मुंबई : अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा पाचवा भाग 'हाऊसफुल ५' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशीच या चित्रपटाने एकूण ५० कोटींपेक्षा अधिकची कमाई करत यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. विनोद, रहस्य आणि मोठ्या स्टारकास्टचा अफलातून मेळ असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं असून, थिएटरमध्ये गर्दीचा जोर कमालीचा आहे.
प्रदर्शित झालेल्या पहिल्या दिवशी 'हाऊसफुल ५' ने २४.३५ कोटींचं दमदार कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या दिवशी शनिवारी, या आकड्यात मोठी उडी घेत, जवळपास ३० कोटींच्या आसपासची कमाई झाली. या दोन दिवसांत चित्रपटाने एकूण ५४ कोटींचा टप्पा पार केला असून, रविवारचा कलेक्शन आणखी उंचावेल, अशी अपेक्षा आहे. हिंदीमध्ये थिएटरमध्ये प्रेक्षक उपस्थितीचा दर ३७.९७ टक्के इतका नोंदवण्यात आला.
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) हँडलवर आकडेवारी शेअर करताना म्हटलं की, "अक्षय कुमार विरुद्ध अक्षय कुमार २०२५ मधील सर्वात मोठा ओपनिंग विकेंड 'हाऊसफुल ५' चा असेल असं चित्र दिसतंय." त्यांनी यासोबत 'स्काय फोर्स' आणि 'केसरी चॅप्टर २' या अन्य चित्रपटांच्या कमाईची तुलना करत, 'हाऊसफुल ५' सर्वाधिक कमाई करणारा ठरत असल्याचं नमूद केलं.
'हाऊसफुल ५' चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं असून, निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फखरी आणि सौंदर्या शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे यावेळी संजय दत्त, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, फरदीन खान, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, रणजित आणि चित्रांगदा सिंग यांसारख्या कलाकारांनीही जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.
'हाऊसफुल ५' चे खास वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट दोन वेगवेगळ्या व्हर्जन्समध्ये प्रदर्शित झाला आहे. 'हाऊसफुल ५अ' आणि 'हाऊसफुल ५ब'. दोन्ही व्हर्जन्समध्ये वेगवेगळे क्लायमॅक्स आहेत, जे प्रेक्षकांना थरार अनुभव देतात. कथानक एका आलिशान क्रूझवर घडतं, जिथे एका अब्जाधीशाचा वारसदार असल्याचा दावा करणारे अनेकजण एकाच वेळी उपस्थित असतात आणि तिथून सुरू होतो गोंधळ, खोटेपणा आणि विनोदाचा जबरदस्त खेळ.
दुसऱ्या दिवशीच्या कमाईने निर्मात्यांच्या आशा उंचावल्या आहेत. रविवारची सुट्टी आणि पुढील आठवड्यातील वर्ड ऑफ माउथमुळे 'हाऊसफुल ५' ची कमाई शंभर कोटींच्या दिशेने झेप घेईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या ‘हाऊसफुल’ ब्रँडची ही नवीन जोडणी प्रेक्षकांना रंजनाची भरघोस मेजवानी देत आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.