वाह उस्ताद!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020   
Total Views |


Rahul Sharma_1  

जम्मू-काश्मीरच्या मातीतल्या ‘संतूर’ या वाद्याच्या वादनाने प्रेक्षकांचे मन मोहून टाकणारे तरुण वादक राहुल शर्मा यांच्याविषयी...


‘वाह ताज!’ म्हटल्यावर उस्ताद झाकिर हुसेन यांच्यानंतर नाव समोर येते ते म्हणजे तरुण संतूरवादक राहुल शर्मांचे. १०० तारी संतूर वाद्याचा हा उस्ताद! आपले वडील ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांची संतूरवादनाची परंपरा त्यांनी कायम ठेवली. सध्याच्या पश्चिमी संगीताच्या युगात त्यांनी जनसामान्य आणि संगीतप्रेमींना संतूरची दखल घेण्यास भाग पाडले. जम्मू-काश्मीरमधील मातीचा गोडवा त्यांच्या वादनात आहे. त्यामुळे संगीतप्रेमी श्रोत्यांचे ते चाहते आहेत. गेल्या १५ वर्षांच्या आपल्या वैयक्तिक संगीत कारकिर्दीमध्ये त्यांनी नानाविध सांगीतिक प्रयोग करुन यशाची शिखरे गाठली आहेत.
 
 

राहुल शर्मा यांचा जन्म २५ सप्टेंबर, १९७२ रोजी मुंबईत डोगरा ब्राह्मण कुटुंबात झाला. शर्मा कुटुंबीय मूळ जम्मू-काश्मीरमधील. या प्रदेशाच्या मातीचा सूरमयी गोडवा असणार्‍या ‘संतूर’ या वाद्याची ही वादक मंडळी. राहुल यांचे आजोबा उमा दत्त शर्मा दिग्गज संतूरवादक होते. ही परंपरा त्यांचे पुत्र पं. शिवकुमार शर्मा यांनी जपली. केवळ जपलीच नाही, तर या संतूर वादनाला एक दर्जा आणि प्रसिद्ध मिळवून दिली. आज शिवकुमारजींचे नाव शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज वादक आणि जाणकारांमध्ये घेतले जाते. शिवकुमारजींनी राहुल यांचे नाव संगीतकार राहुल देव बर्मन यांच्यावरुन ठेवले. घरातील संगीत परंपरा कायम ठेवत राहुल यांनी लहान वयातच हार्मोनियम वाजण्यास सुरुवात केली. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांचे शिष्यत्व स्वीकारून संतूर वादनाचे धडे गिरवण्यास प्रारंभ केला. सतराव्या वयापर्यंत आपली संगीत साधना अजूनही पूर्ण न झाल्याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी मैफिलींमधील सादरीकरण करणे टाळले.
 
मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयामधून ‘अर्थशास्त्र’ विषयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल संगीत सादरीकरणामध्ये उतरले. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी म्हणजेच १९९६ साली त्यांनी आपल्या वडिलांबरोबर मैफिलींमधील सादरीकरणास सुरुवात केली. त्यापूर्वी वयाच्या २२व्या वर्षी त्यांना पीटर गॅब्रिएलने यांनी ‘डब्ल्यूओएमएड’ आणि ‘दरबार’ फेस्टिवलमध्यील सादरीकरणासाठी करारबद्द करुन घेतले. वडिलांकडून संतूरचे शास्त्र शिकून घेतल्यानंतर राहुल यांनी जागतिक पातळीवर नानाविध प्रयोग केले. देशातील लोकसंगीताच्या बाजाला पाश्चात्य लयींमध्ये मिसळून त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. याच आधारावर ‘ग्रॅमी’ पुरस्कारप्राप्त सैक्सोफोन वादक केनी जी यांच्यासोबत त्यांनी तयार केलेला ‘नमस्ते इंडिया’ हा अल्बम प्रचंड लोकप्रिय ठरला.
 
राहुल यांनी ‘ग्रॅमी’ विजेते ‘इलेक्ट्रॉनिका ग्रुप डीप फॉरेस्ट’च्या सहकार्याने भारतीय लोकसंगीत आणि संतूर यांची मेळ घालून दहा संगीत रचना तयार केले. ‘द रिबेल’ या अल्बमच्या माध्यमातून त्यांनी सांगीतिक बंडखोरीदेखील केली. कारण, यामधील सर्व रचनांमधील संतूर वादन त्यांनी ‘रॉक’ या संगीत पद्धतीने केले होते. राहुल यांनी आजवर ६० पेक्षा अधिक लाईव्ह आणि स्टुडिओ रेकॉर्डिंग केले आहे. या कारकिर्दीमधील ‘म्युझिक ऑफ हिमालयाज’ हा ‘रिअल वर्ल्ड रेकॉर्ड’साठी तयार केलेला अल्बम महत्त्वाचा ठरला. हिमायलाच्या कुशीत वसलेल्या लोकसंगीताचा वापर करुन हा अल्बम तयार करण्यात आला होतो. २००२ मध्ये राहुल यांनी आजपर्यंत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या ‘इन्स्ट्रुमेंटल अल्बम’ची निर्मिती केली. ज्याचे नाव होते ‘संगम.’ फ्रेंच पियानो वादक रिचर्डक्लेडरमॅनसह हा विक्रम केलेले राहुल हे पहिले भारतीय संगीतकार ठरले.
 
काश्मीरच्या लोकसंगीतकारांसह राहुल यांनी तयार केलेला ‘कॉल ऑफ व्हॅली’ आणि २०१२ मध्ये ‘ग्रॅमी’ विजेत्या संगीतकार एरिक मऊक्वेट यांच्या सहकार्याने निर्माण केलेला ‘डीप इंडिया’ अल्बमने विक्रीचा उच्चांक गाठला आहे. त्यांनी जाकीर हुसेन, जॉन मॅक्लॉगलिन, मिकी हार्ट, जॉर्ज हॅरिसन, जो मॉन, जो हेंडरसन, व्हॅन मॉरिसन, एअर्को मोरेरा, फ्लोरो सॅण्डर्स आणि कोडो ड्रमर या संगीतकार आणि वादकांसह अनेक कार्यक्रमांमध्ये वादन केले आहे. इंग्लंडचे राजकुमार केंब्रिज प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टनच्या ‘ड्युक अ‍ॅण्ड डचेस’ यांच्या भारत भेटीदरम्यान राहुल यांचे विशेष सादरीकरण केले होते. यश च्रोपा यांच्या ‘मुझसे दोस्ती करोगी’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केले होते. या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी आजवरच्या आपल्या कारकिर्दीमधील सर्वात तरुण संगीतकारासाठी पार्श्वगायन केले होते. या चित्रपटासाठी राहुल यांना २००२ साली सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांना हिंदुस्तानी वाद्य संगीतासाठी ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (बिस्मिल्ला खान युवा पुरसकार) मिळाला आहे. तसेच त्यांनी उत्तर अमेरिका आणि संपूर्ण युरोपमध्ये आणि विविध लोकसंगीत व जागतिक संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे. दिग्गज पित्याचा सावलीत तयार होऊनही राहुल यांनी आपल्या कलेच्या बळावर स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
 
 

@@AUTHORINFO_V1@@