बुडत्याला काडीचा आधार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2020
Total Views |

Pak_1  H x W: 0
 
‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) ही जगप्रसिद्ध स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना क्रिकेटविश्वात आता काही आंतरराष्ट्रीय सामन्यांनादेखील सुरुवात होत आहे. आपण नेहमी खेळणार्‍या मैदानांवरच ‘आयपीएल’सारखी क्रिकेटची भव्य जत्रा भरली. मात्र, आपल्याला येथे काही खेळता न आल्यामुळे पाकिस्तानने अखेर आपल्या देशात झिम्बॉब्वेविरुद्ध मालिकेचे आयोजन केले. “आयपीएल’मध्ये प्रवेश नाही मिळाला म्हणून काय झाले, आम्ही काही क्रिकेट खेळू शकत नाही का?’ हे भारताला दाखविण्यासाठी पाकिस्तानने आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तेदेखील पूर्णपणे अपयशी ठरले. जगभरातील अनेक देशांनी पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देत ‘आयपीएल’मध्येच आपल्या खेळाडूंना क्रिकेट खेळण्यास पाठविले. मात्र, ज्या देशातील खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा काही देशांनी पाकसोबत क्रिकेट खेळण्याची तयारी दाखवली. परंतु, आम्ही पाकिस्तानमध्ये नाही तर ‘संयुक्त अरब अमिराती’मध्येच (युएई) खेळणार असल्याची अट अनेक देशांनी पाकसमोर ठेवली. आधीच ‘आयपीएल’ सामन्यांचे आयोजन केलेले असल्यामुळे ‘युएई’ने मालिकांचे आयोजन करण्यास पाकला नकार दिला. जवळपास दोन महिने उलटले तरी इच्छा असूनही पाकिस्तानला कोणत्याही देशासोबत सामने खेळता आले नाही. भारताने एक तर आम्हाला ‘आयपीएल’पासून लांब ठेवले. इतकेच नव्हे, तर ‘आयपीएल’चा कालावधी लांबवत आम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासूनही दूर ठेवले. भारताचे हे वागणे झोंबल्यानेच अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी आगपाखड करत ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद’ (आयसीसी) आपल्याविरोधात अन्याय करत असल्याची ओरड सुरू केली होती. मात्र, ‘आयपीएल’ स्पर्धा अंतिम टप्प्यात असताना झिम्बॉब्वेने पाकिस्तानमध्ये खेळण्याची तयारी दाखवल्याने बुडत्या पाकिस्तानला काडीचा आधार मिळाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘आयसीसी’ने बंदी घातल्यानंतर क्रिकेटच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणार्‍या झिम्बॉब्वेने अखेर पाकमध्ये खेळण्याची तयारी दर्शवली. पाकिस्तानप्रमाणे झिम्बॉब्वेकडेही कुठलाच दुसरा पर्याय शिल्लक उरला नसल्याने त्यांनी धोका का होईना, मात्र तो पत्करत क्रिकेट खेळण्याची तयारी दाखविली. झिम्बॉब्वेने जरी खेळण्याची तयारी दर्शविली असली तरी यातून देशाला आर्थिक फायदा किती मिळेल, हे येणारा काळच ठरवेल.
हेच खरे राजपूत!
 
 
आपल्या देशामध्ये येऊन क्रिकेट खेळण्यास झिम्बाब्वेने तयारी दर्शविल्यानंतर पाकिस्ताने ‘आम्हीही काही उपाशी नाहीत,’ हे जगाला दाखविण्याचा प्रयत्न केला. ‘भारताने राजकारण केले म्हणून काय झाले, आम्ही आमच्या बळावर क्रिकेट नक्कीच खेळू शकतो,’ असे दावे पाकिस्तानच्या खेळाडूंनी जगासमोर ठोकण्यास सुरुवात केली. मात्र, हे सर्व घडत असतानाच माजी भारतीय क्रिकेटपटू आणि जगप्रख्यात प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे लालचंद राजपूत यांनी एक स्तुत्य निर्णय घेत पाकिस्तानचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले. “कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणे शक्य नाही, दहशतवाद पोसल्या जाणार्‍या या देशात क्रिकेट खेळणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखे आहे. परदेशांतील खेळाडूंसह प्रशिक्षकांच्याही जीवाचीही येथे कुठलीच शाश्वती नाही. त्यामुळे झिम्बॉब्वे संघाचा प्रशिक्षक जरी असलो तरी मी, पाकिस्तानमध्ये जाणार नाही,” असे राजपूत यांनी जाहीर केल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची बोलतीच बंद झाली. मुख्य प्रशिक्षकच दौर्‍यावर येणार नसतील, तर खेळाडूंना मार्गदर्शन कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर झिम्बॉब्वेचे क्रिकेट मंडळही गोंधळले. मात्र, मालिकेसाठी करार केल्यानंतर आर्थिक भुर्दंडाशिवाय पर्याय नसल्याने झिम्बॉब्वेने गोलंदाजीचेच प्रशिक्षक मुख्य प्रशिक्षक असतील, अशी घोषणा करत या दौर्‍यासाठी होकार दिला. लालचंद यांचा पाकिस्तान दौर्‍यावर बहिष्कार घालणे, हेदेखील एक राजकारणच असल्याची बोंबाबोंब पाकिस्तानने केली. मात्र, यानंतर काही नेटिझन्सनी पाकिस्तानला ज्या शब्दांत फैलावर घेतले, त्या बाबीही फार महत्त्वाच्या आहेत. 2007 साली ‘विश्वचषक’ सामन्यातून पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर भारताने तत्कालीन पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक आणि इंग्लडचे माजी क्रिकेटपटू बॉब वूल्मर यांचे झालेले रहस्यमय निधन याची उत्तरे आजही जगाला मिळालेली नसल्याची आठवण नेटिझन्सनी पाकिस्तानच्या खेळाडूंना करून दिली. इतकेच नव्हे, तर 2011 साली पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर झालेल्या हल्ल्याबाबतही प्रश्नांची सरबत्ती करत, पाकिस्तानी खेळाडूंना नेटिझन्सनी जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर, सर्वांचेच तोंड गप्प झाले. सुरक्षेच्या कारणात्सव लालचंद राजपूत यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचे मत नेटिझन्ससह अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले.
 
 
- रामचंद्र नाईक
 
 
@@AUTHORINFO_V1@@