जगभरातील दहशतवादी कारवायांबाबत जेव्हा कोणीही ‘शून्य सहिष्णुता’ या शब्दांत भूमिका मांडत असतो, तेव्हा सहजच अपेक्षा असते की, त्या राष्ट्राच्या कृतीतही तितकीच स्पष्टता आणि सुसंगती दिसावी. मात्र, गेल्या काही दशकांतील घडामोडी पाहता, अमेरिकेने दहशतवादासंदर्भात घेतलेली भूमिका ही संधीसाधूच म्हणावी लागेल. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे, अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य सल्लागार मंडळावर इस्माईल रॉयर आणि शेख हामझा युसूफ या दोघांची नेमणूक ट्रम्प प्रशासनाने केली आहे. यांचे ‘अल-कायदा’, ‘लष्कर-ए-तोयबा’ यांसारख्या दहशतवादी संघटनांशी उघड संबंध होते. तसेच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या सौदी दौर्यात अहमद अल शरा या दहशतवाद्याची घेतलेली भेट आणि त्याचे केलेले कौतुक हे या दुटप्पी धोरणाचे ताजे उदाहरण ठरावे.
दहशतवादाविरोधातील जागतिक संघर्षात अमेरिका ही नेहमीच अग्रस्थानी असल्याचा आभास निर्माण केला जातो. मात्र, वास्तविक इतिहास वेगळेच सांगतो. 1980 सालच्या दशकात सोव्हिएतविरोधी लढ्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात तालिबान व इतर कट्टरपंथी गटांना प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे व बक्कळ निधी पुरवला. त्या कृतीने संपूर्ण मध्य आशियाला अस्थिर केले आणि नंतर त्याच तालिबानींच्या जीवावर अमेरिका उठली. इराकमध्येही अमेरिकेने संहारक अस्त्रे असल्याच्या कारणावरून सद्दाम हुसेनला सत्तेपासून दूर केले. मात्र, त्याआधी त्याच सद्दामला इराणविरोधात अमेरिकेच्या बाजूने उभे केले गेले होते. जी व्यक्ती वा गट अमेरिकेच्या भूमिकेला साथ देतात, त्यांना अमेरिका ‘सहकारी’, तर विरोध करणार्यांना ‘दहशतवादी’ ठरवते, हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे मूलभूत सत्य. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिका सजग झाली खरी; पण ती सजगता आपल्या देशापुरतीच मर्यादित राहिलेली दिसते. इतरांसाठी ती भूमिका केवळ औपचारिकताच ठरली.
अमेरिकेची सर्वांत मोठी चूक म्हणजे दहशतवादाच्या व्याख्येबाबतचा तिचा सोयीस्कर दृष्टिकोन. कोणाला ‘दहशतवादी’ ठरवायचे आणि कोणाला ‘धार्मिक नेतृत्व’ किंवा ‘स्वातंत्र्यसैनिक’ मानायचे, हे नेहमीच अमेरिकेच्या सामरिक आणि आर्थिक हितसंबंधांवर आधारित असते. म्हणूनच अफगाणिस्तानात कधीकाळी तालिबानचे समर्थन करणारी अमेरिका, आज त्या तालिबानशी शांतता करार करताना दिसते. याचा अर्थ असा की, अमेरिकेच्या धोरणांमध्ये मूल्यांपेक्षा आर्थिक गणितेच अधिक महत्त्वाची ठरतात.
अमेरिकेच्या या दुटप्पी आणि निवडक दहशतवादविरोधी भूमिकेमुळे ‘गरजेल तो पडेल काय?’ अशीच अमेरिकेची अवस्था झाली आहे. जगातील लहान आणि उदयोन्मुख राष्ट्रांसाठी हा अमेरिकेचा धोरणात्मक बदल गोंधळ निर्माण करणारा ठरतो. अशा भूमिकांमुळेच जागतिक शांतताही धोक्यात आली आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या दहशतवादाविरोधातल्या स्वार्थी धोरणाचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे विविध देशांत दहशतवादी संघटनांना मिळणारी संधी! जेव्हा अमेरिकेसारखी महासत्ता स्वतः दहशतवादाच्या व्याख्येत लवचिकता दाखवते, तेव्हा इतरांसाठीही तो आदर्श मार्ग ठरतो. यामुळेच जागतिक सुरक्षिततेचा पाया अधिकच कमजोर होत आहे.
जगात खर्या अर्थाने स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करायची असेल, तर दहशतवादाविषयीची भूमिका सार्वत्रिक, स्पष्ट व मूल्याधारित असली पाहिजे. अमेरिका व इतर महासत्तांनी आपल्या हितसंबंधांच्या पलीकडे पाहून सार्वभौम राष्ट्रांच्या सुरक्षा आणि विकासाच्या दृष्टीने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारे दहशतवाद्यांना थेट वा अप्रत्यक्ष मान्यता देणे, हे केवळ त्या राष्ट्राच्या नैतिक अधःपतनाचे लक्षण नसून, जागतिक अस्थिरतेचे बीज त्यात असते. प्रशासन व धोरणनिर्मितीच्या पातळीवर अशी भूमिका तीव्रतेने उघड करणे, ही काळाची गरज आहे. कारण, जागतिक पातळीवर शाश्वत शांती व सुरक्षितता प्रस्थापित करायची असेल, तर दहशतवादाला स्वार्थी रणनीतीचा भाग म्हणून पाहणार्या प्रवृत्तींचा पाडाव करणे अत्यावश्यक ठरते, अन्यथा जागतिक शांततेच्या प्रत्येक भाषणांच्या नावाखाली फक्त फसवण्याचे कार्यक्रम सुरू राहतील आणि त्याचा विपरीत परिणाम वैश्विक शांततेवर होईल, हे नक्की!
कौस्तुभ वीरकर