वस्तीच्या सभोवताली सहज मिळणारे भक्ष्य आणि लपावयास मिळणारा आसरा, यामुळे काही जातीचे साप कायम आपल्या सहवासात असणार आहेत. त्यांच्याबरोबर जगायला शिकणे, हा एकच मार्ग आपण अवलंबू शकतो.
 
 
 
 
मानवच कारणीभूत - पवन शर्मा, मानद वन्यजीव रक्षक, ठाणे
 
जंगलाला लागून असलेल्या शहरी भागात प्रामुख्याने ‘मानव-माकड संघर्ष’ मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. माकडांची निरोगी किंवा दाट लोकसंख्या असलेल्या ठिकाणी हा संघर्ष चिघळलेला दिसतो. पूर्वी जंगलाच्या हद्दीवरील मानवी वस्त्यांपर्यंत सीमित असलेला हा संघर्ष आता दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्यभागीही वाढत आहे. आपल्याकडे माकडांच्या साधारण तीन प्रजाती आढळतात. ‘बोनेट माकड’, ‘र्‍हिसस माकड’ आणि ‘हनुमान लंगूर’. यापैकी ‘लंगूर’च्या तुलनेत माकडांच्या दोन प्रजातींचा मानवी संघर्षाशी संबंध असतो. ‘मानव-माकड संघर्षा’चे मुख्य कारण म्हणजे माणसांकडून माकडांना दिले जाणारे खाद्य. बरेच लोक माकडांना खाद्य देतात, ज्यामुळे ते सहज मिळणार्‍या खाद्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आकर्षित होतात. तसेच माकडांच्या गटागटांमध्ये हद्दीवरून झालेल्या मारामारीनंतर अनेक माकडे ही शहरी अधिवासात राहण्यास सुरुवात करतात. शिवाय, कोणत्याही गटाकडून स्वीकारले न गेल्यामुळे आणि अशावेळी शहरात सहज खाद्य मिळू लागल्यामुळे, अशी एकटी माकडे शहरी अधिवासात राहणे पसंत करतात. त्यामुळे निर्माण झालेल्या संघर्षावरील व्यवस्थापनाकरिता वनविभागाच्या वतीने राज्यव्यापी प्रमाणभूत पद्धती (एसओपी) तयार करण्यात आली आहे. हा संघर्ष कमी करण्याचे उपाय म्हणजे माणसांकडून माकडांना देण्यात येणार्‍या खाद्यावर रोख लावणे आणि संघर्षास कारणीभूत असलेल्या माकडाची माहिती वनविभागाला योग्य वेळी देणे. ‘मानव-माकड संघर्षा’ला कारणीभूत ठरत असलेल्या प्राण्याची माहिती वनविभागाला 1926 या क्रमांकावर कळवावी.
 
 
देखो मगर 'प्यार' से - अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक, नेचर काॅन्झर्वेशन सोसायटी, सांगली
 
सांगली जिल्ह्यात कृष्णानदीकाठी ‘मानव-मगर संघर्ष’ हा दोन दशकांपासून सुरू आहे. गेल्या 20 वर्षांत 14 व्यक्ती मगरीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 16 लोक जखमी झाले आहेत. या भागात मगरी गेली कित्येक दशके वास्तव्य करून आहेत. मात्र, ‘मानव-मगर संघर्ष’ वाढल्यानंतर मानवी जीवितहानीपेक्षा कैकपटीने मगरी मारल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या पिल्लांची तस्करी होत आहे. कृष्णा नदीपात्रातील वाळू आणि मातीउपसा हे मगरींचा अधिवास नष्ट व्हायचे सर्वात मोठे कारण आहे. अलीकडील बांधकामक्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे आणि यांत्रिक बोटींच्या बेफाम वापरामुळे हा समृद्ध काठ अक्षरशः ओरबाडला जातोय. सोबतच काठावरील शेतीमधील रासायनिक खते, साखर कारखान्यांमधील सांडपाणी यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन मासे आणि इतर जलचर मरून जातात. ज्यामुळे अन्नाचे दुर्भिक्ष वाढते आहे. नदीकाठचा भाग अतिक्रमण करून शेतीखाली आणला जात आहे. तेथील झाडे-झुडपे तोडल्याने प्रत्येक वर्षी पुरामध्ये हा मळीचा भाग वाहून जात आहे. यामुळे मगरीना उन्ह शेकण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी घरटी, बिळं तयार करण्यासाठी जागेची कमतरता पडू लागली आहे. तसेच माध्यमांमध्ये मगरींसंदर्भातील वार्तांकनात अक्राळ विक्राळ, हिंस्र, अजस्र इ. भीतिदायक शब्दांचा वापर करण्यात येत आहे. ज्यामुळे स्थानिकांमध्ये मगरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. संघर्ष कमी करण्यासाठी मगरींची संख्या, अधिवास यांचे सर्वेक्षण करून त्या भागामध्ये कोणतेही उत्खनन होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोणतीही जीवित/वित्तहानी झाल्यास त्वरित नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. ज्यामुळे रोष कमी होईल. माध्यमांमधून मगरींविषयी जनजागृतीपर लेख प्रकाशित व्हावेत.
 
 
गव्याचा 'गवगवा' - कुणाल साळुंखे, अध्यक्ष, आॅर्गनायझेशन फाॅर वाईल्डलाईफ स्टडिज
 
गवा हा भारतीय उपखंडात सापडणारा गाईच्या कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. त्यामुळे त्याला लागणार्‍या अधिवासक्षेत्राची गरजही तितकीच मोठी आहे. वाढते शहरीकरण, व्यावसायिक झाडांची लागवड इत्यादीसारख्या कारणांमुळे गव्यांचा आधिवास कमी होत आहे. सद्यःस्थितीत भारतात गवे हे बहुतांशी संरक्षित जंगलातच आढळतात. परंतु, वाढत्या पर्यटनामुळे संरक्षित वनांच्या आसपास तयार झालेले रिसॉर्ट आणि फार्महाऊस यांना घातलेल्या कुंपणांमुळे गव्यांच्या नैसर्गिक पाऊलवाटांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. ज्यामुळे त्यांचा अधिवास अधिकच संकुचित होत चालला आहे. जंगलात वाढणार्‍या वनस्पतींच्या परदेशी प्रजाती आणि संरक्षित वनात चरण्यासाठी सोडली जाणारी गुरे हेदेखील गव्यांचे नैसर्गिक खाद्य कमी होण्यामागील कारण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सहाजिकच जंगलातील कुरण कमी होतात आणि पाण्याचे स्रोत आटल्याने हे गवे गवत आणि पाण्याच्या शोधात जंगलाला लागून असलेल्या मनुष्यवस्तीत, शेतात आणि बागांमध्ये शिरतात. गवे हे कळपाने फिरत असल्यामुळे त्यांच्या चरण्यापेक्षाही या अजस्र प्राण्याच्या वावरण्यानेही शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यातूनच ‘मानव-गवा संघर्षा’ची निर्मिती होते. कोणत्याही प्राण्याच्या संवर्धनाचा विचार करताना प्रथम हा संघर्ष कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. शेतकरी शेतीच्या संरक्षणासाठी शेतात गस्त घालणे, कुत्रे पाळणे, काट्यांची आणि तारांची कुंपणे बनवणे इ. उपाययोजना करतात. परंतु, यातील गस्त घालणे सोडल्यास बाकी सर्व उपाय हे संघर्ष वाढवण्यास कारणीभूत ठरतात. या संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे जास्त गरजेचे आहे आणि त्यासाठी अभ्यासात्मक दृष्टिकोन वापरणे आवश्यक आहे. संघर्षाच्या ठिकाणावरील स्थानिक अडचणी जाणून घेणे, गव्यांचा अधिवास असणार्‍या ठिकाणी कुरणे तयार करून बारमाही पाण्याची व्यवस्था करणे आणि जंगलात चरायला जाणार्‍या पाळीव गुरांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. तसेच गवा आणि इतर प्राण्यांचे जंगलातील भ्रमणमार्ग (जोड रस्ते) ओळखून त्यांना संरक्षितक्षेत्र म्हणून घोषित करावे. या सर्व उपाययोजना गव्यांचे संवर्धन तसेच मनुष्य संघर्ष कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
 
@@AUTHORINFO_V1@@