दिग्गिराजाचा दान‘असुर’पणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2021   
Total Views |

Digvijay Singh_1 &nb
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या पक्षातच अडगळीत पडलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर निर्माणासाठी एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. पण, निधी संकलन करणाऱ्या रामभक्तांना नव्हे, तर त्यांनी हा धनादेश थेट पंतप्रधानांनाच दिल्लीला पाठविला. त्यासोबत दिग्गिराजांनी पंतप्रधानांना उद्देशून एक पत्रही जोडले. त्यात दिग्गिराजा म्हणतात, “मला राम मंदिर निर्माणासाठीचे पैसे कुठे पाठवायचे हे माहितीच नाही, म्हणून हा धनादेश थेट तुम्हाला (पंतप्रधानांना) पाठविला आहे.” एवढा उद्दामपणा कमी की काय, म्हणून यापूर्वीही विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माणासाठीचा निधी संकलनाचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणीही दिग्गिराजांनी या पत्रात केली. त्यामुळे हे दान नसून शुद्ध ढोंगीपणाचा कळस म्हणावा लागेल. त्यातच तो नेता ‘हिंदू दहशतवादा’सारख्या शब्दाचा साक्षात जनक असेल, तर त्यातील हा फोलपणा हा चव्हाट्यावर आणलाच पाहिजे!
एका राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या माणसाला निधी संकलन अभियान कोण राबविते आहे आणि कुठे राबविते आहे, याची साधी माहितीही असू नये, हा दावाच मुळी हास्यास्पद ठरावा. त्यामुळे दिग्गिराजांनी मोठ्या मनाने नव्हे, तर कोत्या मनाने केलेले हे खोडसाळ वक्तव्य अन् कृत्य म्हणावे लागेल. शिवाय, पंतप्रधानांना अशाप्रकारे धनादेश पाठवून दिग्गिराजांना नेमका कोणता संदेश समाजात द्यायचा आहे, हे न समजण्याइतपत जनता दूधखुळी नक्कीच नाही. दिग्गिराजांनी तर यापूर्वी ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे राम मंदिर निर्माणासाठीच्या निधीचा हिशोबही तोंड वर करून मागितला. पण, कदाचित दिग्गिराजा हे सपशेल विसरले की, तत्कालीन काँग्रेस सरकारनेच राम मंदिरावर बंदी आणत सर्व ट्रस्टचा कारभार आपल्या ताब्यात घेतला होता. एवढेच नाही, तर एका आयुक्ताकडे या ट्रस्टचा कारभार सोपविण्यात आला, जो काँग्रेसच्या हाताखालीच कार्यरत होता. त्यामुळे ज्यांनी नंतर ट्रस्ट पुन्हा हस्तांतरित केला, त्यांनीच या व्यवहाराचे तपशील तपासून पाहावे, असे प्रत्युत्तर ट्रस्टचे सदस्य कमलेश्वर चौपाल यांनी दिग्गिराजांना दिले. मग एवढाच अविश्वास या निधी संकलनावर असेल, तर दिग्गिराजांनी धनादेश दिलाच का? एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये, असे म्हणतात. पण, दिग्गिराजांच्या बाबतीत ‘हात’ही खोटे आणि दानही दिखाऊच!
 
काँग्रेसची खोटी रामभक्ती
 
दिग्गिराजांच्या या दान‘असुर’पणाने काँग्रेसची पुन्हा एकदा पोलखोल केली. राहुल गांधींची निवडणुकांपूर्वींची धावती मंदिरदर्शनं, राम मंदिराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काँग्रेसने केलेले स्वागत, प्रियांका गांधींनी रामनामाचे गायलेले गोडवे वगैरे हा फक्त आणि फक्त एक दिखावाच म्हणता येईल. काँग्रेसची सेक्युलर आणि मुस्लिमांचे लाड करणारा पक्ष अशी झालेली प्रतिमा बदलण्यासाठी आणि हिंदूंची मते पदरात घालण्यासाठीचा हा सगळा खटाटोप! त्यामुळे दिग्गिराजांनी एका हाताने राम मंदिरासाठी निधी देऊन, पुन्हा त्याच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हा काँग्रेसी दुटप्पीपणा आता जनतेपासूनही लपून राहिलेला नाहीच! 
 
दिग्विजय सिंह स्वत:ला आता कितीही मोठे रामभक्त म्हणवून घेत असले, तरी ‘मनात एक, मुखी दुसरेच’ अशी त्यांची गत. आज ‘माझ्या रक्ता रक्तात राम आहे’ असे म्हणणारे दिग्विजय सिंह तेव्हा कुठल्या बिळात लपले होते, जेव्हा त्यांच्याच पक्षाने २००७ साली रामाचे आणि रामसेतूचे अस्तित्वही मान्य करण्यापासून नकार दिला? दिग्गिराजा याचे उत्तर देतील का?
 
 
राम मंदिर आणि देशातील एकूणच हिंदू जागरणामुळे काँग्रेस आणि त्यांच्यासारखे स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणून अभिमानाने मिरविणाऱ्या राजकीय पक्षांचे दाबे आता चांगलेच दणाणले आहेत. अगदी अखिलेश यादवांपासून ते ममतादीदींपर्यंत सगळ्यांनाच हिंदू मतांसाठी हिंदूंची मने जिंकणे गरजेचे आहे, याचा साक्षात्कार झालेला दिसतो. काँग्रेसही सध्या त्याच मार्गावर वाटचाल करताना दिसते. पण, काँग्रेसचा कर्म आणि करणीमधला हा खोटेपणा असा वारंवार उघडा पडतोच. राजीव गांधींनीही हिंदू मतदारांना खूश करण्याच्या हेतूने १९८६ साली रामजन्मभूमीचं कुलूप उघडण्यापासून ते १९८९ साली शिलान्याला परवानगीही दिली. पण, त्यानंतरही राजीव गांधींना अपेक्षित राजकीय यश न मिळाल्यामुळे केंद्रात जनता दलाचे सरकार सत्तारुढ झाले. तेव्हापासून आजतागायत काँग्रेसचे राजकीय धोरण हे सेक्युलरवादाच्या बुरख्याआड मुस्लीम मतपेढीला कुरवाळण्याकडेच झुकलेले राहिले. पण, आता खूप उशीर झाला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाने, गांधी परिवाराने व इतर नेत्यांनी आपल्या ‘हिंदूविरोधी’ प्रतिमेवरील हे डाग पुसण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी ती केवळ धूळफेकच ठरेल.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@