'सघन मिशन इंद्रधनुष'चे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2021   
Total Views |

mission_1  H x
 
 
कोरोना महामारीत सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी विविध आघाड्यांवर काम करत देशातील जनतेमध्ये व्यापक जनजागृती केली. त्यामुळे भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. जागतिक पातळीवर कोरोनावर मात करण्यासाठी भारत सरकारने लसीकरणाबाबत केलेल्या कामाची दखल घेण्यात आली. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये लसीकरणासाठी केंद्र सरकारने विविध योजनांद्वारे जनतेला आणि प्रशासनाला लसीकरण करण्यास प्रवृत्त केले. यामध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून २०२० पर्यंत देशातील सर्व बालकांना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आणण्यासाठी दि. १५ डिसेंबर, २०१४ रोजी 'मिशन इंद्रधनुष अभियाना'ला सुरुवात करण्यात आली. २०१८ पर्यंत दोन वर्षांखालील बालके आणि गर्भवती स्त्रियांचे लसीकरण करण्यासाठी सदर अभियान सुरू करण्यात आले. यामध्ये दि. ८ ऑक्टोबर, २०१७ मध्ये गुजरातच्या वडनगरमध्ये 'सघन मिशन इंद्रधनुष' या अभियानाची सुरुवात करण्यात आली. बालके आणि गरोदर माता यांच्या प्रतिकारशक्तीसाठी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेले हे महत्त्वाचे अभियान कोरोनाच्या महामारीनंतरसुद्धा सुरू ठेवण्यात आले. या अभियानाची व्यवस्था कोरोनाच्या लसीकरणासाठी वापरण्यात येऊन दि. १९ फेब्रुवारी रोजी 'सघन मिशन इंद्रधनुष ३.०'ची सुरुवात करण्यात आली. यामध्ये दोन टप्प्यांमध्ये देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २५० जिल्ह्यांमधील शहरीभागामध्ये लसीकरण केले जात नाही, अशा भागामध्ये बालके आणि गरोदर स्त्रियांचे लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मागील वर्षांत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये ९.५ लाख बालके आणि २.२ लाख गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यामध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे, बालके आणि गरोदर मातांचे लसीकरण करण्यामध्ये 'सघन मिशन इंद्रधनुष ३.०' या अभियानाने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच येत्या काळामध्ये देशातील लसीकरण प्रक्रियेमध्ये 'सघन मिशन इंद्रधनुष' अभियानामुळे देशातील बालके आणि गरोदर मातांचे लसीकरणामुळे निरोगी बालकांचा जन्म होण्यास अभियानाचा महत्त्वाचा वाटा असणार आहे.

कायद्याचे नियंत्रण हवे!

मुंबईसारख्या स्वप्ननगरीमध्ये अभिनेता-अभिनेत्री होण्यासाठी रोज हजारो युवक-युवती मोठ्या आशेने दाखल होतात. 'चंदेरी दुनिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळविण्यासाठी काही कलाकारांना अख्खे आयुष्य पणाला लावावे लागते, तर काहींना त्यांच्या कामातून संधीही मिळते. परंतु, जीवघेणी स्पर्धा असणाऱ्या या क्षेत्रामध्ये संधी देण्यासाठी 'कास्टिंग काऊच'सारखा प्रकार तसा नवीन नाहीच. यापूर्वीही हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकांनी वेळोवेळी या गैरप्रकाराबाबत वाचा फोडली असतानासुद्धा अजूनही या क्षेत्रात या प्रकारांना पूर्णविराम लागलेला नाही. मराठी चित्रपटसृष्टी याला अपवाद आहे, असे म्हणताना आता मराठी मालिकांमध्ये काम देण्यासाठीसुद्धा 'कास्टिंग काऊच'सारखा प्रकार घडत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. नुकत्याच एका बहुचर्चित मराठी मालिकेमध्ये काम मिळण्यासाठी मालिकेच्या सदस्यांपैकी एकाने अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. तेव्हा मराठीमध्येसुद्धा 'कास्टिंग काऊच'ची कीड लागल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनानंतरच्या काळामध्ये मनोरंजन क्षेत्राला उभारी मिळत असताना संधी मिळण्यासाठी नायिकांकडे शरीरसुखाची मागणी केली जात असेल, तर ती कलाक्षेत्रासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. चित्रपट-मालिका यांसारख्या असंघटित क्षेत्रामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून सदोष कार्यपद्धती निर्माण करणे गरजेचे असून, ज्या नायिकांना असे अनुभव येतील, त्यांनी रितसर पोलीस, महिला आयोग यांच्याकडे तक्रार करणे गरजेचे असणार आहे. काही दिवसांपूर्वी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्याविरोधात एका नवोदित अभिनेत्री पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेली असता तिलाच 'सेटलमेंट करणार का?' असा प्रतिप्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून निर्मात्याला समजही देण्यात आली. त्यामुळे चित्रपट, मालिकासृष्टीमध्ये अभिनेत्री म्हणून आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या मुली-महिलांनी असे प्रकार घडत असल्यास कदापि गप्प न राहता किंवा त्याबाबत काही वर्षांनी खुलासा न करता, थेट पोलीस यंत्रणा, महिला आयोग, सामाजिक संस्था आदींकडे धाव घेऊन त्याबाबत तक्रार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबरच निर्माते, भूमिका आरेखक यांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निर्माण केेले तरच 'कास्टिंग काऊच'रुपी कलंक या क्षेत्रातून मिटू शकेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@