जगातील धार्मिक असहिष्णु देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2020   
Total Views |

amerika_1  H x
 
 
अमेरिकेच्या मते, अल शबाब, अल कायदा, बोको हराम, हयता तहरीर अल शम, हुथी, आयएसएस, आयएसआयएस ग्रेटर सहारा, आयएसएस वेस्ट आफ्रिका, जमात नासर अल इस्लावल मुस्लीमिन आणि तालिबान या संघटना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालत आहेत. मात्र, अमेरिकेच्या या अहवालामध्ये आशिया किंवा आफ्रिका या खंडातील देशच आहेत. अमेरिका. युरोप किंवा ऑस्ट्रेलिया खंडात धार्मिक असहिष्णुता नाही का?
 
 
अमेरिकेने नुकतेच आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावर सर्वेक्षण केले. त्यामध्ये धार्मिक असहिष्णुता, बहुसांख्यिक धर्माचे अल्पसंख्यकांवर निर्बंध, अत्याचार, विशिष्ट धर्मीयांवर होणारा अन्याय, धार्मिक विद्वेषावरून विशिष्ट धर्माची संधी नाकारणे, प्रगती नाकारणे या घटना ज्या देशामध्ये तीव्रतेने घडतात, अशा देशांची अमेरिकेने नुकतीच यादी बनवली आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य या मुद्द्यावर अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण केले. त्यातूनच मग ज्या देशाचे वातावरण धार्मिक विद्वेषाने बरबटले आहे, अशा देशांची सूची बनवली गेली. आता अर्थात असहिष्णुता, धार्मिकता वगैरे शब्द आले की भारतात राहून, भारताचे खाऊन, भारताचीच निंदा करणार्‍या काहींना आनंदाचे भरते येऊ शकते. त्यांना वाटू शकते की, भारतातील काही विघ्नसंतोषी लोक सदानकदा धार्मिक विद्वेषाने भरलेल्या आंदोलनाचा रतीब घालत असतात. कधी ते ‘सीएए’ शाहीनबाग असते, कधी हाथरस असते, तर कधी दिल्लीचे तथाकथित शेतकरी आंदोलन असते. तसेच देशातला एक अतिशय छोटा पण विचाराने आणि कृतीने मस्तवाल आणि कृतघ्न असलेला गटही कायम भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर निंदात्मक टीका टिप्पणी करत असतो. हा गट अमुक-अमुक धर्मातील लोकांवर अत्याचार झाला म्हणत मग सह्यांची मोहीम काय राबवतो, कुवत नसताना चमचेगिरी करून मिळवलेले पुरस्कार काय परत करतो. थोडक्यात, हा गट भारतात कसे धार्मिक विद्वेषाने भरलेले वातावरण आहे, हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. अशा गटांना आता वाटू शकते की, आपण ज्या उचापती केल्या आहेत त्यामुळे भारताचे नाव नक्की अमेरिकेच्या या यादीत असेल.
 
 
पण नाही, या यादीमध्ये भारताचे नाव नाही. भारतामध्ये धार्मिक सहिष्णुता आणि सौहार्दाचे वातावरण आहे. इथे धर्मावरून कोणावरही अत्याचार होत नाहीत. भारतात हिंदू, मुस्लीम, पारशी आणि इतर अनेक छोटे-मोठे पंथ सुरळीत जीवन जगत आहेत. भारतात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे धार्मिक विभिन्नतेच्या आधाराने इथे कुणीही पीडित नाही की शोषित नाही. असेच यावरून स्पष्ट होते. अमेरिकेच्या या यादीमध्ये दहा देशांचा समावेश आहे. अर्थात, या यादीमध्ये कोणत्या देशांचा समावेश असेल हे काही सांगायची गरजच नाही. या यादीमध्ये पाकिस्तान, चीन, म्यानमार, इरिटीया, इराण, नायजेरिया, उत्तर कोरिया, सौदी अरेबिया, ताजकीस्तान आणि तुर्केमेनिस्तान या देशांचा समावेश आहे. जगाच्या पाठीवर या देशांमध्ये सातत्याने धार्मिक विद्वेषाचे बळी होणार्‍यांची संख्या जास्त आहे. पाकिस्तामध्ये हिंदू, शीख आणि ख्रिश्चन व्यक्तींना दिवसेंदिवस जगणे कठीण होत आहे. ईशनिंदा कायद्याचा राक्षस त्यांच्या मानगुटीवर कायमच बसलेला असतो. तसेच पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यक समाजाच्या मुलींचे अपहरण करणे, त्यांच्याशी जबरदस्तीने विवाह करणे, त्यांना धर्मांतरास बळजबरी करणे या घटना सातत्याने आजही घडत आहेत. तसेच मंदिर, गुरूद्वारा, चर्च यांना हानी पोहोचवणे हे उद्योगही तिथे सुरूच आहेत. दुसरीकडे म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवरून वादळ उठले आहे. त्या वादळाचा धुरळा काही केल्या थांबत नाही. सध्या म्यानमारमध्ये रोहिंग्यांना एका निर्जन बेटांवर वसवण्यात येत आहे, अशी चर्चा आहे. चीनमध्ये उघूर मुसलमानांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यांच्यासाठी एक वेगळीच वसाहत बनवली गेली आहे. तिथे त्यांना त्यांच्या धार्मिक प्रथा वगैरे पाळायला चिनी सरकारने बंदी घातली आहे. बाकी इतर देशांमध्ये अतिरेक्यांनी दहशत माजवली आहे. यादीतील उर्वरित देशात अतिरेकी संघटना धर्माचे नाव घेऊन त्यांच्या धर्मापेक्षा वेगळ्या धर्माच्या लोकांना मरणयातनाच देत आहेत. अमेरिकेच्या मते, अल शबाब, अल कायदा, बोको हराम, हयता तहरीर अल शम, हुथी, आयएसएस, आयएसआयएस ग्रेटर सहारा, आयएसएस वेस्ट आफ्रिका, जमात नासर अल इस्लावल मुस्लीमिन आणि तालिबान या संघटना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालत आहेत. मात्र, अमेरिकेच्या या अहवालामध्ये आशिया किंवा आफ्रिका या खंडातील देशच आहेत. अमेरिका. युरोप किंवा ऑस्ट्रेलिया खंडात धार्मिक असहिष्णुता नाही का? यावर मात्र हा अहवाल काही म्हणत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@