‘विभावरी अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिक’

‘गुरुकुल’ पद्धतीने ‘किराणा’ घराण्याची शिस्तबद्ध तालीम देणारी संस्था

    20-Oct-2021
Total Views | 104
vibhavari _1  H

 
सिद्ध गायिका विभावरी बांधावकर यांनी ‘विभावरी अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिक’ची स्थापना 2004 मध्ये ठाणे येथे केली. रियाझ करण्यासाठी लागणारे उपयुक्त वातावरण अ‍ॅकॅडमीस लाभले आहे. प्रसन्न वातावरण असणारा ‘साऊंड प्रुफ’, वातानुकूलित हॉल म्हणजे जसे काही संगीताचे देऊळ! ‘किराणा’ घराण्याची गायकी, प्रत्येक राग गायची खास लकब, रागाची सरगम, दमदार दमसास व सुरेल मांडणी अशा अनेक गोष्टी विभावरी एका वेळेस एक विद्यार्थी याप्रमाणे शिकवितात. अनेक विद्यार्थी येथे ‘गुरुकुल’ पद्धतीने अभ्यास करून ‘किराणा’ घराण्याच्या गायकीचे बारकावे आत्मसात करतात. संगीत संदर्भ ग्रंथालय, रेकॉर्ड्स, संगीतावर आधारित जवळ-जवळ ४०० ग्रंथ, संगीत मासिके, आवश्यक वाद्ये व साऊंड सिस्टीम अ‍ॅकॅडमीत उपलब्ध आहेत. ‘रियाझ’ करण्यासाठी लागणारे उपयुक्त वातावरण लाभल्यामुळे अनेक उत्तम शिष्य तयार झाले आहेत. अनेकांनी शास्त्रीय संगीतात नाव कमाविले आहे, तर काहींनी पार्श्वगायन म्हणून आपले करिअर निवडले आहे.  अनेक उत्तमोत्तम शिष्य विभावरी यांनी घडविले. त्यांच्या शिष्यगणांचा वयोगटदेखील मोठा आहे.

यात शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, मध्यमवयीन गृहिणी यांचा समावेश असतो. समाजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी ‘शंभो प्रतिष्ठान’, ‘संगीत संकल्प’, ‘स्वरेश्वरी’ अशा अनेक संस्था निर्माण केल्या. या संस्थाद्वारे संगीताशी निगडित असे अनेक उपक्रम राबविले जातात.  प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्यास राग सादर करण्याची संधी दिली जाते. त्यासाठी भरपूर तयारी करवून घेतली जाते. ‘स्वरेश्वरी’मध्ये सांगतिक साथ देणार्‍यादेखील बर्‍याच वेळा अ‍ॅकॅडमीच्या शिष्या असतात. हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग असतो. संगीतप्रेमीसाठी ती सांगीतिक पर्वणी असते. विद्यार्थ्यांचे ‘स्टेज फिअर’ जाण्यासाठी त्यांना गाण्याच्या अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. एखाद्या विषयाला धरुन कार्यक्रम आखला जातो.
 
 

अ‍ॅकॅडमीने नुकताच सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा 88वा वाढदिवस साजरा केला. त्यात आशाताईंची अविट गोडीची हिंदी-मराठी गाणी सादर करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी उत्सव साजरा करण्यात येतो. गुरुदक्षिणा म्हणून त्या दिवशी शिष्यगण आपली उत्तमोत्तम कलाकृती सादर करतात. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे गुरुपौर्णिमा ‘ऑनलाईन’ सादर करण्यात आली. या अ‍ॅकॅडमीच्या देशातील आणि परदेशातील अनेक शिष्यांनी भाग घेऊन गुरुप्रतिची आदरभावना व्यक्त केली. ‘ऑनलाईन’ सांगीतिक कार्यक्रमांना बर्‍याच मर्यादा असतात, तरीदेखील गेल्या दोन गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम बहारदार झाले.


विभावरी बांधावकर या पूर्वाश्रमीच्या शुभांगी भोळे. घरात संगीताला पोषक असे वातावरण होते. वडील शंकरराव भोळे यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. ते स्वत: संगीत नाटकात काम करायचे. अशा वातावरणात विभावरी यांनी वयाच्या सातव्या वर्षी शिरीषताई जोशी यांच्याकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांची संगीतातली प्रगती पाहून त्यांच्या वडिलांना त्यांना घराणेदार संगीताची तालीम देण्याचा निर्णय घेतला. ‘किराणा’ घराण्याचे ऋषितुल्य गायक पंडित फिरोझ दस्तुर यांचे शिष्य सूरमणी पंडित अच्युत अभ्यंकरांकडे ‘किराणा’ घराण्याची तालीम जवळ जवळ दोन तपे (24 वर्षे ) घेतली. ही तालीम गुरुशिष्य परंपरेत अखंड सुरू राहिली. पहाटे 4 पासून ‘रियाझ’ सुरू होत असे व संध्याकाळपर्यंत अविरत मेहनत अभ्यासवर घेतली जात असे. पुढे त्यांनी कला शाखेची पदवी घेतली, ग्रंथपाल पदविका घेऊन त्या विक्रोळीच्या ‘सेंट जोसेफ’ या शाळेत ग्रंथपाल म्हणून रुजू झाल्या. मात्र, त्यांची संगीत साधना चालूच होती. ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’ची ‘संगीत अलंकार’ ही पदवी त्यांनी प्राप्त केली. ‘किराणा’ गायकीचा एक उगवता तारा म्हणून त्यांची ओळख झाली. अनेक मान्यवर गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना लाभली. पुण्याच्या ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त त्यांनी गायनकला सादर केली आहे व त्यासाठी त्यांना ख्यातनाम गायक पं. भीमसेन जोशी यांचे आशीर्वाद लाभले. वाराणसीच्या दीपोत्सवात गेली कित्येक वर्षे त्या आपली सांगीतिक सेवा देतात. आपल्या गुरुजनांकडून मिळालेले संगीताचे ज्ञान पुढील पिढीस द्यावे, या उद्देशाने ‘विभावरी अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिक’ची स्थापना करण्यात आली.


ही अ‍ॅकॅडमी म्हणजे एक मोठे सांगीतिक कुटुंब आहे. काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांनी ताईंचा 60 वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. ठाण्याच्या ‘दोस्ती’ गृहसंकुलातील भव्य सभागृहात संगीत मैफील आयोजित करण्यात आली होती. पावसाळी वातावरणात विभावरीताईंनी राग ‘मल्हार’ सादर केला. विद्यार्थ्यांसाठी आणि संगीतप्रेमींसाठी ती पर्वणी होती. आपल्या गायनाने त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सुग्रास भोजनाने या सांगीतिक मैफिलीची सांगता झाली. संगीत हेच जीवन मानणार्‍या विभावरी यांनी अनेक मैफिली गाजविल्या. अनेक शास्त्रीय राग, नाट्यगीते, भजने त्यांनी सादर केली. कोरोना महामारीच्या काळातदेखील त्यांचे ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण सुरू होते. आता ‘ऑफलाईन’ प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. त्यांच्या या सांगीतिक प्रवासात त्यांना पती विजयराव, मुलगा अनुराग व स्नुषा आकांक्षा  यांची भक्कम साथ राहिली. ‘विभावरी अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिक’च्या भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा.
 
 


-
 
अग्रलेख
जरुर वाचा
सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन वाढीसाठी मुख्यमंत्र्यांकडून कालबद्ध कार्यक्रम - ३८१ सिंचन प्रकल्पातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्यातील ३८१ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ३० लाख ६८ हजार ६७३ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. तर ४५ उदंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ६२ हजार १२५ मेगावॅट वीज निर्मिती, तर ९६ हजार १९० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे विकासचक्र वेगवान करण्यासाठी सिंचन प्रकल्प आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबध्दरित्या गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १२ जून रोजी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121