रायगड - उरणमध्ये अजस्त्र रानगव्याचे दर्शन

    05-May-2025
Total Views |
indian gaur in uran



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
उरण तालुक्यातील चिरनेर गावात भारतीय रानगव्याचे दर्शन घडले आहे (gaur in uran). गेल्या दोन महिन्यांपासून या भागात फिरणाऱ्या रानगव्याचे छायाचित्र टिपण्यास सोमवार दि. ५ मे रोजी 'फ्रेंड्स ऑफ नेचर' (फॉन), चिरनेरच्या वन्यजीव अभ्यासकांना यश मिळाले (gaur in uran). उत्तर सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये रानगव्यांचा संचार वाढला असून त्याचाच हा एक पुरावा आहे. (gaur in uran)

रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यांतील फणसाड अभयारण्यात जानेवारी २०२०, मध्ये गव्याचे अस्तित्व प्रथमच नोंदले गेले होते. त्यानंतर गतवर्षी अगदी पनवेलमध्येही आढळलेल्या गव्याला वन विभागाने रेस्क्यू केले होते. आता मात्र, उरण तालुक्यात गव्याचे दर्शन घडले आहे. चिरनेर परिसरातील जंगलांमध्ये गव्याचे दर्शन होणे ही एक दुर्मीळ घटना आहे. उरणमधील फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन ) संस्थेचे वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर आणि संस्थेचे सदस्य हिम्मत केणी,दिनेश चिरनेरकर यांना चिरनेर येथील शेतकरी आकाश गोंधळी या शेतकऱ्याने सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोठा बैल दिसल्याचे कळवले. त्यानुसार संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना शेताच्या बाजूला रानगवा आढळून आला. त्यांनी लागलीच या गव्याचे छायाचित्र टिपले.

२ मार्च २०२५ पासून चिरनेर परिसरातील काही स्थानिक आदिवासीना जंगलात गवा दिसत आहे. १७ मार्च रोजी कल्पेश म्हात्रे यांच्या मळ्यात महाकाय बैल सदृश्य प्राणी येऊन गेल्याचे त्यांनी कळविले होते. त्यावेळी फॉन संस्थेचे सदस्य यांनी जाऊन पाहणी केली होती आणि त्यात तो गवा असल्याचे निष्पन्न होत होते. मात्र, छायाचित्रित पुरावा उपलब्ध नसल्याने त्याचे अस्तित्व उघड करता येत नव्हते. ५ मे रोजी आकाश गोंधळी यांच्या शेताजवळ गव्याचा छायाचित्रीत पुरावा फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) चिरनेरच्या वन्यजीव अभ्यासकांना मिळाल्याने गव्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असून उरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी.कोकरे यांनी स्थानिक ग्रामस्थांना वन्यप्राण्यांच्या हालचालींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गव्याचे अस्तित्व हे परिसरातील जैवविविधतेचे आरोग्य दर्शवते आणि पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वपूर्ण आहे.