‘जोकर’वरील कारवाई योग्यच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020
Total Views |
novak djokovic_1 &nb
 


‘कोरोना’ महामारीच्या संकटातही नुकतीच पार पडलेली ‘अमेरिकन ओपन टेनिस’ स्पर्धा यंदा ‘जोकर’वरील कारवाईमुळे सर्वत्र चर्चेत राहिली. ‘जोकर’ हा अन्य कुणी नसून, टेनिस विश्वातील सध्याचा अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचलाच या टोपणनावाने संबोधले जाते. जोकोव्हिचचे चुकलेच, मात्र त्याच्यावरील कारवाईही तितकीच चुकीची असल्याचा मतप्रवाह जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आला. घडल्याप्रकाराबद्दल फक्त समज देऊन जोकोव्हिचला खेळू देता आले असते. मात्र, पूर्ण स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवणे ही कारवाई चुकीची असून टेनिसच्या नियमांत बदल करणे गरजेचे आहे. जोकोव्हिचवर झालेल्या शिक्षेचे पारडे त्याने केलेल्या चुकीच्या तुलनेत अधिक वजनदार असल्याचा समज काही चाहत्यांना झाला. टेनिस विश्वातील नियमांत बदल करण्याची वेळ आल्याचा कलकलाट सुरू झाला. नियमांनुसार ही कारवाई योग्य की अयोग्य, याची पडताळणी होण्याआधीच जोकोव्हिचला अनेकांनी निर्दोषत्व बहाल केले. मात्र, टेनिसमधील समीक्षकांनी या संपूर्ण घटेनेचे विश्लेषण केल्यानंतर पंचांनी केलेली कारवाई योग्यच असल्याची जाणीव अनेकांना झाली. खेळाडूंनी मैदानावरील पंचाशी हुज्जत घातल्यास त्यांना अनेकदा समज देण्यात येते. मात्र, समज देऊनही एखादा खेळाडू आपल्या म्हणण्यावर ठाम राहत वाद घालत असेल, तर खेळ थांबविला जातो. तज्ज्ञांसोबत चर्चा करून यावर निर्णय घेतला जातो. एखाद्या खेळाडूमुळे सामन्यात व्यत्यय आल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूला विजयीही घोषित केले जाते. विविध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खेळातील सर्व बाबींचा अभ्यास करून निर्णय देण्याची सोय या खेळात उपलब्ध असल्याने सहजासहजी टेनिसमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत नाहीत. मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय मान्य करत खेळाडूही समाधान व्यक्त करतात. त्यामुळे एखाद्या खेळाडूला खेळादरम्यान होणार्‍या गंभीर दुखापतीशिवाय टेनिसचा खेळ सहजासहजी थांबत नाही. परंतु, जोकोव्हिचने थेट पंचांनाच टेनिस बॅटने जोरात चेंडू मारल्यामुळे त्याच्यावर थेट नियमांनुसार स्पर्धेतील पुढील सामने खेळण्याबाबत बंदी आणण्यात आली आणि त्याला ‘अमेरिकन ओपन टेनिस’ सारख्या महत्त्वाच्या ‘ग्रॅण्डस्लॅम’ स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. त्यामुळे ‘जोकर’वरील कारवाई योग्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

आदत से मजबूर! 

 
 
 
‘अमेरिकन ओपन टेनिस’सारख्या ‘ग्रॅण्डस्लॅम’ स्पर्धेदरम्यान चौथ्या फेरीतील खेळी गमावल्याने नोवाक जोकोव्हिचने रागाच्या भरात नकळत चेंडू टेनिस बॅटने जोरात पंचाच्या दिशेने भिरकावला. सीमारेषेवरील महिला पंचाच्या थेट घशावर जाऊन तो आदळल्याने त्या जखमी झाल्या. घडला प्रकार लक्षात येताच जोकोव्हिचने याबद्दल तातडीने खेद व्यक्त केला. या संपूर्ण प्रकाराची चित्रफीत पाहिल्यास जोकोव्हिचने हे हेतुपुरस्सर केले नसल्याचे सहजपणे लक्षात येते. मात्र, खेळाडूकडून पंचांवर झालेल्या प्रहाराच्या नियमानुसार त्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. घडल्या प्रकाराबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना रॅकेट आणि चेंडूवर राग व्यक्त करण्याची आपली जुनी सवय असल्याचे त्याने सांगितले. या वाईट सवयीतूनच आपल्यावर ही वेळ ओढवल्याची कबुलीही त्याने दिली. मात्र, टेनिसविश्वातील इतिहास पाहता जोकोव्हिच हा काही पहिला खेळाडू नाही की जो अशाप्रकारे स्पर्धेबाहेर झाला. यापूर्वी अमेरिकेचा प्रख्यात खेळाडू आंद्रे आगासी यानेही अनेकदा वादविवादाने मैदान गाजवले आहे. आगासीही एकेकाळी टेनिसविश्वातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू राहिला आहे. मात्र, रागाच्या भरात प्रेक्षकांमध्ये चेंडू भिरकावणे, पंचांनी समज दिल्याच्या रागातून त्यांना शिवीगाळ करणे आदी सर्व प्रकारांमुळे त्यालाही स्पर्धेतून बाहेर व्हावे लागल्याचा इतिहास आहे. केवळ आगासीच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू निक किर्गियोस या खेळाडूनेही रागाच्या भरात थेट पंचांच्या दिशेने खुर्ची भिरकाविल्याचा प्रकार घडला होता. नियमांनुसार निक किर्गियोस यालाही इटलीत सुरू असलेल्या स्पर्धेमधून टेनिस महासंघाने बाहेरचा रस्ता दाखविला होता. टेनिसमध्ये असे अनेक प्रकार घडले असून नियमानुसार प्रत्येकावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जोकोव्हिचवर अन्याय घडला, हा समज चुकीचा असून त्याच्यावर झालेली कारवाई योग्यच असल्याचे समीक्षकांना वाटते. जोकोव्हिचला टक्कर देणार्‍या रॉजर फेडरर, राफेल नडाल यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे जोकोव्हिचच या स्पर्धेच्या विजयी पदाचा दावेदार मानण्यात येत होता. मात्र, चुकीच्या सवयीने त्याला या स्पर्धेतून बाहेर केले असून आगामी काळात तरी त्याने आपली ही चूक सुधारावी, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@