कंगाल पाकची कबुली

    26-Nov-2021
Total Views | 116

imran khan_1  H
 
पाकिस्तानला विदेशी कर्जातून संपूर्णतः मुक्त करण्याची वल्गना करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना आता आणखी एक नवसाक्षात्कार झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘ट्रॅक अ‍ॅण्ड ट्रेस सिस्टीम’च्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पाकिस्तान कंगाल झाल्याची कबुली इमरान यांनी दिली. ते म्हणाले की, “देश चालवण्यासाठी पुरेसे पैसे नसणं हे सर्वात मोठे आव्हान आहे. परकीय सत्तांकडून उधार पैसे घ्यावे लागत असल्याने पाकवरील कर्जाचा बोजा दिवसागणिक वाढत चालला आहे. उत्पन्न कमी असून खर्च मात्र जास्त आहे आणि यातही तिजोरी मात्र रिकामीच. करप्रणाली सुरळीत झालेली नसून अनेक नागरिकांनी करचुकवेगिरी केली आहे.” आता करवसुलीही नागरिकांच्या हितासाठीच असते. इमरान यांना पाकिस्तानच्या जनतेचे सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस समर्थन मिळाले होते. पाकिस्तानला कर्जमुक्तीसारख्या आश्वासनांचा भडिमार करत नंतर मात्र, पाकच्या जनतेला करांच्या ओझ्याखाली दाबण्याचं काम इमरान यांनी केलं. कर्ज फेडण्यासाठी आता पाकिस्तानवर दुसर्‍या देशांकडून कर्ज घेण्याची नामुष्की ओढावली. अलीकडेच ‘आयएमएफ’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला होता. परिणामी, ‘आयएमएफ’ची मनधरणी करण्यासाठी पाक सरकारने जनतेलाच लुटण्यास प्रारंभ केला. पेट्रोल, डिझेल आणि विजेच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ करून महागाईत सरकारने आणखी तेल ओतण्याचे काम केले. बरं, हे दर वाढवूनही परकीय सत्ता आणि ‘आयएमएफ’ काही पाकवर प्रसन्न झाले नाही. त्यामुळे इमरान यांचे लक्ष जनतेऐवजी फक्त कुठे भीक मिळते का, याकडेच लागले आहे. दुसरे देश कर्ज देत नाही, म्हटल्यावर आता इमरान यांच्यावर देश कंगाल झाल्याच्या वास्तवाची कबुली देण्याची वेळ आली आहे. आता त्यांना कर्जाची भीक मिळण्याचे एकमेव हक्काचे ठिकाण शिल्लक राहिले आहे आणि ते ठिकाण म्हणजे, विस्तारवादी आणि धोकेबाज म्हणून जगप्रसिद्ध असलेला चीन किंवा सतत अस्थिर असलेले आखाती देश. २०२० पर्यंत पाकने १७.१ अब्ज ‘युएस’ डॉलरचे कर्ज घेतले असून त्यापैकी चीनचा वाटा १५ टक्के आहे, जो पाकच्या ‘जीडीपी’च्या ६.१५ टक्के इतका आहे. इमरान पंतप्रधान झाल्यापासून कर्ज घेण्याचे हे प्रमाण तब्बल १८५ टक्क्यांनी वाढले आहे.
 
दरम्यान, पाकिस्तानच्या विनंतीखातर ‘आयएमएफ’ने पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी तब्बल सहा अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली होती. याचाच एक हप्ता म्हणून एक अब्ज डॉलर पाकला मिळणार होते. मात्र, नेहमीप्रमाणे अटींचे पालन न केल्याने ‘आयएमएफ’ने पैसे देण्यास नकार दर्शवला. काही दिवसांपूर्वीच पाक सरकारने संसदेत प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर सरासरी १ लाख, ७५ हजार रूपयांचे कर्ज असल्याची कबुली दिली होती. यात इमरान खान सरकारचे योगदान ५४ हजार, ९०१ इतके असून हे प्रमाण कर्जाच्या एकूण रकमेच्या ४६ टक्के इतके आहे. विशेष म्हणजे, कर्जाचा हा भार अलीकडील दोन वर्षात म्हणजे इमरान पंतप्रधानपदी असतानाच वाढल्याने त्यांच्याविरोधात पाकिस्तानी जनतेत प्रचंड रोष आहे. देशाला कर्जमुक्त करून ‘रियासत-ए-मदिना’ बनवू पाहणारे इमरान आपल्या घरात लक्ष देण्याऐवजी दुसरीकडे काय शिजतंय, याचा गंध घेण्यातच धन्यता मानताना दिसतात. इमरानबरोबरच त्यांचे मंत्रीदेखील अतिशय उच्चविद्याविभूषितच म्हणावे लागतील. नुकतेच त्यांच्या सूचना आणि प्रसारण मंत्र्यांनी ‘गार्लिक’ म्हणजे ‘अद्रक’ अशा भन्नाट ज्ञानाच्या पुड्या ट्विटरवर वाटल्या. आता खुद्द पंतप्रधानावरच कटोरा घेऊन फिरण्याची वेळ येत असेल, तर बिचार्‍या मंत्र्यांनी तरी या स्पर्धेत मागं का राहावं म्हणा! तिकडे इमरान देश कंगाल झाला म्हणून बोंबलत आहेत आणि इकडे यांचे मंत्री त्यांची बुद्धी कंगाल झाल्याचे निर्लज्जपणे दाखवून देत आहे.
 
एका अहवालानुसार, पाकिस्तानला पुढील दोन वर्षांत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ९ लाख, ९२ हजार कोटी रूपयांची गरज पडणार आहे. त्यामुळे ‘सावध ऐका पुढल्या हाका’ या उक्तीप्रमाणे इमरान खान यांनीच स्वतःहून कंगाल झाल्याचे मान्य केले. तरीही ‘घरात नाही गहू आणि म्हणे कलर टीव्ही घेऊ’ अशी पाकिस्तानची गत! कारण, पोट भरण्यासाठी भाकरी लागते, बंदुकीची गोळी नाही. पाकला ही गोष्ट लवकर समजली तर ठीक, अन्यथा फार उशीर झालेला असेल.
 
 
- पवन बोरस्ते
७०५८५८९७६७
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार करते!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार करते!

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खऱ्या अर्थाने मुक्त पत्रकारितेचा पुरस्कार केला " असे प्रतिपादन द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संचालक अनंत गोयंका यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मुंबई आयोजित रौप्य महोत्सवी देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा २०२५ येथे ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर जोगळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मुळे, निबे ऑर्डनन्स अँड मेरीटाईम लिमिटेडचे गणेश निबे, एडलवाईस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121