मोक्षदा एकादशी
मोक्षदा एकादशी अर्थात मोक्ष देणारी एकादशी! याच शुभ दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ऐन समरांगणावर गीता सांगितली म्हणतात. पुष्कळांच्या मनात एक शंका येते की, ऐन समरांगणाच्या धुमश्चक्रीत भगवंताला संपूर्ण गीता सांगून अर्जुनाला उपदेश करायला वेळ कसा सापडला? ज्ञान देण्याकरिता वेळ लागत नाही. अर्जुनाला संदेह झाल्यावर भगवंतांनी त्याच्याकडे दृष्टीमात्र फिरविली आणि दृष्टादृष्ट होताच अर्जुनाचा मोह नाहीसा झाला व त्याला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली.
या ज्ञानावस्थेचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात, ’देवाचिये द्वारी। उभा क्षण भरी॥ तेणें मुक्ति चारी। साधियेल्या।’ शरीररूपी क्षेत्र म्हणजेच कुरूक्षेत्र आणि धर्मक्षेत्र होय. त्याच्या कर्मेंद्रियातील अविवेकी शक्ती म्हणजे कौरव, तर त्याचे जागृत पंचप्राण म्हणजे पांडव होत. जागृत शक्तिशाली साधक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्याला सदैव प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे त्याच्यातील वीर अर्जुन होय. अशा मोक्षदा एकादशीला भगवंत अर्जुनाला गीतोपदेश करतात. आज गीता सर्व जगाची माऊली झाली आहे.
श्री दत्तात्रेय जयंती
चतुर्दशीला किंवा पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती येते. विशेष करून तंत्रमार्गात देवीप्रमाणेच दत्तात्रेयांना फार महत्त्व आहे. परंतु, महाराष्ट्रातील भक्तजनांनी त्या सर्व योग आणि तंत्रमार्गावर मात करून दत्तात्रेयांना भक्तिमार्गी बनविले आहे. नामस्मरणाने श्री दत्तात्रेय प्रसन्न होतात, अशी भावना आहे. दत्तात्रेयांची जन्मकथा मात्र मोठी विचित्र आहे. नवीन पिढी आणि परधर्मी लोक आमच्या धर्मकल्पनांची बरीच टिंगल करतात. आमच्या बर्याचशा धार्मिक कथा अशाच विचित्र वाटतात. मात्र, त्यातील रहस्य कळल्यास आमच्या कथाकारांच्या बुद्धिकौशल्याबद्दल आदर वाटतो. दत्तजन्माची कथा भागवतात आली आहे ती अशी.
ब्रह्मदेवाच्या सप्त मानसपुत्रांपैकी एक म्हणजे अत्री ऋषी, त्यांची पतिव्रता पत्नी म्हणजे सती अनसुया. त्या कालात अनसुयेसारखी पतिव्रता दुसरी नव्हती. तिचा हेवा वाटून लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वतींनी अनसुयेचे पातिव्रत्य भंग करण्यास त्रिमूर्तींना आग्रह केला. एका पतिव्रता स्त्रीने दुसर्या पतिव्रतेचे पातिव्रत्य नष्ट करण्यास सांगावे हे आश्चर्य खरेच! पण, त्रिमूर्तींच्या पत्नींनी ते कर्म केले आणि त्रिमूर्ती अनसुयेची सत्त्वपरीक्षा पाहण्यास अवनीतलावर अवतरले. देवांना कोण व काय सांगणार?
अनसुयेचे पातिव्रत्य भंग करण्यास त्रिमूर्ती थेट अत्री ऋषींच्या आश्रमासमोर उभे ठाकले. अत्री ऋषी त्यावेळी स्नान-संध्यादीकर्मांकरिता गंगेवर गेले होते. परंतु, पातिव्रत्य धर्माने चालणार्या अनसुयेने अतिथींचे स्वागत केले. अनसुयेने त्यांची इच्छा विचारली आणि सांगितले की, तिचे पती अत्री ऋषी ब्रह्मकर्म करून लवकरच परततील. परंतु, त्रिमूर्तींना घाई झाली होती. त्यांनी तिला सुग्रास भोजन करून जेवायला वाढण्यास सांगतिले आणि तेसुद्धा साधेसुधे नाही तर नग्न होऊन! पतिव्रतेने पाहिले की अतिथी आपली परीक्षा घेण्याकरिता आले आहेत.
आपण पतिव्रता असल्याने आपल्यावर कामवासना काय परिणाम करणार? अतिथी आपली बालकेच आहेत, असा विचार मनात आणून अनसुयेने आपले वस्त्र काढले आणि वाढायला बाहेर आली. तो काय! तिथे अतिथी नसून तीन बालके रांगून रडत होती! पतिव्रतेच्या इच्छासामर्थ्याने ती अतिथी बाळे झाली. तिने पुन्हा वस्त्रं नेसली आणि एकेका बाळाला भरवू लागली. अत्री ऋषी मध्याह्नी घरी परतले आणि पाहतात तर तीन बालकांचा टाहो! अत्री ऋषींनी ध्यानदृष्टीने पाहिले तर त्यांना दिसले की, तीन बालके म्हणजे दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेशच होत. अत्रींनी त्रिमूर्तींना नमस्कार केला आणि अनसुयेला रहस्य सांगितले. ऐकून सती अनसुया धन्य झाली. अशा तर्हने दत्तात्रेयांचा जन्म झाला.
ही कथा आहे तशीच खरी मानल्यास ती एकतर अशक्य शिवाय अतिशय अनैतिक आहे. आमच्या देवांनी घाणेरड्या पद्धतीने वागावे हे सावध मनाला पटत नाही. खोलवर विचार केल्यास अजन्मा अशा देवांना आमच्यासारखी जड शरीरे नसणे बुद्धिसंगत आहे. देवता शक्तिरूपाने असू शकतात. देवतांना शरीरी मानणे निम्नस्तराच्या मनाचा व्यापार आहे. परंतु तो बहुजनांत आहे, हे तेवढेच खरे. देवतांना जडशरीरी मानण्याची पद्धत शास्त्रीय अशा वैदिक परंपरेत केव्हा शिरली, हे सांगणे कठीण असले तरी ती आज आहे, हे अमान्य करता येत नाही. त्यातील रहस्य काय आहे हे न पाहिल्यास व्यासांसारख्या विशाल बुद्धीच्या महापुरुषावर अन्याय केल्यासारखे होईल. कथेतील अत्री ऋषी, अनसुया आणि त्रिमूर्ती कोण? त्यांनी अनसुयेचे पातिव्रत्य भंग करण्यास का निघावे?
कथेमध्ये वृत्तींना वस्त्राची उपमा दिली आहे. वस्त्र शरीराला झाकते, तसेच मनातील चांगल्या-वाईट वृत्ती शुद्ध चित्ताला झाकतात. वृत्ती जोपर्यंत पूर्णपणे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत परमेश्वर दर्शन देत नसतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण, गोपिका स्नान (साधना) करीत असताना वस्त्रे पळवितात व माझे दर्शन हवे असेल तर निर्वस्त्र (वृत्तीरहित)होऊन माझ्याकडे या, असे सांगतात. या साधनेच्या कथा आहेत. अत्री ऋषी तेजस् तत्त्वाचे उपासक होते. अत्रतत्र सर्वत्र असलेले तेजस् तत्त्व अनुभवणारा महान साधक म्हणजे अत्री ऋषी. अनसुयेचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे ज्ञानमार्गाच्या मागोमाग जाणारी साधकाची अध्यात्म वृत्ती आणि दुसरे म्हणजे जिला असुया म्हणजे हेवा नाही ती अनसुया.
व्यापक तेजस् तत्त्वाचा अनुभव घेणारा श्रेष्ठ साधक स्वतःच्या तत्त्व अवधानात दुसर्या कोणत्याच वृत्तीला शिरकाव करू देत नाही. तेजस् तत्त्वात सर्व तत्त्वे तेजसमय म्हणजे (ज्ञानरूपच) बनतात. असल्या सर्वव्यापक अवस्थेत असुया ती कोणाची आणि कशाकरिता? अत्रीरूपी साधकाची असली वृत्ती अवस्था म्हणजेच त्याच्यासह आणि सदैव त्याचे आज्ञेत वागणारी पतिव्रता अनसुया होय. या परमबलवान अत्री साधकाच्या क्षेत्रात जगाची उत्पत्ती स्थिती आणि लयशक्तीचा काही शिरकाव न होऊन या शक्तींचे त्यांच्या अत्रीक्षेत्रात चालेनासे झाले, त्या विश्वशक्ती या अत्रीशक्तीशी संघर्ष करणारच! त्या शक्तीसंघर्षाचे वर्णन करण्याकरिता व्यासांनी ही दत्तजन्माची कथा सांगितली आहे. त्या कथेतील श्रेष्ठ साधना रहस्य कळल्याशिवाय साधकाला दत्तदर्शन घडणार नाही. पौर्णिमेच्या पूर्ण दिवशी त्रिमूर्ती भगवान दत्तात्रेयांचा साक्षात्कार करून दिल्यावर धन्य झालेला ’बलदा हेमंत’ अंतर्धान पावतो आणि शिशिर ऋतूला स्थान देतो. (क्रमशः)
- योगिराज हरकरे