थलायवाच्या माघारीचा अन्वयार्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2020   
Total Views |
rajni  _1  H x
 


राजकारण कधी, कोणते आणि कसे वळण घेईल, हे खुद्द परमेश्वरही सांगू शकत नाही, असे जे म्हटले जाते, ते थलायवा रजनीकांत यांच्या राजकारणात उतरण्यापूर्वीच्याच ‘एक्झिट’मधून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार होते. त्या अनुषंगाने तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळीही भरली जाईल, असे राजकीय तर्कही लढविले गेले. २०२१ मध्ये होणार्‍या तामिळनाडूच्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळवही रजनीकांत यांचा येऊ घातलेला पक्ष नजरेसमोर ठेवूनच सुरू होती. पण, त्याला एकाएकी ब्रेक लागलेला दिसतो. रजनीकांत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी काळात आणि पुढे भविष्यातही त्यांनी राजकारणात उतरणार नसल्याचा निर्णय घेतल्याने ‘कही खुशी, कही गम’ असेच काहीसे चित्र तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाले. राजकीयपटावर नवीन गडी आला की, अटी-तटीची लढाई ही ठरलेलीच. त्यात तो गडी रजनीकांतसारखा दाक्षिणात्य सुपरस्टार असेल, तर मग राजकीय विरोधकांना धडकी न भरली तरच नवल! पण, रजनीकांत यांच्या या माघारीमुळे अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पारंपरिक राजकीय स्पर्धकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, रजनीकांत यांनी निवडणुकीत उडी घेतली असती, तर त्यांचे राजकीय आगमन या दोन्ही पक्षांच्या व्होटबँकेला धक्का लावणारे ठरले असते. एवढेच नाही, तर मतविभाजनाचा मोठा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याच्या भीतीमुळे आधीच अस्वस्थता होती. दुसरीकडे रजनीकांत यांचे भाजपशी असलेले चांगले संबंधही वेगळेच संकेत देत होते. रजनीकांत भाजप-अण्णाद्रमुकची साथ देणार की, स्वतंत्रपणे आपल्या करिष्म्यावर कमाल करणार, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले होते. पण, रजनीकांत यांच्या एका घोषणेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात निवडणुकीपूर्वीच एकाएकी चित्र पालटलेले दिसते. रजनीकांत यांनी एक पाऊल मागे घेतल्याने आपसूकच द्रमुक-अण्णाद्रमुक यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी नेतृत्वाचा अभाव आणि अंतर्गत राजकारणाने पोखरलेल्या या दोन्ही पारंपरिक पक्षांसाठी ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नसेल, हे वेगळे सांगायला नको.

अब तेरा क्या होगा हसन?

रजनीकांत यांनी घेतलेली राजकीय माघार ही कुणासाठी संधी, तर कुणासाठी डोकेदुखी ठरण्याचीच शक्यता जास्त दिसते. रजनीकांत यांच्या माघारीचा जसा थेट फायदा द्रमुक-अण्णाद्रमुक या तामिळनाडूच्या राजकारणातील वाटेकर्‍यांना होऊ शकतो, तसेच रजनीकांत यांच्या अनुपस्थितीने कमल हसन यांचे नुकसानच अधिक होईल, असे मानणाराही एक राजकीय प्रवाह आहे. याचे कारण म्हणजे, कमल हसन यांनी आपल्या ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाचे रजनीकांत यांच्या जन्मालाही न आलेल्या पक्षाशी सूत जुळविण्याचा केलेला प्रयत्न. पाळण्यातच लग्न ठरविण्याच्या प्रकाराप्रमाणेच कमल हसन यांनीही रजनीकांत यांच्या न जन्मलेल्या पक्षाशी आधीच गाठ मारण्याचा प्रयत्न केला. पण, आता रजनीकांत यांच्या माघारीमुळे मात्र हसन यांना अपेक्षित असलेला राजकीय आधार एकाएकी राजकीय पटावरून दिसेनासा झाला आहे. रजनीकांत यांची प्रसिद्धी राजकारणात ‘कॅश’ करण्यासाठी कमल हसन प्रयत्नशील होते. तशा चर्चाही पडद्याआड सुरू होत्या. पण, रजनीकांत यांच्याकडून मात्र तसे कुठलेही स्पष्ट संकेत कधीच मिळाले नव्हते. पण, कमल हसन मात्र आम्ही दोन्ही सुपरस्टार एकत्र येऊन तामिळनाडूमध्ये क्रांती घडवून आणू, या आविर्भावातच होते. पण, रजनीकांत यांच्या माघारीमुळे हसन यांचा प्लान मात्र ‘फ्लॉप’ झाला. आता कमल हसन यांच्यासमोर एकहाती लढण्याचे मोठे आव्हान असेलच, शिवाय तामिळनाडूत जो द्रमुक-अण्णाद्रमुकला ‘तिसरा पर्याय’ ठरण्याचा खटाटोप सुरू असतो, त्यालाही आता सुरुंग लागू शकतो. कारण, इतर छोटे-मोठे राजकीय पक्षही हसन यांच्या साथीला कितपत येतील, हे आजच सांगता येत नाही. तसेच हसन यांच्या कट्टरवादी ओवेसींच्या एमआयएमशी युती करण्याच्या हालचालींनाही तामिळी जनतेकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नाही. तेव्हा, पुरोगामित्वाचा डंका वाजविणारे हसन आता एकटेच मैदानात उतरण्याशिवाय गत्यंतर नाही. पण, रजनीकांत नाहीत, एक मोठा स्पर्धक आपल्या मार्गातून स्वत:च माघारी फिरला, असा विचार करून त्यांनी आपल्या पक्षाची ध्येयधोरणे निश्चित केली, तर यदाकदाचित त्यांना जनसमर्थनही मिळेलही. पण, त्यासाठी बेताल वक्तव्यांना कुलूप लावण्याबरोबरच तळागाळात उतरून राजकीय मोर्चेबांधणीशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यामुळे आगामी काळात तामिळनाडूचे राजकारण कोणत्या दिशेने कूच करते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@