जुना राग कायम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |
Yuvraj_1  H x W

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंहने माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीवर पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केले आणि क्रिकेटविश्व पुन्हा एकदा ढवळून निघाले. धोनी भारतीय संघात केवळ आपल्या मर्जीतील खेळाडूंनाच स्थान देत असे. सुरेश रैना, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आदी मर्जीतील खेळाडूंनाच त्याने नेहमी पुढे केले. मात्र, या खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंना त्याने संघात स्थान दिले नाही, असे आरोप युवराजने केल्यानंतर क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले. अनेक क्रिकेट समीक्षकांनी यावर आपली मते नोंदवण्यास सुरुवात केली. मात्र, अनेक समीक्षक याही वेळी धोनीच्याच मागे उभे असल्याचे दिसून आले. युवराजचे हे म्हणणे म्हणजे धोनीवर पुन्हा सूड उगवण्यासारखेच असल्याचे त्यांनी सांगितले. संघात कोणत्या खेळाडूंना स्थान द्यावे, दौर्‍यासाठी कोणत्या खेळाडूंची निवड करावी आणि कोणत्या खेळाडूला कितवे स्थान द्यावे आदींबाबतचे सर्व निर्णय कधीही एकट्या कर्णधाराच्या मर्जीने होत नसतात. संघात कोणत्या खेळाडूंना स्थान द्यावे, दौर्‍यासाठी कुणाची निवड करावी, याबाबतचे सर्वस्वी निर्णय निवड समिती, सल्लागार समिती, बोर्डाचे अध्यक्ष आदी सदस्य मिळून ठरवतात. हे सर्व निर्णय घेताना कर्णधाराला विश्वासात घेतलेच जाते. मात्र, ज्या दिवशी प्रत्यक्षात सामना खेळायचा असतो, त्या दिवशी संघाचे मुख्य प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, टीम मेन्टॉर आणि फिजियो आदी सर्व खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणी घेऊनच त्यांना संघात स्थान देतात. विशिष्ट प्रकारच्या खेळपट्टीवर कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देणे याचा निर्णय सर्वांशी सल्लामसलत करूनच घेतला जातो. त्यामुळे धोनी संघात विशिष्ट खेळाडूंना स्थान देतो हे म्हणणे अयोग्य ठरेल, असे मत समीक्षक नोंदवतात. आपल्याला संघात स्थान न मिळाल्याबद्दल युवराजने धोनीला कारणीभूत ठरविण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा युवराजने धोनीवर अनेकदा अशा प्रकारचे आरोप केले आहेत, मात्र यात काही तथ्य नसल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे. परंतु, आपल्याच संघातील खेळाडूविरूद्ध वारंवार सूड उगविण्याची ही पद्धत फार अयोग्य असल्याचे मत समीक्षक येथे नोंदवतात.

पुनर्विचाराची गरज


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याच्या विश्वविक्रमाची नोंद अद्यापपर्यंत केवळ एकाच खेळाडूच्या नावावर आहे, तो म्हणजे भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह. जे आजवर कोणत्याही खेळाडूला शक्य झाले नव्हते, ते त्याने करुन दाखवले. परंतु, २००७ साली ‘टी-२०’ विश्वचषकादरम्यान युवराज सिंहने मात्र हा विक्रम आपल्या नावावर केला. या विक्रमाची नोंद होऊन जवळपास १३ वर्षे उलटली. परंतु, आजही आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान कुणालाही या विक्रमाला गवसणी घालता आलेली नाही. असा विक्रम नावावर असणार्‍या या खेळाडूला कर्करोगाची लागण झाली. मात्र, त्यावरही मात करत युवराजने पुनर्रागमन केले आणि २०११ सालच्या विश्वचषकातही चमकदार कामगिरी केली. भारताला विश्वचषक जिंकून देण्यात युवराजचा मोलाचा वाटा राहिला आहे, यात काही शंकाच नाही. या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. सन्मानाने निरोप घेणे शक्य झाले नाही. मात्र, आता गरज आहे ती त्याला आता पुनर्विचार करण्याची. २००७ ‘टी-२०’ विश्वचषक सामन्यानंतर कर्करोगामुळे युवराज काहीकाळ क्रिकेटपासून दूर राहिला. त्याच्या संघातील पुनरागमनाबाबत अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले. त्याला संघात स्थान देण्याबाबत कर्णधार धोनीनेही पाठिंबा दर्शविल्यानंतर २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत युवराज खेळताना दिसला. २०११ सालानंतरही युवराज तंदुरुस्तीशी काहीसा झगडताना दिसला. अनेकदा तो संघातून आत-बाहेर होतानाचे पहायला मिळाले. २०१४ साली झालेल्या ‘टी-२०’ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत युवराजने निराशाजनक कामगिरी केली. मात्र, तेव्हाही धोनीने युवराजला दोषी ठरवले नव्हते. पराभव आणि विजयाची जबाबदारी ही प्रत्येक खेळाडूची असते. कुण्या एका खेळाडूची नाही, असे म्हणत धोनीने युवराजची पाठराखण केली होती. मात्र, खराब फॉर्ममुळे युवराज संघातून पुन्हा बाहेर झाला. रणजी, आयपीएल आदी स्पर्धांमध्येही त्याला पुनरागमन करता आले नाही. परिणामी, भारतीय संघात पुनरागमन करणे युवराजला शक्य झाले नाही. २०१७ सालानंतर धोनीनेही कर्णधारपद सोडले. गेल्या तीन वर्षांपासून विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा आहे. खराब फॉर्ममुळे कोहलीच्या नेतृत्वातील संघातही युवराजला स्थान मिळाले नाही. त्यामुळे संघात आपले पुनरागमन न होण्यासाठी केवळ धोनीला जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे?
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@