खिलाफत चळवळ - आज काय तिचे? (भाग-१)

    15-Aug-2020
Total Views | 510

 


Khilafat_1  H x

 


 


पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) समाप्त होत असताना ऑटोमन तुर्की साम्राज्याचे विघटन होऊन तुर्कस्तानच्या खलिफाचे पद धोक्यात आले. मुस्लीम जगतातील या घडामोडींमुळे हिंदुस्तानातील मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यातूनच खिलाफत चळवळ (१९१९-१९२४) जन्माला आली. ‘खलिफा’चे (शब्दशः अर्थ - उत्तराधिकारी; जगभरातील मुस्लिमांचा मजहबी आणि ऐहिक प्रमुख) पद आणि प्रतिष्ठा अबाधित राहावी, अशी खिलाफत चळवळीची प्रमुख मागणी होती. १०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांवर आज का बरं डोके लढवायचे? इतिहासाची मढी उकरून आज काय मिळणार? हे आणि असे प्रश्न सर्वसाधारण वाचकाला पडणे स्वाभाविक आहे. इतिहासाच्या बाबतीत ’मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ हे सूत्र खरे असते. ज्या मानसिकतेतून मागील घटना घडल्या ती मानसिकता आजही तशीच आहे. आमच्या इतिहासाच्या शालेय पुस्तकात अर्ध्या पानात आटपलेली खिलाफत चळवळ आम्ही खोलात जाऊन समजून घेणार का, ती समजून घेतल्यावर आम्ही शहाणे होणार की पुन्हा तोंडावर आपटणार हा खरा प्रश्न आहे. खिलाफत चळवळ ही आकस्मिकरीत्या सुरू झालेली एखादी पृथक ऐतिहासिक घटना नव्हती, हे लक्षात घेतले पाहिजे. ती इस्लामच्या मजहबी ग्रंथांवर आधारलेली असून तिला निश्चित ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. आपल्या स्वातंत्र्यचळवळीवर तिचा परिणाम होऊन त्याचे पर्यवसान देशाच्या फाळणीत झाले. खिलाफत चळवळ आजही प्रासंगिक असल्यामुळे तिची वस्तुनिष्ठ चर्चा करणे आवश्यक आहे.

 

 


खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ

 

 


खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ यांच्या आपसातील संबंधाविषयी बहुतेक लोकांच्या मनात गोंधळ आहे. दि. २१ मार्च १९१९च्या रौलट कायद्यानंतर आणि दि. १३ एप्रिल १९१९ ला झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिशांनी सुचविलेल्या घटनात्मक सुधारणांना दिलेला आपला पाठिंबा काढून घेतला. त्यासोबतच स्व-शासन आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधींनी दि. ४ सप्टेंबर १९२० ला असहकार चळवळ सुरू केली, असेच आमच्या अनेक पिढ्यांना शिकवण्यात आले आहे. माहिती आणि ज्ञान मिळविण्यासाठी आमचे आधुनिक सुशिक्षित आजकाल ‘विकीपीडिया’ वर आंधळा विश्वास ठेवतात. वर दिलेले ज्ञानामृत ‘विकीपीडिया’वरूनच घेतले आहे. इतिहासकाराची झूल पांघरून राजकीय पक्षांची तळी उचलणार्‍या दरबारी विचार-दलालांची टोळी आपल्याला शाळकरी वयापासून आजवर इतिहासाचे डोस पाजत आली आहे. असहकाराला ‘खिलाफती’ची जोड देऊन हिंदू आणि मुस्लीम हे भारतातील दोन प्रमुख धार्मिक समुदाय एकत्रपणे वसाहतवादी सत्तेचा अंत करतील, अशी गांधीजींना आशा होती. औपनिवेशिक भारतात अभूतपूर्व ठरलेल्या जन-आंदोलनाचा विस्फोट या चळवळींनी निश्चितपणे घडवून आणला (थीम्स इन इंडियन हिस्ट्री भाग ३, एनसीईआरटीने प्रसिद्ध केलेले इयत्ता बारावीचे इतिहासाचे पाठ्यपुस्तक, पृ. ३५०) असे या टोळक्याचे म्हणणे आहे. काँग्रेसने स्वराज्य मिळवण्यासाठी असहकार चळवळीला जन्माला घातले, असेच काँग्रेसचा अधिकृत इतिहास वाचणार्‍याला वाटेल (द हिस्ट्री ऑफ दि इंडियन नॅशनल काँग्रेस, पट्टाभी सीतारामय्या, सीडब्ल्युसी, मद्रास, १९३५, पृ. ३३४, ३३५). असत्याच्या ढिगार्‍याखाली सत्य अनेकदा धूसर होते, दबले जाते. राजकीय स्वार्थापोटी नाहीतर बंद विचाराची झापडे लावून हा असत्याचा गोंगाट केला जातो. खिलाफत चळवळ त्याला अपवाद नसल्यामुळे तिची झाडाझडती घेणे गरजेचे झाले आहे.

राजकीय कथानक

 

 


काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावर खिलाफत चळवळीसंबंधी दि. २५ ऑक्टोबर, २०१८ला लिहिलेला लेख आहे. त्यातील उतारा पुढीलप्रमाणे, ‘ब्रिटिश राजवटीपासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नांत खिलाफत चळवळ एक महत्त्वाची चळवळ होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या देखरेखीखाली खिलाफत चळवळीमुळे हिंदू-मुस्लिमांचे ब्रिटिश राजवटीविरुद्ध संयुक्त प्रयत्न पाहावयास मिळाले. वसाहतवाद्यांविरुद्ध असलेल्या संयुक्त असंतोषाला वाचा फोडण्यासाठी खिलाफत चळवळीला महात्मा गांधींनी त्यांच्या असहकार चळवळीची जोड दिली, तेव्हा तर यश अधिकच बळकट झाले. शोषण करणार्‍या आणि वर्चस्व गाजवणार्‍या एका समान शक्तीविरुद्ध हिंदू-मुस्लिमांना आणि त्यांच्या-त्यांच्या हितसंबंधांना एकत्र आणण्याची खिलाफत चळवळ म्हणजे नामी संधी असल्याचे महात्मा गांधींनी हेरले... ‘स्वराज्य’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्व-शासनाच्या प्रस्तावाला खिलाफतसंबंधी असलेल्या चिंता आणि मागण्यांची जोड महात्मा गांधींनी दिली आणि ही दुहेरी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असहकाराची योजना स्वीकारली. हिंदू-मुस्लीम एकीच्या संदर्भात खिलाफत चळवळीने भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत अत्यंत महत्त्वाचे उदाहरण घालून दिले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि खिलाफत चळवळीतील नेत्यांचे एकमेकांशी असलेले तादात्म्य यासाठी बहुतांशी कारणीभूत ठरले. हिंदू-मुस्लिमांनी एकत्रपणे काम केल्यासच आणि स्वातंत्र्यासाठी संयुक्त लढा दिल्यासच ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवणे शक्य होईल या महात्मा गांधींच्या सिद्धांताशी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे हे चित्र सुसंगत होते.’

विचार-दलालांच्या बौद्धिक कसरती

 

 


स्वतःचा अजेंडा राबवणार्‍या बेगडी इतिहासकारांनी खिलाफत चळवळीसंबंधी खोट्यानाट्या कहाण्या रचल्या. खिलाफत चळवळ ही वाढत्या हिंदू राष्ट्रवादाला प्रतिक्रिया होती असे स्कॉटिश इतिहासकार सर हॅमिलटन गिब (१८९५-१९७१) यांचे प्रतिपादन आहे. ते लिहितात, “जगातील मुस्लिमांमध्ये, भारतातील मुस्लिमांनीच तेवढा इस्लामच्या आंतरराष्ट्रीय पैलूवर भर दिला. पण यात त्यांचा हेतू हिंदू राष्ट्रवादाबाबत बचावात्मक भूमिकेचा होता.” (विदर इस्लाम? अ सर्वे ऑफ द मॉडर्न मूव्हमेंट इन द मुस्लीम वर्ल्ड, १९३२, रूटलेज, पृ. ७३). इतिहासकारांच्या या कसरती पाहून कधीकधी हसू येते. इस्लामचे कॅनेडियन इतिहासकार विल्फ्रेड कँटवेल स्मिथ लिहितात, “बहुतेक ग्रामीण भागांत ‘खिलाफत’ शब्दाला एक विचित्र अर्थ लावण्यात आला. उर्दूमधील ‘खिलाफ’ म्हणजे ’विरोध करणे’ या शब्दापासून तो आला असे लोकांना वाटले आणि सरकारला विरोध असा त्याचा अर्थ लोकांनी लावला. त्यांना इस्लामची जाणीव नेहमीप्रमाणे होती, पण मुहम्मद आणि ऑटोमन तुर्की साम्राज्याच्या बाबतीत ते जवळजवळ अनभिज्ञ होते.” (मॉडर्न इस्लाम इन इंडिया: अ सोशल अ‍ॅनॅलिसिस, मिनर्व्हा बुकशॉप, लाहोर, पृ. २३४). ‘महात्मा : लाईफ ऑफ मोहनदास करमचंद गांधी (खंड २, पृ.४७) या आपल्या ग्रंथात डी. जी. तेंडुलकर याच हास्यास्पद प्रतिपादनाची री ओढतात. ‘द सेन्टेनरी हिस्ट्री ऑफ दि इंडियन नॅशनल काँग्रेस १८८५-१९९५’ (अ‍ॅकॅडेमिक फाऊंडेशन, दिल्ली, १९८५, खंड २, पृ. ६६) नावाचे अ. भा. काँग्रेस कमिटीने छापलेले बाड तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रकाशित केले होते. यात पुन्हा तेच बालिश प्रतिपादन वाचावयास मिळते. या खंडाचे आणि एकूण प्रकल्पाचे संपादक नेहरूवादी सेक्युलरिजमचे शिरोमणी रविंदर कुमार आणि बी. एन. पांडे होते. यात नवल ते काय?

 

 


खिलाफत चळवळ अखिल-इस्लामवादी नसून अखिल भारतीय इस्लामवादी असल्याचे भासविणे, हा अशा बौद्धिक कसरतींचाच एक भाग आहे (पाहा - द खिलाफत मूव्हमेंट : रिलीजस सिम्बॉलिजम अ‍ॅण्ड पॉलिटिकल मोबिलायझेशन इन इंडिया, गेल मिनॉल्ट, कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस, १९८२). बिहारमधील खिलाफत आणि असहकार चळवळींमधील सेक्युलर धागेदोरे हुडकण्याचा उपाद्व्याप प्रा. भोजनंदन प्रसाद सिंह नावाच्या ‘लब्धप्रतिष्ठित इतिहासकाराने’ केला आहे (प्रोसिडिंग्स ऑफ दि इंडियन हिस्ट्री काँग्रेस, खंड ६३, २००२, पृ. ६१५-६२१). ते खरडतात, त्याच्या (खिलाफत चळवळीच्या) धार्मिक पैलूंवर भर देऊन आणि त्याचे सेक्युलर स्वरूप झाकोळून जाणीवपूर्वक गोंधळ उत्पन्न करण्यात येत आहे. या चळवळीचा अधिकृतपणे नामोल्लेखदेखील सोयीस्करपणे टाळण्यात आला आहे. अनुल्लेखाने मारण्याच्या या कथित प्रकाराचा रफिक झकेरियांनी त्यांच्या ‘द ट्रुथ अबाऊट द खिलाफत मूव्हमेंट’ (द हिंदुस्थान टाईम्स, नवी दिल्ली, २४ ऑगस्ट १९९७) या लेखात कसा निषेध केला, याचे वर्णन प्राध्यापक महाशयांनी पुढे केले आहे. या लब्धप्रतिष्ठित इतिहासकाराची आणखी मुक्ताफळे पुढीलप्रमाणे - “विविध धर्मांचे लोक भाऊ-भाऊ असल्याप्रमाणे राहत असलेल्या स्वतंत्र आणि लोकतांत्रिक भारताचे उद्दिष्ट असलेल्या सेक्युलर राष्ट्रीय चळवळी म्हणून गांधींच्या असहकार आणि खिलाफत चळवळी उठून दिसतात. अहिंसा ही असहकार आणि खिलाफत चळवळींची आवश्यक अट होती.”

इतिहास नाकारणे

 

 


कोणताही सैद्धांतिक किंवा ऐतिहासिक आगापीछा नसलेली एक आकस्मिक चळवळ म्हणून खिलाफत चळवळीला रंगविले जाते. तिच्या हिंदूविरोधी स्वरूपाला पातळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. अखिल-इस्लामवादाला पाश्चात्य साम्राज्यवादविरोधाचा रंग कसा दिला जातो, हे पाहण्यासारखे आहे. गार्गी चक्रवर्ती नावाच्या विदुषी ‘मेनस्ट्रीम’ (खंड ५८, क्र. ६, नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२०) नियतकालिकात लिहितात, “सन १९११ मध्ये इटली आणि तुर्कस्तानमध्ये युद्ध सुरू होईपर्यंत पाश्चात्य साम्राज्यवादाविरुद्ध जगभरातील मुस्लिमांना संघटित करू पाहणारी अखिल-इस्लामवाद ही चळवळ भारतात जीवंत शक्ती म्हणून अस्तित्वात आली नव्हती. ब्रिटनने इटलीशी गुप्त युती केली. याचा परिणाम म्हणून भारतीय मुस्लीम ब्रिटिशांपासून दुरावले. कसेही करून ब्रिटिशांना त्यांच्या इस्लामी संस्कृतीला नष्ट करावयाचे आहे अशी त्यांची भावना झाली. ‘इस्लाम खतरे में’च्या भयसूचक भावनेला ख्रिश्चॅनिटी आणि ब्रिटिश साम्राज्यवाद्यांविरुद्ध आततायी घृणेचा रंग आला. ही घृणा हिंदूंप्रति नव्हती. आंबेडकर विश्वविद्यालय, दिल्ली आणि डेन्मार्कच्या आरहूस विद्यापीठाने दि. ८-१४ जानेवारी, २०२० ला संयुक्तपणे आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय शीतकालीन कार्यशाळेत गार्गीबाईंनी आपला लेख प्रबंध म्हणून सादर केला होता हे विशेष.

स्वघोषित सेक्युलरवाद्यांची जिथे ही कथा, तिथे नि:संकोचपणे इस्लामवादी असलेल्यांची काय गत! त्रिनिदाद सरकारच्या विदेश विभागात अधिकारी असलेल्या शेख इमरान हुसेन यांनी १९८५ साली आपली नोकरी सोडून इस्लामसाठी आपले उरलेले आयुष्य वेचण्याचे ठरविले. खिलाफत चळवळीविषयी ते लिहितात, “इस्लामला पर्याय म्हणून ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने तलवारीच्या धाकाने युरोपीय राजकीय सेक्युलॅरिजम लादले. सेक्युलॅरिजमच्या नव्या युरोपीय धर्माला हिंदू आणि मुस्लीम दोघांनी अखेर आव्हान दिले आणि स्वतःच्या राजकीय संस्कृतीची पुनर्स्थापना आणि रक्षण करण्याचा प्रयत्न केला. अश्वेत जगतावर वसाहतवादी पाश्चात्य जग लादू पाहत असलेली युरोपीय राजकीय सेक्युलॅरिजम आणि घटनात्मक लोकतांत्रिक प्रणाली खिलाफत चळवळीमुळे उलथण्याचा धोका होता आणि म्हणून मुस्तफा केमालच्या उदयोन्मुख सेक्युलर तुर्की गणराज्याशी संगनमत करून एक ब्रिटिश रणनीती आखण्यात आली. तुर्की खिलाफत खालसा करणे आणि हे करून खिलाफत चळवळ आणि तिच्यासोबत असलेल्या भयकारक हिंदू-मुस्लीम युतीला सुरुंग लावून तिचा अंत करणे ही ती रणनीती होती (द रिटर्न ऑफ द खिलाफत).” स्थानिक संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि वांशिक वर्चस्वाच्या विरुद्ध केलेला प्रयत्न म्हणून खिलाफत चळवळीला प्रस्तुत करण्याचा हा सारा खटाटोप आहे.
आशाळभुतांची दिवास्वप्ने

 

 


भारतातील सध्याच्या सत्तासमीकरणामुळे विचार-दलाल आणि बेगडी इतिहासकारांचे टोळके भलतेच अस्वस्थ झाले आहे. आपल्याला खिरापत देणारा तो रम्य भूतकाळ पुन्हा कसा आणि कधी अवतरेल, याकडे त्याचे डोळे लागलेले आहेत. इतिहासातील भुतांना जीवंत करून वर्तमानात बदल घडवून आणता येईल का, याची चाचपणी ही मंडळी करत असतात. अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात इतिहास शिकवणार्‍या प्रा. ग्यान प्रकाश नामक आशाळभूत आत्म्याला खिलाफत चळवळ आणि नागरिकता कायदा विरोधी चळवळ यांत साम्य वाटते. हा आत्मा आपल्या मळमळीला पुढील शब्दांत वाट करून देतो - “भारतातील त्यांच्या स्थानावर रा .स्व. संघप्रणीत हल्ला होत असताना, आपण मुस्लीम आणि भारतीय आहोत, भारतीय असलेले मुस्लीम नाही, असे मुस्लीम ठणकावून सांगत आहेत. खिलाफत चळवळीच्या वेळी महात्मा गांधींनी केलेल्या प्रयत्नाचे स्मरण होते. ब्रिटिशांविरुद्ध राष्ट्रवादी चळवळ उभारण्यासाठी मुस्लीम गार्‍हाण्याचा वापर त्या चळवळीत करण्यात आला होता. तो (प्रयत्न) देखील मुस्लीम आणि भारतीयचा संगम होता.” (व्हय द प्रोटेस्ट्स रिमाइंड अस ऑफ गांधीज खिलाफत मूव्हमेंट, इकॉनॉमिक टाईम्स, १२ जानेवारी २०२०). खिलाफत चळवळीची भलावण पुढीलप्रमाणे करण्यात येईल असे भाकीत करण्यास प्रत्यवाय नाही - ‘महात्मा गांधींच्या एकमुखी नेतृत्वाखाली आपल्या मुस्लिमेतर बांधवांना सोबत घेऊन वसाहतवादी राज्यकर्त्यांविरुद्ध एका पीडित समुदायाने केलेली चळवळ!’ या वाक्यात ‘वसाहतवादी राज्यकर्ते’च्या ऐवजी ‘हिंदू बहुसंख्यकवाद’ आणि ‘मुस्लिमेतर बांधव’ च्या ऐवजी ‘विषमतावादी हिंदू वर्ण-व्यवस्थेखाली चिरडले गेलेले’ असे शब्द घाला! म्हणजे सत्ताबदल घडविण्यासाठी ठासून भरलेला दारुगोळा तयार होतो!’

खिलाफत चळवळीविषयी जाणीवपूर्वक तयार करण्यात येणारे गाळीव आणि साजुक-मिठ्ठास कथानक आता बस्स झाले! खिलाफत चळवळीला चालना देणारी मानसिकता आज शंभर वर्षांनी जीवंत आहे म्हणून ती चळवळ आजही प्रासंगिक आहे हे लक्षात घ्यावे. मानवी संस्कृतीला सातव्या शतकात नेऊ पाहणार्‍या या मानसिकतेला ‘पवित्र’ अधिष्ठान आहे. इतिहास विसरणार्‍यांना तो इतिहास पुन्हा भोगावा लागतो हे खरेच आहे. पण, इतिहासाला विकृत करणार्‍यांना तो पुन्हा भोगण्याची संधीदेखील मिळत नाही हेही तितकेच खरे! असत्याची पुटे दूर सारून धडधडीत सत्य समोर आणण्याची वेळ आता आली आहे. (क्रमश:)

 

 

-डॉ. श्रीरंग गोडबोले

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121