भीष्मांची राजनीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |
Bhishma_1  H x



भीष्म पुढे म्हणाले, “युधिष्ठिरा, ज्याच्यावरती डोळे मिटून विश्वास ठेवता येईल, अशा व्यक्तीला राजाने न्यायाधीश म्हणून नेमावे. ज्या राज्यात योग्य न्याय केला जातो, त्या राज्याचा पाया भक्कम असतो. राजा हा काळ घडवतो. काळ राजाला घडवत नसतो. जे राज्य सदाचरणाच्या पायावर उभे असते, त्याच राज्यात शांती असते.”


युधिष्ठिर म्हणाला, ”राजाला कुणाची तरी मदत ही घ्यावीच लागते. त्याचे मंत्री हेच त्याचे मदतनीस असतात. या मंत्र्यांच्या अंगी कोणकोणते गुण असावे? त्यांची कर्तव्ये काय?” यावर भीष्म म्हणाले, “ज्यांच्या स्वभावाची व चारित्र्याची संपूर्ण माहिती असते, असेच परिचित लोक मंत्री म्हणून नेमावे. चार प्रकारचे लोक मिळतात, ज्यांची उद्दिष्टे राजाच्या उद्दिष्टासी जुळून येतात हा एक प्रकार. राजाला वाहून घेतलेला हा दुसरा, तर रक्ताचे नातेवाईक हा तिसरा प्रकार आणि देणग्या, पुरस्कार देऊन राजाने जवळ केलेला हा चौथा प्रकार. अजून एक प्रकार असतो तो म्हणजे सदाचरणी माणूस! समजा, राजाला अशा गोष्टी करायच्या आहेत, ज्या सदाचरणाला धरून नाहीत, तेव्हा त्या गोष्टी सदाचरणी माणसाला कळू देता कामा नये! कारण, सदाचरण आणि कुटिलता हे दोन्ही बरोबर चालूच शकत नाहीत. म्हणूनच राजाने कुठल्याही एका माणसावर पूर्णपणे विसंबून राहू नये. राजाला जसे मरणाचे भय वाटते, तसेच आपल्या नातेवाईकांचेही वाटले पाहिजे. कारण, त्याचे वैभव त्याच्या नातेवाईकांना पाहवत नाही! परंतु, नातेवाईक जवळ नसता राजा एकटेपणाने दुःखी राहतो. म्हणून राजाने नातेवाईकपण जवळ करावेत, पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकू नये. त्यांना भासवावं की त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.” युधिष्ठिराने विचारले, “राजाला कायद्याचा सल्ला देणारे कसे असावेत?” त्यावर भीष्म म्हणाले, “कायदा खाते सांभाळणारे अधिकारी नम्र, संयमी, सत्यशील व लोकहिताची काळजी घेणारे असावेत. ते स्पष्टवक्ते असावेत.” “आणि सैन्यातील अधिकारी?” युधिष्ठिराने विचारले. भीष्म म्हणाले, “सेनाधिकारी उच्च घराण्याची परंपरा राखणारे असावेत. आपल्या स्वदेशाविषयी त्यांना खूप प्रेम व अभिमान असावा. राजाचा व त्यांचा देश एकच असावा. ते विद्वान, शहाणे व दिसायला रुबाबदार, देखणे असावेत. वागणूक उत्तम व निष्ठावंत असावी.”



युधिष्ठिर म्हणाला, “अपराध्यांना शिक्षा कशी करावी?” भीष्म म्हणाले, “शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरुपावर ठरते. श्रीमंत गुन्हेगारास दंड करावा. मालमत्ता जप्त करावी. गरीब गुन्हेगारास कारावास द्यावा. दुष्ट असेल तर शारीरिक शिक्षा करावी.”



युधिष्ठिर म्हणाला, “राजाने रयतेकडून कर कसे घ्यावे?” भीष्म उवाच, “प्रजेला करांचे ओझे वाटू नये. जसे फुलांवर बसून भुंगा मध गोळा करतो तसे कर गोळा करावेत. जळवा ज्याप्रमाणे हळुवारपणे रक्त शोषून घेतात, तसेच राजाने करावे. जनतेला न दुखवता नकळत कर गोळा करावेत.”


युधिष्ठिराने विचारले, “राजाची वागणूक कशी असावी?” भीष्म म्हणाले, “सदाचरण हा त्याच्या वागण्याचा पाया होय. शुद्ध आचरणाने राजा जगही जिंकू शकतो. मनात द्वेषाला थारा नसावा. त्याचा आपल्या इंद्रियांवर ताबा असावा.” युधिष्ठिराने विचारले, “राजाची कर्तव्ये?” भीष्म उत्तरले, “माता, पिता आणि गुरू यांची सेवा हे त्याचे आद्य कर्तव्य होय.”



युधिष्ठिर म्हणाला, “धर्म, अर्थ आणि काम याविषयी सांगा.” भीष्म म्हणाले, “जो माणूस धर्माचा मार्ग न सोडता, संपत्ती मिळवतो त्याच्या ठायी हे तिन्ही पुरुषार्थ असतातच! सुख हेच संपत्तीचे फळ आहे आणि संपत्ती सदाचरणात वापरली गेली पाहिजे व सदाचरणातून आली पाहिजे. या तिन्ही गोष्टींचा संन्यास घेणे याला ‘मुक्ती’ असे म्हणतात. सद्गुरु हे आत्म्याची शुद्धता मिळण्यासाठी आवश्यक असतात. धर्म, अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ जेव्हा शरीरसुखाच्या पलीकडे जाऊन आत्मज्ञानात विलीन होतात, तेव्हा मोक्षाची प्राप्ती होते. मोक्ष हेच माणसाचे ध्येय असले पाहिजे.”



युधिष्ठिराने पुढे विचारले, “जेव्हा शत्रू हल्ला करतो, तेव्हा राजाने बुद्धिमत्ता कशी वापरावी?”



भीष्माचार्य म्हणाले, “संकटकाळी राजाची कर्तव्य कोणती हे मी तुला सांगतो. काही वेळा जो आपला शत्रू असतो तो मित्र होतो आणि जो मित्र असतो तो शत्रू होतो. अशा वेळी मनाचा गोंधळ उडतो. अनिश्चितपणा वाढतो. या अशा वेळी बुद्धिमत्तेचा उपयोग होतो. अशावेळी शत्रूशी तह करावा की युद्ध, हे बुद्धी वापरून ठरवावे. तुमच्या हिताची ज्यांना काळजी आहे, अशा बुद्धिमान माणसांशी तुम्ही मित्रत्वाने वागावे. पण, जर तुमच्या जीवावर बेतणार असेल तर शत्रूशी शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करावे. हा सारासार विचार करून जो राजा वागतो तो निश्चितच यशस्वी होतो.”

(क्रमशः)


- सुरेश कुळकर्णी
@@AUTHORINFO_V1@@