बांगलादेशातील बलुचिस्तान

    15-May-2025
Total Views |
बांगलादेशातील बलुचिस्तान


दि.10 मे रोजी बांगलादेश संसद भवनाच्या हॉलमध्ये ‘युनायटेड पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट’ आणि ‘नॅशनल कन्सेन्सस कमिशन’ची बैठक होती. त्यामध्ये मायकल चकमा या चकमा-बौद्ध समाजाच्या नेत्याने चितगाव हिल्स ट्रॅक्टसच्या स्वायत्ततेची मागणी केली. पण, चितगाव हिल्स ट्रॅक्टसच्या स्वायत्ततेची मागणी ही नवीन नाही. यापूर्वीही मुस्लीमबहुल बांगलादेशमध्ये बौद्ध संस्कृती टिकवण्यासाठी चकमा समाजाने सातत्याने याविषयी तीव्र लढा दिला होता.


ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच बलुचिस्तानला स्वतंत्र व्हायचे होते, तसेच चितगाव हिल्स ट्रॅक्टसलाही बांगलादेशच्या निर्मितीपासूनच वेगळे व्हायचे वेध लागले होते. बलुचिस्तानप्रमाणेच चितगावदेखील खनिजे, जंगले आणि जैविक संसाधनांनी समृद्ध. पण, बलुचिस्तान असेल अथवा चितगाव, दोन्हीकडे बाहेरील लोकांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक आदिवासी त्रस्त आहेत. पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे बलुचींवर अत्याचार होतात, त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये बौद्ध समाजाच्या चकमा, मार्मा आणि जुम्मा समुदायांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या दोन्ही भागांत स्वायत्ततेच्या मागणीला ‘देशद्रोह’ म्हणून दाबण्याचा प्रयत्न झाला. पण, आज पाकिस्तान आणि बांगलादेश या भागातील हिंसेने हतबल आहेत. आज तर बलुचिस्तान हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात येण्याच्या वाटेवर आहे. तसेच, चितगावचीही त्याच दिशेने वेगाने वाटचाल आहे.


असो. चितगाव हिल्समधील आदिवासींनी स्वायत्ता आणि पुढे जाऊन स्वातंत्र्य मागण्याचे कारण काय? तर याचे मुख्य कारण होते, भाषा आणि संस्कृतीचा आधार घेत, 1971 साली झालेली बांगलादेशची निर्मिती. त्याचवेळी चितगाव हिल्स ट्रॅक्टसमधल्या धर्माने बौद्ध असलेल्या आदिवासी समाजाने या निर्णयाला विरोध केला. चकमा हिल ट्रॅक्टसमध्ये त्यावेळी 90 टक्क्यांहूनही अधिक चकमा, अराकानी (रखिने), मार्मा, त्रिपुरी, तन्चंग्या, चक, पंखो, मृ, बावम, लुशाई, ख्यांग, गोरखा, स्वदेशी असमिया, केओट (कैबर्ता), संथाळ आणि खुमी या आदिवासी समाजगटातील बांधवांची वस्ती होती. बौद्ध धम्माला मानणारे हे बांधव. त्यांची भाषा, संस्कृती बांगला भाषा आणि संस्कृतीपेक्षा सर्वार्थाने वेगळी होती. त्यावेळी बांगलादेशचे संस्थापक नेता शेख मुजिबुर यांनी चकमा समाजाचे राजनेता मनबेंद्र नारायण लार्मा आणि प्रतिनिधींना सांगितले की, “चितगाव हिल्स ट्रॅक्टसमधील सर्व आदिवासींची ओळख आणि अस्मिताही बंगाली असायलाच हवी.” त्यामुळे या बौद्ध समाजाच्या बांधवांची संस्कृती, भाषा धोक्यात येणार होती. लादली गेलेली संस्कृती आणि भाषा यांमुळे या परिसरात बांगलादेशविरोधात विद्रोह सुरू झाला. मनबेंद्र नारायण लार्मा यांनी समाजबांधवांना सोबत घेऊन ‘परबतिया चटगाँव जन संहिता समिती’(पीसीजेएसएस) या संघटनेची स्थापना केली. ‘पीसीजेएसएस’ने आदिवासी बांधवांना सैनिकी प्रशिक्षण दिले. या समाज सेनेने बौद्ध आदिवासी समाजावर अत्याचार करणार्‍या बांगलादेशच्या मुस्लीम सैन्यावर आणि परिसराबाहेरील लोकांवर सातत्याने हल्ला केला. या सेनेने अनेक दशके बांगलादेश सरकारच्या नाकी नऊ आणले.


चितगाव हिल्स ट्रॅक्टसमध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या कमी व्हावी, म्हणून मग 90 सालच्या दशकात बांगलादेश सरकारने या परिसरात बांगलादेशी मुस्लिमांना आणून वसवले. बौद्ध समाजाच्या या वस्तीमध्ये बौद्ध आणि मुस्लीम संघर्ष सुरू झाला. 1997 साली शेख हसीना सरकारने या चकमा बांधवांशी यशस्वी समन्वय केला. मात्र, याच काळात बांगलादेशमध्ये बांगला संस्कृती भाषा या ओळखीपेक्षा ‘शरिया, कुराण, मुस्लीम’ ही ओळख स्थापित होत होती. त्यामुळे चकमा समाजाच्या या बौद्ध बांधवांवर मुस्लीम संस्कृती लादण्यासाठी हिंसक प्रयत्न सुरू झाले. चकमा समाजही तोडीस तोड उत्तर देत राहिला. सध्या बांगलादेश कट्टरतावादी धर्मांधांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तिथे अल्पसंख्याकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. अशावेळी चितगाव हिल्स ट्रॅक्टसच्या चकमा समाजबांधवांनी पुन्हा एकदा बौद्ध धर्मसंस्कृतीसाठी आवाज उठवला आहे. अर्थात, बांगलादेशी मुसलमानांनी यावर त्यांच्या रीतीप्रमाणे हिंसक आंदोलन सुरू केली आहेत. यावर वाटते की, बलुचिस्तान स्वातंत्र्याच्या मार्गावर आहे. बांगलादेशातील चितगावलाही शुभेच्छा!