संप्रदायापुढील कार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2020
Total Views |

swmi _1  H x W:
 
तीर्थाटनाच्या काळात रामदास स्वामींनी हिंदू धर्माची आणि भारतीय संस्कृतीची होत असलेली उपेक्षा आणि अवनती पाहिली होती, अनुभवली होती. त्यावेळी राजकीय सत्ता म्लेंच्छांच्या हाती गेल्याने हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य उरले नव्हते. त्यांच्यावर अत्याचार होत होते.
 
रामदासांच्या काळी मुसलमानांना भारतात येऊन ५०० वर्षे झाली होती. या काळात सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार, भोंदूगिरी माजली होती. तशी ती धार्मिक क्षेत्रातही होती. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती विस्कळीत झाली होती. यवनांच्या सत्तेला त्यांच्या धर्मप्रसाराची व इतर धर्मीयांच्या द्वेषाची धार चढल्याने हिंदूंच्या देवळांचा, देवांच्या मूर्तींचा विद्ध्वंस करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे त्यांचे कार्य बिनबोभाट चालले होते.
 
 
या विद्ध्वंसक कारवायांतून त्यांना हिंदू समाजात संदेश पसरावयाचा होता की, बघा, आम्ही तुमची देवळे पाडली, मशिदी उभारल्या, मूर्तिभंजन केले, पण तुमचा देव हे वाचवू शकला नाही. त्यामुळे हिंसक कारवायांचा त्यांनी धुमाकूळ घातला. हिंदुस्थानने हे अनेक वर्षे सहन केले होते. गझनीच्या मोहम्मदाने हिंदुस्थानावर १७ स्वार्‍या करुन देवळे पाडून त्यातील सोनेनाणे, रत्ने लुटून नेली होती. त्यानंतर आलेल्या खिलजीने तेराव्या शतकात दिल्लीमध्ये सुलतानशाही निर्माण केली होती.
 
त्याकाळात अनेक हिंसक कारवायांची नोंद इतिहासात आहे. इ. स. १२०६ मध्ये बख्त्यार खिलजीने बिहार आणि बंगाल प्रांत जिंकले. बिहार घेतल्यावर त्याने बुद्धांच्या विहारातील बौद्धभिक्षूंची व अनेक ब्राह्मणांची अमानुषपणे कत्तल केली. तेथील नालंदा विद्यापीठाला आग लावली तेथील सर्व ग्रंथसंपदा त्या आगीत भस्मसात झाली. असं म्हणतात की, हे ग्रंथ सहा महिने जळत होते. रानटी व हिंसक कारवायांपुढे तेथील सदाचरण, सौजन्य, विद्वत्ता, मौलिक ग्रंथभांडार कवडीमोलाचे ठरले. त्यानंतर इ. स. १५२६ मध्ये आलेल्या जहिरुद्दीन बाबराने आपले हिंदुस्थानातील वास्तव्य पक्के केले. त्याच्या पिढ्या येथे वाढल्या. त्यांनीही अत्याचारात भर घातली आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत अत्याचारांचे शिखर गाठले गेले.
 
 
रामदासस्वामींना हे माहीत होते म्हणून औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंग्या’ असा तुच्छतादर्शक करतात. ‘बुडाला औरंग्यापापी। म्लेंच्छ संहारा जाहला॥’ ही शापवाणी समर्थांच्या मुखातून बाहेर पडली. यावरुन औरंगजेबाच्या अत्याचारांची कल्पना यावी. हा इतिहास सर्वांना माहीत आहे. तरीसुद्धा तो विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे भारतीय संस्कृती रक्षणाचे आणि हिंदू धर्मस्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी रामदासांनी उभारलेले कार्य किती कठीण होते, याची कल्पना यावी यासाठी हिंदूंना धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य मुक्तपणे अनुभवता यावे, म्हणून लोकांना रामोपासनेचे महत्त्व सांगून सारा हिंदुस्थान म्लेंच्छांच्या जुलमी सत्तेतून सोडवून मुक्त केला पाहिजे, असे रामदासांच्या मनात होते.
 
 
या विचाराने प्रेरित होऊन संप्रदायाची बांधणी करायला त्यांनी सुरुवात केली. रामोपासनेसाठी समाज संघटन करायला सुरुवात केली. स्वामींनी संप्रदायात गुणवत्तेच्या आधारावर शिष्यांना प्रवेश दिला होता, हे आपण मागील लेखात पाहिले स्वामींचा हा संप्रदाय ‘समर्थ संप्रदाय’ या नावाने ओळखला जाऊ लागला. रामदास स्वामी आपले आराध्य दैवत श्रीरामाला ‘समर्थ’ म्हणत असत. स्वामींचा समर्थ म्हणजे प्रभू रामचंद्र. त्यामुळे समर्थ संप्रदाय म्हणजे ‘समर्थ’ जे श्रीराम त्यांच्या उपासनेचा संप्रदाय असा अर्थ स्वामींच्या मनात होता. तथापि, नंतरच्या काळात रामदास स्वामींच्या शिष्यांना राम आणि रामदासस्वामी यांच्यातील एकरुपतेची जाणीव झाली, तशी त्यांची खात्री पटली म्हणून ते स्वामींना समर्थ म्हणू लागले.
 
 
ते पुढे एवढे प्रचलित झाले की, समर्थ संप्रदाय म्हणजे स्वामींनी स्थापन केलेला संप्रदाय असे सर्वजण म्हणू लागले. ते काहीही असेल तरी अत्याचारी, घमेंडखोर, हिंसक, म्लेंच्छ राजकर्त्यांच्या गुलामगिरीतून लोकांना सोडवून त्यांना रामराज्यासाठी तयार करणे हे अत्यंत अवघड कार्य महंतांद्वारा संप्रदायाला करायचे होते. या प्रचंड कार्याचा आवाका स्वामींनी जाणला होता. म्हणून कार्यकर्त्यांचे महंतांचे जाळे तयार करायला स्वामींनी सुरुवात केला. स्वामी कुठल्याही कार्याची आखणी शिस्तबद्ध पद्धतीने करीत असत. लिहिता-वाचता येणार्‍यांना आणि विद्येचा व्यासंग करणार्‍या लोकांनाच स्वामींनी संप्रदायात घेतले होते. नि:स्पृह महंत तयार करण्यासाठी स्वामी शिष्यांना उपदेश करीत. त्यातील बारकावे पाहून स्वामींच्या अध्यापकीय कौशल्याची कल्पना करता येते. एका कवितेत स्वामी सांगतात.
 
 
अचूक शुद्ध ल्याहावें। वाचावें नीटनेटकें ।
साकल्य अर्थ सांगावा। यथातथ्य प्रचितीने॥
बोलावे न्यायनीतीने। मर्यादा राखणे जनीं ।
अभ्यास करावा आधी। ताळबंद पाठांतरें ॥
 
 
शिष्याचे लेखन अचूक आणि शुद्ध तर पाहिजेच, पण त्याने समजून- उमजून ग्रंथवाचन केले पाहिजे. जे वाचले त्याचा साकल्याने अर्थ दुसर्‍यांना सांगता आला पाहिजे. यासाठी शिष्याच्या ठिकाणी सतत अभ्यासाची सवय असावी लागते, हे उघड आहे. बोलताना काय न्याय्य आहे, तसेच काय नैतिकदृष्ट्या योग्य आहे, याचा नीट विचार करुन मगच बोलावे केव्हाही उद्धटपणे बोलू नये. मर्यादा सांभाळून बोलले पाहिजे. जनसमुदायात बोलताना प्रसंगमानाचे भान ठेवावे लागते. प्रसंग पाहून जास्त बोलायचे की कमी बोलायचे, ते ठरवता येते.
 
 
ते काहीही असले तरी बोलताना मनात भक्तिभान असले म्हणजे बोलण्यात दोष येत नाही. शिष्यांना लोकोद्धाराच्या कामासाठी महंत म्हणून परक्या प्रांतात जाण्याचा प्रसंग येईल, तेव्हा वादविवाद आणि द्वेष, ताठा, मत्सर हे अवगुण त्याने कटाक्षाने टाळले पाहिजेत, असा स्वामींचा आग्रह असे. कारण, महंताला त्या परप्रांतात ओळखी वाढवून लोकांना रामोपासनेला लावायचे होते. शिष्याला परदेशी पाठवताना समर्थ कसा उपदेश करीत, याचे सुंदर वर्णन गिरिधरस्वामींनी केलेले आहे.
 
 
गिरिधरस्वामी समर्थांचे शिष्य असून काही दिवस ते समर्थांच्या संगतीत राहिलेले होते. शिष्याला महंताचे प्रशिक्षण दिल्यावर त्याची योग्यता पाहून स्वामी त्याला संप्रदायाच्या कामासाठी दूरदेशी पाठवून देत. त्यावेळी समर्थ शिष्याला कसा उपदेश करीत, याचे स्वानुभवावरुन गिरिधरस्वामी वर्णन करुन ठेवले आहे. गिरिधरस्वामींनी लिहिलेल्या स्फूट काव्यातील काही महत्त्वाचा भाग पुढे दिला आहे. शिष्याला परदेशी पाठवताना समर्थ त्याला ‘दासबोध’ ग्रंथाची प्रत देत, कोणता उपदेश करीत तो गिरिधरस्वामींच्या शब्दांत त्यांच्या पुढील कवितेत पाहायला मिळतो-
 
निरोपिती कोठे वाद घालू नको।
भक्ति सोडू नको राघवाची॥
सोडू नको ग्रंथ उपासना दीक्षा।
सर्वकाळ भिक्षा सोडू नको॥
पाहिजे तो आपुला आचार रक्षिला।
वेद स्तंभाळिला पाहिजे तो॥
वर्तावे तां सुखस्वरुप असावे।
चंचळाच्या नावे शून्याकार॥
ग्रंथामध्ये बरा पाहुनि विवेक।
वर्तावे सम्यक लोकांमध्ये ॥
परदेशात लोकोद्धारासाठी पाठवलेल्या महंताने कसे राहावे, कसे वागावे यासंबंधीची चर्चा पुढील लेखात यथावकाश केली जाईल.
- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@