ए रवी कामाच्या ठिकाणी किंवा अगदी नातेवाईकांशी संवाद साधताना जपून वगैरे बोलण्याचा सल्ला आजही घरच्या ज्येष्ठांकडून आवर्जून दिला जातो. राजकारणात तर डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवूनच संवाद साधावा, हा सर्वश्रुत नियम; अन्यथा त्याचे किती भीषण परिणाम सहन करावे लागतात, ते गल्लीपासून ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत आपण जाणतोच. पण, विषय नातेवाईक, राजकारणाचाही सोडा, त्याही पलीकडे परराष्ट्र संबंधाचा, कूटनीतीचा असेल, तर तिथे शब्द अन् शब्द हा अत्यंत काळजीपूर्वकच वापरायला हवा. मग ते राजदूत असो वा साक्षात देशाचा पंतप्रधान. हे आताच सांगायचे कारण म्हणजे, थायलंडच्या पंतप्रधान पेटॉन्गटार्न शिनावात्रा यांचे तेथील संविधानिक न्यायालयाने नुकतेच केलेले निलंबन!
त्याचे घडले असले की, थायलंड आणि कंबोडिया सीमेवर दि. 28 मे रोजी सैनिकांदरम्यान संघर्षाची ठिणगी पडली. त्यात एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर दि. 15 जून रोजी कंबोडियाच्या सेनेटचे अध्यक्ष हन सेन आणि थायलंडच्या पंतप्रधान पेटॉन्गटार्न शिनावात्रा यांच्यात दूरध्वनीवरून संभाषणही झाले. यावेळी शिनावात्रा यांनी सेन हे त्यांच्या वडिलांचे मित्र असल्यामुळे त्यांना ‘अंकल’ असे संबोधले. तेही ठीकच. पण, शिनावात्रा यांनी सेन यांना थायलंड सैन्याच्या एका कमांडरला ‘विरोधक’ संबोधत, त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका, असाही सल्ला दिला. पण, नेमके हे संभाषण कंबोडियाच्या सेन यांनीच लीक केले आणि शिनावात्रा यांच्यावर थायलंडमधून टीकेची झोड उठली. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्यक्ती इतक्या संवेदनशील मुद्द्यावर आपल्याच देशाच्या सैन्याविरोधात अशी भूमिका घेऊ शकते, हेच मुळी धक्कादायक. त्यावर शिनावात्रा यांनी देशाची माफीही मागितली आणि आपला उद्देश हा केवळ वाटाघाटींचा असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, थायलंडच्या संविधानिक न्यायालयाने शिनावात्रा यांना निलंबित केले आणि उपपंतप्रधान सुरिया जुआंगरूंगरूंगकिट यांची केवळ एका दिवसासाठी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड केली. आज तेथील संसदेत अधिकृतपणे नवीन पंतप्रधानपदाची निवडही केली जाईल. पण, या प्रकरणानंतर नेमका हन सेन यांच्यासह थायलंडच्या सैन्यानेही अगदी पद्धतशीरपणे पेटॉन्गटार्न शिनावात्रा यांच्या राजकीय प्रतिमेला सुरुंग लावला. थायलंडच्या राजकीय इतिहासात काहीसे डोकावले असता, यात धक्कादायक काही वाटू नये. कारण, ही तर तेथील शापित राजकीय इतिहासाचीच पुनरावृत्ती!
पेटॉन्गटार्न शिनावात्रा यांचे वडील थाकसिन शिनावात्रा हे थायलंडचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान. 2001 आणि 2005 साली त्यांचा पक्ष बहुमताने थायलंडच्या सत्तेवर बसला. पण, थाकसिन यांच्या समाजवादी धोरणांमुळे आणि वाढत्या प्रसिद्धीमुळे थायलंडमधील राजेशाही आणि लष्करी समर्थकांना पोेटशूळ उठला. 2006 साली थाकसिन विदेश दौर्यावर असताना, थाय सैन्याने बंडाचा झेंडा फडकावत सत्ता हस्तगत केली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्येही थाकसिनची बहीण, तसेच बहिणीचा नवराही पंतप्रधानपदी निवडून आले. पण, ते केवळ थाकसिनचे प्यादे ठरले. सरकारची सूत्रे देशाबाहेरूनही थाकसिन यांच्याच हाती एकवटलेली. अशाप्रकारे थायलंडच्या आजवरच्या इतिहासात शिनावात्रा घराण्याला कायमच सैन्याने राजकीय खेळी करून, सत्ताबाहेरचा रस्ता दाखवला. थाय सैन्य आणि राजेशाहीच्या आवाजात आवाज मिसळत वेळोवेळी न्यायालयांनीही शिनावात्रा घराण्याचा कुठलाही सदस्य देशाच्या राजकीय क्षितिजावर उगवणारच नाही, याची वेळोवेळी तजवीज केली. पक्षावर बंदी लादण्यापासून ते निवडणूक लढण्यास मनाई करण्यापर्यंत सगळे डावपेच खेळले गेले. आताही काहीसा असाच प्रकार पेटॉन्गटार्न शिनावात्रा यांच्याबाबत घडलेला दिसतो. एका बेसावध क्षणी त्यांचे संभाषण टिपून त्यांचा रीतसर काटा काढला गेला. त्यामुळे थायलंडमध्ये पुन्हा राजकीय घराणेशाहीला देशविरोधी असल्याचा काळीमाच फासला गेला असून, सैन्याचे पारडे पुन्हा जड होण्याचीच शक्यता अधिक!