प्लीज वेट, विचारून सांगतो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Mar-2020   
Total Views |


vedh_1  H x W:



रामलल्ला अगदी खरं सांगतो, त्या भाजपचे हिंदुत्व खरे नाही आणि भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. काय म्हणता, आमचे हिंदुत्व खरे आहे का, आमचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध आहे का? थांबा, मी काय सांगणार? मॅडम आणि काकांना विचारतो. प्लिज, वेट, विचारून सांगतो...



त्यांनी कारसेवा केली असेल
, रथयात्रा काढली असेल, त्यांच्या काळातच तुझ्या जन्मभूमीचा प्रश्न सुटला असेल. पण तरीही भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, म्हणजे नाही. हिंदुत्वाचे सर्व संदर्भ त्यांनी आपले आदर्श मानलेत. हिंदुत्व आणि त्यासंबंधित कशाबाबतही ते बिलकुल तडजोड करत नाहीत. आम्ही असे तीन तिगाडा. त्यामुळे सत्तेत असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाबाबतही लाचारी पत्करावी लागली... त्याबाबतही त्या कमळवाल्यांनी कोण गहजब केला. तरीही, भाजपचे हिंदुत्व खरे नाही आणि भाजप म्हणजे हिंदुत्व नाही समजले का?



हो म्हणा
, नाही तर गाठ या वाघाशी आहे. वाघनखांनी असा कोथळा काढेन ना बाहेर. मी म्हणतो म्हणजे मान्य कराच. त्यांचे हिंदुत्व खरे नाही. राम मंदिरासाठी आम्हीच १ कोटी रुपये दिलेत. कळले का? आम्ही इतके सांगतो तरी जगभरातून लोक त्यांनाच ‘हिंदुत्वाचे कैवारी’ म्हणून ओळखतात. आम्ही पण अयोध्येला आलोय. अगदी सुळावरची पोळीच ती. आतल्या आत किती अ‍ॅडजेस्टमेंट केल्या लोकांना काय कळणार? अयोध्येला तर गेलो. पण सगळे लक्ष मॅडम आणि काकांकडेे. कारण काँग्रेसचे आदर्श सॉरी सॉरी अशोक चव्हाण म्हणाले होते ना की, मुस्लीम बांधवांना त्या कमळवाल्यांची जिरवायची होती, म्हणून त्यांनी आमच्याशी दोस्ती केली. आता मी हिंदूंच्या राम मंदिरामध्ये गेलोय, तर यावर ते सारे काय प्रतिक्रिया देतील? बापरे. खूप अस्वस्थ आहे. या कारणाने सरकार कोसळू नको देऊ रे रामलल्ला. मी अयोध्येला पुन्हा येईन, पुन्हा येईन. छे! हे पुन्हा येईन शब्द माझ्या मनात घर करून राहिले आहेत. देवा, रामलल्ला ते कितीही म्हणाले ना की, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. तरी त्यांना येऊ नको देऊ रे रामलल्ला. हवं तर मला अयोध्येला पुन्हा बोलव. हो, पण त्यावेळी मी सत्तेवर असू दे रे देवा. रामलल्ला अगदी खरं सांगतो, त्या भाजपचे हिंदुत्व खरे नाही आणि भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. काय म्हणता, आमचे हिंदुत्व खरे आहे का, आमचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध आहे का? थांबा, मी काय सांगणार? मॅडम आणि काकांना विचारतो. प्लिज, वेट, विचारून सांगतो...


प्रकाशबापू
: थोर गुप्तचर


दिल्लीची दंगल पूर्वनियोजित होती
. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने ही दंगल घडवून आणली. राजसत्ता धर्मसत्तेच्या ताब्यात गेली की, कारभार व्यवस्थित चालूच शकत नाही, असे प्रकाशबापू म्हणजे वंबआचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. वर त्यांना अशीही गुप्त खबर आहे की, कुणीतरी २५ लाख सैनिकी गणवेश विकत घेतले. का घेतले याचा मागोवा सरकारने काढावा. थोडक्यात, प्रकाश आंबेडकरांना बर्‍याच गुप्त गोष्टी माहिती आहेत. यावर जे उगीचच वंबआच्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या देदीप्यमान कारकिर्दीवर जळतात ते काही नतद्रष्ट लगेच म्हणतात की, “उद्या भारतात कोरोना व्हायरस रा.स्व.संघ आणि भाजपने आला, अशी गुप्त बातमीही प्रकाश आंबेडकर देतील.” तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या मते, राजसत्ता धर्मसत्तेेच्या हातात आहे. त्यामुळे या अशा दंगली होतात. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना राजसत्ता अधर्मांच्या हातात हवी आहे का?



जाऊ दे
, प्रकाश आंबेडकरांवर जळणारे काहीही म्हणोत पण एक मात्र मानायलाच हवे की, ते थोर गुप्तचर आहेत. त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणीचे सारे सारे दिसते. त्याशिवाय का, दिल्लीच्या पूर्वनियोजित दंगलीबाबत त्यांना कळले. पण आता प्रश्न असा आहे की, दिल्लीची दंगल पूर्वनियोजित आणि रा. स्व. संघ पुरस्कृत होती, तर शाहीनबागेमध्ये रा. स्व. संघ किंवा भाजपशी संबंधित लोक दिसायला हवे होते. तिथे तर निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंबआचा प्रचार करणारी डफली गँग हजर होती आणि आझादीसदृश्य रडगाणे गात होती, की हा केवळ योगायोग होता? समाजाला अस्वस्थ करणार्‍या कोणत्याही घटना असो, तिथे ही अशी टाळकी दिसतातच दिसतात. पण दंगलीमध्ये किंवा समाजकारण बिघडविण्यामध्ये त्यांचा काही हात आहे, हे असे आपण म्हणायचे नसते. कारण, असे म्हटले की, ‘संविधान खतरें में है’, असे बोंबलायला हे मोकळे असतात. असो, तर प्रकाश आंबेडकरांना कळले आहे की, दिल्लीची दंगल रा. स्व. संघ आणि भाजपने घडवली आहे. काय म्हणता, मी अजून आहे बरं का? असे लोकांना कळावे म्हणून ते असे म्हणतात? भाजप, रा. स्व. संघाची निंदा केल्याशिवाय त्यांना चंदा मिळणार नाही म्हणता? अरेरे...

@@AUTHORINFO_V1@@