दि. 1 जून आणि 2 जून रोजी जम्मू विभागातील दोडा जिल्ह्यातील भादरवाह येथील सरकारी पदवी महाविद्यालयात तिसरा लॅव्हेंडर महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा महोत्सव म्हणजे नावीन्यपूर्णता, उद्योजकता आणि शाश्वत शेतीचा एक अनोखा संगमच! ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने जम्मू आणि काश्मीरमध्ये शेतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी, लॅव्हेंडर मूल्यसाखळी विकासाला एक मॉडेल म्हणून स्थान देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. CSIR-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन (CSIR-IIIM) द्वारे आयोजित या कार्यक्रमात शेतकरी, स्टार्टअप्स, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि धोरणकर्ते यांसह 1 हजार, 200 हून अधिक मंडळींनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानिमित्ताने जम्मू-काश्मीरमधील ही ‘जांभळी क्रांती’ आणि या महोत्सवाचे अंतरंग उलगडणारा हा लेख...
‘पार्क’ची प्रभावी उपस्थिती
‘CSIR-IIIM’तर्फे आयोजित दोन दिवसांच्या लॅव्हेंडर महोत्सवात या क्षेत्राशी संबंधित प्रमुख भागधारकांनी सक्रियपणे सहभाग घेतला. यावेळी जम्मू आणि काश्मीरमधील लॅव्हेंडर मूल्यसाखळीच्या बळकटीकरणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आले. लॅव्हेंडर शेतीच्या माध्यमातून ग्रामीण उपजीविका वाढविण्यासाठी, या क्षेत्रातील मूल्य आणि पुरवठा साखळीतील तफावत भरून काढण्याचे महत्त्व याविषयी विचारमंथन करण्यात आले. यासंबंधीचे निवेदन जम्मू आणि काश्मीर विभागाने केलेल्या अभ्यासावर आधारित होते, ज्यामध्ये इतर टीम सदस्य कासिम गनी, सुश्री मेघना करंदीकर आणि ‘पार्क’मधील अन्य विभागांचे सहकार्य होते.
’CSIR-IIIM’च्यावतीने लॅव्हेंडरचे खरेदीदार आणि विक्रेता यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमुळे लॅव्हेंडर उत्पादित करणारे शेतकरी, लॅव्हेंडरच्या फुलांतून सुगंधी उत्पादन घेणारे स्टार्टअप आणि यासंबंधी उद्योगक्षेत्रातील भागधारकांमध्ये संवाद पार पाडला आणि परस्पर संबंध दृढ होण्यास मदत झाली. या सत्राने लॅव्हेंडरच्या बाजारपेठेतील महत्त्वाचे दुवे जोडण्यास आणि सुगंधी उत्पादनाच्या क्षेत्रातील ग्रामीण उद्योजकांसाठी नवीन संधीची दारे खुली केली आहेत.
लॅव्हेंडर - ग्रामीण समृद्धीचा दिवा
लॅव्हेंडर महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आणि ‘पार्क’ उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “CSIR अरोमा मिशन’अंतर्गत भादरवाह येथील एका छोट्या भागात सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर लॅव्हेंडरची लागवड सुरू करण्यात आली होती. परंतु, येथील शेतकर्यांना असे वाटले की, लॅव्हेंडर त्यांना पूर्वीच्या पारंपरिक पिकांपेक्षा कित्येक पटींनी जास्त उत्पन्न देते, त्यामुळे बरेच शेतकरी या पिकाकडे वळले.”
ते पुढे बोलताना म्हणाले की, “CSIR-IIIM या भागातील शेतकर्यांना लॅव्हेंडरच्या दर्जेदार लागवडीसाठीच्या आवश्यक साहित्याचा पुरवठा करीत आहे. तसेच ‘लॅव्हेंडर ऑईल डिस्टिलेशन युनिट्स’ची स्थापना करून लॅव्हेंडरपासून मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीसाठी स्टार्टअप्स आणि नवोदित उद्योजकांना साहाय्य करून त्यांना पाठिंबा देत आहे.” ते पुढे म्हणाले की, “पर्पल रिव्होल्यूशन’ हे ‘स्टार्टअप मिशन’चे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, जिथे उद्योजक आणि शेतकरी एकत्र येतात आणि केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही उपजीविकेच्या संधी निर्माण करतात. यामुळे या प्रदेशात महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणाम झाला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत, 2047’च्या ध्येयाला साकार करण्यात हातभार लागला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “2025चा ‘लॅव्हेंडर महोत्सव’ हा ’जांभळ्या क्रांती’चा एक उत्साही उत्सव होता, जो भादरवाहमध्ये लॅव्हेंडर लागवडीचा परिवर्तनकारी सामाजिक-आर्थिक परिणाम आणि संपूर्ण भारतातील शाश्वत शेतीसाठी एक मॉडेल म्हणून त्याची क्षमता अधोरेखित करतो.”
यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधिकृतपणे लॅव्हेंडर कापणी हंगाम सुरू केला, ज्यामुळे या प्रदेशातील लॅव्हेंडर उत्पादकांसाठी आणखी एक समृद्धीचे चक्र सुरू झाले. यावेळी, त्यांनी ‘सस्टेनेबल अरोमा मॉडेल क्लस्टर’चे उद्घाटनदेखील केले, जो लॅव्हेंडर आणि इतर सुगंधी पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी विकसित करण्याच्या दृष्टीने एक दूरदर्शी उपक्रम आहे. या क्लस्टरमुळे लॅव्हेंडरच्या उत्पादनातील स्थानिक प्रक्रियांमध्ये पायाभूत सुविधा वाढतील, बाजारपेठेत या उप्तापदनांचा प्रवेश सुधारेल आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सुगंधी पीक क्षेत्राच्या वाढ आणि शाश्वततेसाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत, ‘उत्कृष्ट लॅव्हेंडर शेतकरी’ आणि या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सचा देखील यावेळी सत्कार केला. सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये ‘मेसर्स हिमालयन एसेन्शियल ऑईल्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड’चे भारत भूषण, ‘मेसर्स जेके अरोमा’चे तौकीर बागवान आणि ‘मेसर्स रिदायु बोटॅनिक्स प्रा. लि.’चे अर्जुन रैना यांचा समावेश होता.
लॅव्हेंडर परिसंस्थेचे सक्षमीकरण
लॅव्हेंडरचे पीक घेणारे शेतकरी आणि उद्योजकांच्या आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने, ‘पार्क’ची उपस्थिती स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योगांना सुगंधी उत्पादन नवोपक्रमात त्यांचा ठसा उमटविण्यासाठी प्रोत्साहित करणारी होती. ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने CSIR संस्था आणि स्थानिक इनक्यूबेटर यांच्यातील संयुक्त प्रयत्नांना पाठिंबा देऊन संशोधन, प्रशिक्षण आणि तांत्रिक समर्थनासाठी सहयोगी मार्गांचा शोधदेखील घेतला.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात CSIR-IIIM आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ बायोरिसोर्सेस अॅण्ड सस्टेन’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला.
स्टार्टअप एक्स्पो आणि सामुदायिक उन्नती
या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे कृषी-स्टार्टअप एक्स्पो, जिथे लॅव्हेंडर-आधारित उत्पादन उद्योगांनी परफ्यूम, साबण, आवश्यक तेल, मेणबत्त्या आणि सौंदर्यप्रसाधनांसारख्या नवोपक्रमांचे प्रदर्शन केले. ‘मेसर्स जेके अरोमा’, ‘हिमालयन इसेन्शियल ऑईल प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड’ आणि ‘रिदायू बोटॅनिक्स प्रा. लि.’सारख्या आघाडीच्या उद्योगांना वैशिष्ट्यीकृत करण्यात आले, ज्यात भारताच्या सुगंधी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात ग्रामीण उद्योजकतेच्या भूमिकेवर भर देण्यात आला. कृषी, फलोत्पादन, फ्लोरिकल्चर, आयुष आणि आरोग्य यांसारख्या विभागांच्या सहभागाने सहयोगी परिसंस्था आणखी मजबूत केली.
CSIR-IIIM जम्मूचे संचालक डॉ. झबीर अहमद यांनी ‘CSIR-अरोमा मिशन’च्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक परिणामांना अधोरेखित केले, ज्याने आता पाच हजारांहून अधिक शेतकर्यांना सहभागी करून घेतले आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये 750 हेक्टर्सपेक्षा जास्त जमिनीवर लॅव्हेंडरची लागवड सुलभ केली आहे. या महोत्सवात भादरवाह येथेच लॅव्हेंडर तेल आणि सुक्या फुलांपासून 10.5 कोटींची एकूण उलाढाल झाली, जी शाश्वत ग्रामीण उद्योग मॉडेल म्हणून लॅव्हेंडरची व्यवहार्यता अधोरेखित करते.
शेतकर्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी आणि प्रात्यक्षिकांदरम्यान त्यांच्या यशोगाथांचे कथन केले. ग्रामीण उपजीविकेवर लॅव्हेंडर लागवडीचा परिवर्तनकारी प्रभाव यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केला. या कार्यक्रमात लॅव्हेंडर नर्सरी आणि उत्पादन-आधारित उद्योगांद्वारे महिलांच्या वाढत्या सहभागाचा उत्सवदेखील साजरा करण्यात आला, ज्यामुळे आर्थिक सक्षमीकरणासाठी समावेशक मॉडेल तयार झाले.
शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय मॉडेल
तिसरा लॅव्हेंडर महोत्सव केवळ प्रादेशिक उत्सवापेक्षा अधिक व्यापक स्तरावर साजरा करण्यात आला. या महोत्सवाने शाश्वत, उच्च-मूल्याच्या शेतीवर भर दिला. या कार्यक्रमाला भादरवाहचे आ. दलिप सिंग परिहार, आ. शक्ती राज परिहार, डीडीसी डोडा यांचे अध्यक्ष धनतेर सिंग कोतवाल, डीडीसी डोडा यांचे अध्यक्ष हरविंदर सिंग डीसी डोडा, एसएसपी दोडा आणि डीडीसी डोडा यांच्या उपाध्यक्षा संगीता राणी भगत यांची उपस्थिती होती. डॉ. अजित के. शासनी, संचालक, CSIR-NBRI, लखनौ आणि डॉ. श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग, संचालक, CSIR-CFTRI, म्हैसुरु, डॉ. नानाओचा शर्मा, ‘जैव संसाधने आणि शाश्वत विकास संस्थे’चे (IBSD), संचालक यांची उपस्थित होती. हा कार्यक्रम ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद’ (CSIR)च्या संरक्षणाखाली, डॉ. जबीर अहमद, संचालक, CSIR-IIIM यांच्या संपूर्ण देखरेखीखाली आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या शास्त्रज्ञांच्या टीमने, तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचार्यांच्या आणि ईआरसह विद्यार्थ्यांच्या साहाय्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. अब्दुल रहीम, डॉ. आशा चौबे, डॉ. शशांक सिंग, डॉ. धीरज व्यास, डॉ. सुमित गांधी, डॉ. सुफला गुप्ता, डॉ. काझी नावेद अहमद, डॉ. राज किशोर राय, डॉ. सौरभ सरन, अजय कुमार, राजेश गुप्ता, अशोक शर्मा यांचा विशेषत्वाने यामध्ये उल्लेख करावा लागेल.
‘विवेक पार्क फाऊंडेशन’च्या सक्रिय भूमिकेने स्थानिक सहभाग आणि जागतिक क्षमतेवर आधारित स्केलेबल ग्रामीण विकास मॉडेल्स तयार करण्यासाठी ‘क्रॉस-सेक्टर’ सहकार्याचे महत्त्व पुन्हा एकदा यानिमित्ताने अधोरेखित केले.
रुचिता राणे
(लेखिका पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर - ‘पार्क’च्या जम्मू आणि काश्मीर विभागाच्या प्रमुख आहेत.)