रशियात लोकशाहीचे बीज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2021   
Total Views |

Russia_1  H x W
 
 
 
 
एलेक्सी नवेलनी यांच्या समर्थनार्थ रशियामध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. आता आपल्या भारतीय लोकांना याचे काही सोयरसुतक नाही. कारण, आपल्याकडे काही लोक कारण नसतानाही उगीचच रस्त्यावर उतरत असतात. तसेच या उगीचच आंदोलन-मोर्चे काढणाऱ्या लोकांना काही समाजविघातक लोक अन्नपाणी आणि आता तर फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवेल, अशी व्यवस्था असलेला तंबूही निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देतात. (दिल्लीचे बिनकामाचे शेतकरी आंदोलन याचे उत्तम उदाहरण!) तर अशा या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला या रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांबद्दल फारसे अप्रुप नसते. उलट सामान्य पापभिरू माणसे या असल्या रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांची मनातल्या मनात निंदाच करतात. असो. तर रशियामध्ये असे साधारण ४० हजारांपेक्षा जास्त नागरिक रस्त्यावर उतरले. तेथील तापमान सध्या उणे ५१ डिग्री सेल्सिअस. या असल्या अतिकडाक्याच्या थंड वातावरणात हजारो नागरिक रस्त्यावर का उतरले, हा प्रश्न जगाला पडला. कारण, अशा वातावरणात कितीही काळजी घेतली तरी हाडं गोठविणारे असे हे वातावरण. पण, तरीही बर्फमय वातावरणाला न जुमानता, हजारो रशियन रस्त्यावर एकवटले, ते केवळ एलेक्सी नवेलनी यांच्या समर्थनार्थ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात.
 
 
या आंदोलनकर्त्यांचे नारे आहेत ‘रशिया स्वतंत्र होणार, पुतीन चोर आहे.’ काही महिन्यांपूर्वी कुणी म्हटलं असतं की पुतीनला रशियात ‘चोर’ म्हटलं जाणार आहे, तर कुणीही विश्वास ठेवला नसता. कारण, ‘रशियाचा सर्वेसर्वा’ म्हणून पुतीन यांनी स्वत:ची भक्कम अशी प्रतिमा निर्माण केली होती. ‘रशिया आपल्या हातात आहे, लोक आपण जे बोलू तेच ऐकतील, आपल्याला कुणीही विरोध करूच शकत नाही,’ असे पुतीन यांना वाटत होते. अर्थात, या विधानाला अनेक सबळ घटना साक्षी आहेेत. पुतीन या विचारात होते की, कम्युनिस्ट राजवटीत तसेही शासनकर्त्याच्या विरोधात बोलणे हा गुन्हाच ठरावा. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने जनतेसाठी तर सोडाच, स्वत:च्या कार्यकर्त्यांबद्दलही फतवा काढला की, कुणीही कार्यकर्त्याने कम्युनिस्ट पक्षाबद्दल एक शब्दही प्रसिद्ध करू नये. यावरूनच कळते की, जगभरात जिथे कुठे कम्युनिस्ट सत्ताधारी आहेत, तिथे त्यांनी जनतेची मुस्कटदाबीच केली. जिथे ते सत्तेत नाहीत, तिथे ते देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात. कारण, त्यांना ‘राष्ट्र’ संकल्पना बहुतेक मान्य नसावी, तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे हे कारनामे, तर रशियाच्या कम्युनिस्ट पक्षानेही आपला मुस्कटदाबीचा अजेंडा इमानेइतबारेच राबविला. तिथेही सामान्य जनतेला प्रशासनाबद्दल प्रश्न विचारण्यास बंदीच आहे. प्रशासन जो निर्णय घेईल, तो ‘मम’ म्हणत मान्य करायचा. पुतीन यांनी काही महिन्यांपूर्वी रशियन संविधानात बदल केला. २०२४ नंतरही राष्ट्राध्यक्ष राहतील, असा बदल त्यांनी केला. पुतीन यांना वाटले की, कम्युनिस्ट राजवटीच्या चलनाप्रमाणे कुणीही त्यांना विरोध करणार नाही.
मात्र, एलेक्सी नवेलनी यांनी पुतीन यांना संविधानात बदल केला म्हणून विरोध केला. तसेच पुतीन यांच्या प्रशासनाचे भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास सुरुवात केली. हे सगळे रशियामध्ये नवीनच होते. मात्र, त्याचवेळी एलेक्सी आजारी पडले. त्यांना विषबाधा झाली. सुदैवाने ते बचावले. पण, नऊ महिने ते अंथरूणावर खिळून होते. जर्मनीमध्ये त्यांनी नऊ महिने उपचार घेतले. त्यानंतर ठणठणीत झाल्यावर ते रशियात परतले. मात्र, त्यांना पुतीन प्रशासनाने तत्काळ अटक केली. त्यांचा गुन्हा काय, हे सुद्धा स्पष्ट केले नाही. यामुळे रशियन जनता भयंकर संतापली. पुतीन यांनीच एलेक्सी नवेलनी यांच्यावर विषप्रयोग केला असावा, असेही जनता म्हणू लागली. पुतीन दोषी आहेत म्हणून ते एलेक्सीला घाबरतात, असे जनमत झाले. त्यामुळे ‘एलेक्सीला तुरूंगातून मुक्त करा’ असे म्हणत, रशियातील ७० शहरांतील लोक रस्त्यावर आले. यातील ३१०० नागरिकांना पुतीन प्रशासनाने अटक केली. तसेच एलेक्सी यांच्या पत्नी युलीया यांनाही तुरूंगात डांबले. स्वत:च्याच देशात निरपराध असताना हजारो लोक तुरूंगात डांबले गेले. यावर अमेरिका आणि इतर सर्वच पाश्चात्त्य राष्ट्रांनी कडक निषेध नोंदवला. कम्युनिस्ट रशियात आता लोकशाही चळवळीची बीजे रुजत चालल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.
@@AUTHORINFO_V1@@