साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात एकमताने निर्णय
08-Jun-2025
Total Views |
मुंबई : मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी या बैठकीला उपस्थित होते.
साताऱ्याची निवड कशी झाली?
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. सदर समिती ५, ६ आणि ७ जून रोजी काही निमंत्रक संस्थांना भेट देऊन आली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी सकाळी पुणे येथे संपन्न झाली. त्यात साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले. यावेळी आपले मत व्यक्त करताना मिलिंद जोशी म्हणाले की " साताऱ्याला ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळतो आहे. यापूर्वी १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते. गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती."
'या' ठिकाणी पार पडणार संमेलन सोहळा!
साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. योगायोग म्हणजे ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच ठिकाणी पार पडले होते. हे स्टेडियम १४ एकरमध्ये पसरले असून, मुख्य मंडप, २ इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियम मध्ये २५००० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे.