शेतीचा ‘पालघर पॅटर्न’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2020   
Total Views |


palghar_1  H x

 

 

 

 

राज्यात सर्वत्र कोरोनाची चर्चा असताना नुकताच पालघर जिल्हा तेथील दुर्दैवी घटनेने चर्चिला गेला. मात्र, सध्या राज्यात पालघर जिल्हा चर्चेत आहे तो तेथील शेतीसंबंधी आखण्यात आलेल्या धोरणामुळे. ‘लॉकडाऊन’च्या काळात शेतकरी वर्गालादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या प्रश्नांवर आपापल्या पद्धतीने मात करण्याचा प्रयत्न काही उपक्रमशील शेतकरी करत आहेत. पालघर जिल्ह्यात असाच एक आगळावेगळा प्रयोग होऊ घातला आहे. त्या जिल्ह्यात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. यंदाच्या मोसमात साधारणत: १५ हजारांपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात भात लागवड होईल असाही अंदाज आहे. पालघर जिल्हा परिषद आणि काही प्रगत शेतकरी मिळून ‘एक गाव, एक समूह व बियाणाचे एकच वाण’ अशी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविली जाणार आहे. त्यानुसार शेतकर्‍यांचा बराच फायदा होईल, असे त्यांना अपेक्षित आहे. समूहानेच पीकविमा घेतला जाऊ शकेल. कीकटनाशकांची फवारणी, रोगांचे नियंत्रण आदी सोपस्कार एका गावात एकाच वेळी होऊ शकतील. त्यासाठी आवश्यक उपकरणे एकाच वेळी गावातील सर्वच शेतीची मशागत करू शकतील. एका गावात किंवा एका गटात एकाच वाणाचा भात तयार होईल. त्यामुळे एकत्रितपणे सर्वांचे विक्री व्यवहार पार पडू शकतील. सगळ्या गावाचे भातपीक एकाच वेळी यामुळे तयार होईल, असा विश्वास पालघर जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे. या पॅटर्नचे अनुकरण राज्यात करता येऊ शकते. बहुतेक जिल्ह्यात एखाद दोन पिके सार्वत्रिक असतात. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा आणि द्राक्षाचे पीक घेतले जाते, तर जळगाव जिल्ह्यात कापूस आणि केळी. अशीच प्रत्येक जिल्ह्यातील पिकांची वर्गवारी लक्षात घेऊन योजनेची आखणी प्रत्येक जिल्हा परिषद करू शकेल. पुढील काळात शेतकर्‍यांच्या उत्पन्नाची काहीशी निश्चिती होण्याची शक्यता या प्रयोगात आढळते. म्हणूनदेखील हा उपक्रम अनुकरण करण्यायोग्य आहे, असे वाटते.
 
 
भूमिपुत्रांच्या मदतीला ग्रामस्थ

 

भूमिपुत्रांसाठी गावाच्या वेशी आज बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परगावात अडकलेल्या आपल्या भूमिपुत्रासाठी ग्रामस्थांनी धावणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाचे भीषण संकट, ‘लॉकडाऊन’, संचारबंदी, बेरोजगारी आदी संकटांमध्ये इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथील मूळ रहिवासी मुंबई भागात अडकलेले आहेत. हे ग्रामस्थ आपल्या परिवारासह कांचनगाव येथे येण्यासाठी आतुर झालेले आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कांचनगाव ग्रामस्थांनी गावात कोणाला सध्याच्या स्थितीत येऊ न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बाहेर राहणार्‍या गावकर्‍यांनी या परिस्थितीत आहे तिथेच राहावे म्हणून उपसरपंच सतीश गव्हाणे यांनी पुढाकार घेतला. गावातील सहकार्‍यांच्या मदतीने मुंबई भागात राहणार्‍या गावातल्या २० ते ३० कुटुंबांना मुबलक धान्य, जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला घरपोच करण्यात आला. यासह सर्वांशी संवाद साधून आधार देण्यात आला. मुंबईस्थित या कुटुंबांकडून संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्याकडून काळजी घेतली जात असली तरी त्यांना आपल्या स्वतःच्या कांचनगावची ओढ लागली आहे. मात्र, अशा भयाण परिस्थितीत कांचनगाव ग्रामस्थांनी गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याच्या काळात कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे उपसरपंच सतीश गव्हाणे यांना संबंधित कुटुंबे संपर्क साधत आहेत. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या कुटुंबांना सध्या जगण्याचे साधन नसल्याने उपासमारीची भीती असल्याचे गव्हाणे यांच्या लक्षात आले. म्हणूनच सर्व कुटुंबे गावाकडे यायला इच्छुक असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी कांचनगावातील ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह काही सहकार्‍यांच्या मदतीने संबंधित कुटुंबांना शाश्वत मदत करण्याचा निर्णय घेतला. सतीश गव्हाणे यांनी ग्रामस्थांकडून गहू, तांदूळ, बाजरी, डाळी, तेल आदींसह विविध जीवनावश्यक साहित्य संकलित केले. जगण्यासाठीचे विविध साहित्य आणि सर्व प्रकारचा भाजीपाला या उपक्रमात जमा करण्यात आला. संबंधित २० ते ३० कुटुंबांना मुंबईत जाऊन हे साहित्य वितरित करण्यासाठी साहित्य भरलेले वाहन निर्जंतुकीकरण करून वाटप करणार्‍यांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन थेट घरपोच वाटप केले. गावकर्‍यांच्या मदतीला गावकरीच धावून आल्याने गरजू कुटुंबांनी साश्रूनयनांनी उपसरपंच सतीश गव्हाणे यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली. कोरोना हद्दपार झाल्यावर गावाला यावे असे आग्रहाने सांगत मदत देणार्‍या दूतांनी त्यांचा निरोप घेतला. परगावात आपल्या गावातील कुटुंबांचा आधार बनत खरे पालकत्व निभावले जात असल्याचेच हे उदाहरण!

 
 
@@AUTHORINFO_V1@@