पुन्हा समुद्रमंथन...

    14-May-2025
Total Views |
पुन्हा समुद्रमंथन...

भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक दूरदृष्टी यांचा त्रिवेणी संगम साधत आता अथांग महासागराच्या गर्भाकडे पाऊल टाकले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी’मार्फत देशाची पहिली मानवी सहभाग असलेली ‘समुद्रयान’ ही ‘खोल समुद्र मोहीम’ 2026 अखेरीस प्रत्यक्षात येणार आहे. या मोहिमेमध्ये ‘मत्स्य’ हे पूर्णतः स्वदेशी बनावटीचे मानववाहक वाहन तीन वैज्ञानिकांना घेऊन सहा हजार मीटर खोल समुद्रात प्रवेश करेल. ही मोहीम भारताच्या सागरी धोरण व शाश्वत संसाधन विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, हे निश्चित.

‘समुद्रयान’ मोहिमेचा उद्देश केवळ खोल समुद्रात मानवी प्रवेश मिळवणे एवढाच नाही, तर सागरातील नैसर्गिक संसाधनांचे मूल्यांकन करणे, खोल समुद्रातील जैवविविधतेचा प्रत्यक्ष अभ्यास करणे, पर्यावरणीय स्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे आणि या सर्वांतून भारताच्या ‘ब्लू इकोनॉमी’ धोरणाला बळकटी देणे, असा आहे. खोल समुद्रातील कोबाल्ट, निकेल, मँगनीज यांसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांचे भांडार भविष्यातील तंत्रज्ञान, ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांच्या विकासासाठी अमूल्य ठरणार आहेत. ही संसाधने भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज करतील. या मोहिमेच्या अंमलबजावणीने भारत अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी आणि न्यूझीलंड यांच्यानंतर खोल समुद्रात मानवासह उतरणारा सहावा देश ठरणार आहे. विशेष म्हणजे, भारत हा एकमेव विकसनशील अर्थव्यवस्था असलेला देश असेल, ज्याने हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पाऊल उचलले आहे. त्यामुळे भारताने केवळ तांत्रिक क्षेत्रात उंची गाठलेली नाही, तर उर्वरित विकसनशील राष्ट्रांसाठी एक यशस्वी, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सुलभ असा नवा आदर्श उभा केला आहे. ‘मत्स्य’ हे वाहनच या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाची कामगिरी पार पाडणार आहे. भारतीय अभियंते, संशोधक आणि जलतंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे फलित म्हणजे ‘मत्स्य’ होय. खोल समुद्रातील जवळपास आठ हजार पाऊंड प्रति चौरस इंच इतक्या दाबाचा सामना करणारी ‘टायटॅनियम’ संरचना, जीवसुरक्षेची संपूर्ण खात्री, संवाद व्यवस्था, उच्च तंत्रज्ञानयुक्त या वाहनाची निर्मिती भारताने केली आहे. यातील बरेच भागही हे स्वदेशी बनावटीचेच आहेत. ही भारताची केवळ वैज्ञानिक प्रगती नाही, तर ‘मेक इन इंडिया’च्या यशाची उदाहरणेदेखील आहेत. या मोहिमेमुळे भारतात खोल समुद्र संशोधनासाठीची एक स्वतंत्र औद्योगिक परिसंस्था उदयास येऊ शकते. भविष्यात अशा मानववाहू वाहनांची गरज जागतिक स्तरावर भासेल आणि त्या मागणीच्या पूर्ततेसाठी भारताकडे बघणारे देश भारताला तंत्रज्ञान पुरवठादार राष्ट्र म्हणून स्वीकारतील. यातून संशोधन, उत्पादन, शिक्षण, अभियांत्रिकी व निर्यात यांचे नवे चक्रच देशात निर्माण होईल.

भारताच्या अर्थव्यवस्थेत सागराची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. देशाच्या एकूण व्यापारापैकी 95 टक्के मालवाहतूक समुद्रमार्गे होते. भारताच्या 7 हजार, 500 किमी लांब असलेल्या समुद्रकिनारी व्यापारी बंदरे, मासेमारी, पर्यटन, ऊर्जा उत्पादन हे सर्व मिळूनच सागराशी निगडित व्यापक अर्थकारण चालते. त्यामुळे खोल समुद्रातील संशोधन म्हणजे, भारताच्या समुद्रसंपत्तीचे सामर्थ्य उलगडण्याचा शास्त्रीय प्रयत्न आहे. या मोहिमेचा धोरणात्मक पातळीवरील दृष्टिकोन हा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीच्या प्रवासातील पुढचा टप्पा आहे. एकीकडे भारत अंतराळात मानव पाठवत असताना, दुसरीकडे सागराच्या गर्भातही मानवी प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. हा समांतर विकास म्हणजे भारताच्या संतुलित धोरणशक्तीचे द्योतक आहे.

या वैज्ञानिक प्रयत्नांकडे केवळ तंत्रज्ञान म्हणून न पाहता, भारतीय विचारधारेच्या पटलावरूनही पाहणे आवश्यक आहे. कारण, सागराशी भारताचा संबंध केवळ भौगोलिक नसून सांस्कृतिकही आहे. प्राचीन काळापासून ‘समुद्रमंथन’ची गोष्ट भारतीय मनात खोलवर रुतलेली आहे. ही गोष्ट म्हणजे, अथक प्रयत्न, सहयोग, धैर्य, बुद्धिमत्ता आणि विज्ञान यांचे प्रतीक आहे. भारताची ही ‘समुद्रयान’ मोहीम म्हणजे आजच्या काळातील समुद्रमंथनच! आज भारत पुन्हा सागरात दडलेल्या नव्या अमृताच्या शोधात आहे. भारताची ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः’ या धोरणामुळे या अमृताचा शोधाचा लाभ जगाच्या कल्याणासाठी होईल, हे निश्चित!