इंटरनेट ३.०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2021   
Total Views |

Web 3.0_1  H x
मानवाच्या इतिहासामध्ये संगणकानंतर सर्वांत मोठी क्रांती घडविली ती इंटरनेटने! मानवी आयुष्यात मोठी उलथापालथ घडविणाऱ्या आणि अद्याप घडवत असणाऱ्या इंटरनेमुळे आज संपूर्ण जगाचे कामकाज अतिशय सुरळीत चालले आहे. त्यामुळेच अगदी एका सेकंदासाठी जरी इंटरनेट सेवेवर परिणाम झाला तरीही संपूर्ण जग काही तासांसाठी ठप्प होते. इंटरनेट अर्थात वेबच्या पहिल्या आणि दुसऱ्या व्हर्जनने जगात अनेक बदल घडविले. त्यांचे महत्त्व एवढे आहे की, एखाद्या देशातील सरकार बदलणे, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ठप्प करणे आदी कामे अगदी कमीत कमी वेळात करणे शक्य होते. त्याचप्रमाणे जगात सकारात्मक बदल घडविण्यासाठीदेखील त्याचा सर्वांधिक लाभ होतोच. त्यामुळे आता ‘इंटरनेट ३.०’ मानवी जीवनात दाखल झाले आहे. त्यामुळे त्याचा मानवी इतिहासावर होऊ पाहणारा परिणाम पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
‘इंटरनेट १.०’च्या युगात माहिती कशाप्रकारे वापरली जाते किंवा एखाद्या माहितीवर प्रक्रिया कशी होते यावर अधिक भर देण्यात आला होता. ‘याहू’, ‘नेटस्केप’, ‘क्रेग्सलिस्ट’, ‘एओएल’ या सर्वांचा ‘वेब १.०’ कंपन्यांमध्ये समावेश होतो. यात गूगलने माहितीचे ‘लोकशाहीकरण’ घडवून आणले. इंटरनेटच्या दुसऱ्या युगात म्हणजेच ‘इंटरनेट २.०’ मध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, रेडीट, लिंकडिन यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा जन्म झाला. या प्लॅटफॉर्म्सनी माहिती, वस्तू आणि सेवा यांना एका छत्राखाली आणण्याचे काम केले. याच काळात कॅब बुक करण्यासाठी, सहली किंवा डेटवर जाण्यासाठी आणि अनोळखी व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी करण्यास सुरुवात केली. ‘उबर’ या अ‍ॅपवर तुम्ही कॅब बुक करू शकता किंवा गाडी चालवून त्यातून पैसे कमवू शकता. इन्स्टाग्रामवर काहीना काही पोस्ट करणे, व्हिडिओ पाहणे हे नित्याचे झाले आहे. याचाच परिणाम म्हणून ‘इन्फ्लुएन्सर’ ही नवी जमात उदयाला आली आहे. ‘पीअर टू पीअर’ (पी २ पी) माहितीची देवाणघेवाण हे ‘वेब २.०’चे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘इंटरनेट २.०’ हे मानवी जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी कारण ठरत आहे.
मानवी जीवनातील अर्थकारणामध्ये समाजाची भूमिका समजण्यासाठी व त्याला आकार देण्यासाठी ‘वेब ३.०’ ही एक विलक्षण संधी आहे. योग्य संरचनात्मक निर्णय, प्लॅटफॉर्म, सभासद आणि धोरणकर्त्यांसह, सह-मालकी असलेला, सहचलित व सह-निर्मित आदर्श समुदाय त्याद्वारे निर्माण करता येऊ शकतो. हा समुदाय तुलनेने अधिक न्याय्य आणि समतावादी ठरू शकेल, अशी शक्यता सध्या तरी व्यक्त करण्यात येत आहे.
‘वेब ३.०’ युग एक विशिष्ट प्रकारचे डिजिटल उत्पादन आहे. हे उत्पादन सह मालकी, सहनिर्मित आणि सहचलित असल्यामुळे जगभर त्याचा गाजावाजा अगदीच अल्पकाळात झाला आहे. अर्थात, हे इंटरनेटचे तिसरे युग आहे. यात विकेंद्रीकरण, संस्थांवरील ढळता विश्वास आणि मूल्य निर्मिती व कब्जा याच्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन यांवर अधिक भर असलेला दिसून येत आहे. याचे पडसाद आपण जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेले पाहतोच आहोत. उदाहरणार्थ, ‘मिरर’ या प्लॅटफॉर्मचा वापर केल्यामुळे तुम्ही एका विशिष्ट समाजाचे सभासद होताच; पण त्यासोबत या माध्यमाची तुमच्याकडे सहमालकीही येते. आम्ही ‘मिरर’ला मोठ्या पातळीवर नेऊ इच्छितो. पण, तत्पूर्वी याचा गुणवत्तापूर्ण पाया सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आपल्याला प्रवेश देऊन वैयक्तिक सभासद बनवू इच्छितो, अशी जाहिरात करून ‘मिरर’ प्लॅटफॉर्मला प्रस्थापित केले जात आहे. यामध्ये सर्वसामान्य वापरकर्त्यांचाही थेट समावेश होत असल्याने त्याच्याकडे ओढा वाढताना दिसत आहे.
सध्या साप्ताहिक, वृत्तपत्रे, पॉडकास्ट, मास्टरक्लासेस आणि कोहॉर्ट-आधारित-अभ्यासक्रमांद्वारे ‘इंटरनेट ३.०’ हा सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त करत आहे आणि हळूहळू या गोष्टीचा लोकांनीही स्वीकार केला आहे. कोणत्याही समुदायाची घडण हेतूपुरस्सररीत्या व्हायला हवी. आधी समुदाय निर्माण झाला मग त्याची रचना, मूल्ये ठरवली गेली असे होता कामा नये. त्यामुळे ‘इंटरनेट ३.०’ मध्ये या सर्व बाबींचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे; अन्यथा ‘इंटरनेट ३.०’ देखील विशिष्ट गटाच्या हातचे बाहुले बनू शकते.
@@AUTHORINFO_V1@@