परदेशी पशुपक्ष्यांचा व्यापार मोकाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019   
Total Views |




एखादा परदेशी जीव आपल्याकडील स्थानिक जैवसाखळीचा भाग झाल्यास तो ती उद्ध्वस्त करून तिचे अनुवांशिक चक्र बिघडविण्याचे काम करतो
. त्यामुळे परदेशी प्राण्यांच्या खरेदी-विक्रीपासून त्यांना पाळण्यासंदर्भात कायद्याची चौकट निर्माण होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 


गेल्या वर्षभरात परदेशी (एक्झॉटिक) पशुपक्ष्यांच्या जप्तीची काही गंभीर प्रकरणे उघडकीस आली आहेत. ‘महसूल गुप्तचर संचलनालयाने जून महिन्यात मुंबईतून २५० हून अधिक परदेशी पशुपक्ष्यांना ताब्यात घेतले होते. यामध्ये मादागास्कर येथील दुर्मीळ असा ‘व्हाईट-ब्लॅक रुफेड लेमूर’ आणि सल्फर-क्रेस्टेड कॉकटाटोस, आफ्रिकन व बर्मीज पोपट, गलाह काकाटाटोस यासारख्या काही परदेशी पोपटांच्या प्रजातींचा समावेश होता. याशिवाय मे महिन्यामध्ये गोरेगावच्या आरे वसाहतीत आफ्रिकन कुळाचा ‘बॉल पायथन’ मृतावस्थेत आढळून आला होता. ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ अंतर्गत भारतीय वन्यजीवांना संरक्षण देण्यात आले आहे. त्यांची शिकार आणि तस्करी करण्यावर कायदेशीर बंदी आहे. मात्र, परदेशी जीवांना पाळण्यापासून त्यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर सद्यस्थितीत देशात कोणत्याही प्रकारचे कायदेशीर बंधन नाही. जगभरात होणार्‍या परदेशी वन्यजीवांच्या तस्करी व व्यापाराने धोक्याच्या पातळीचे टोक गाठले आहे. त्याला आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन कनव्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर्ड स्पिसीज ऑफ वाईल्ड फौना अ‍ॅण्ड फ्लोरा’ (सायटिस) अंतर्गत संरक्षित वन्यजीवांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या वन्यप्राण्यांच्या जागतिक तस्करीवर बंदी आहे. भारतातील पाणमांजरांच्या दोन प्रजाती आणि स्टार कासवांचा नुकताच या यादीत समावेश करण्यात आला आहे. प्राणी पाळण्याच्या आवडीचे बळी बहुतांश वेळा परदेशी पशु आणि खासकरून पक्षी ठरतात. या जीवांना खरेदी केल्यानंतर त्यांना पाळणे मुश्किल झाल्यास त्यांची जवळपासच्या हरितपट्ट्यात सुटका केली जाते. आरेमध्ये आढळलेला ‘बॉल पायथन’ याचे एक उदाहरण आहे. मात्र, अशाप्रकारे बाहेरच्या पर्यावरणातील वन्यजीव आपल्या पर्यावरणात सोडणे, हे आपल्या स्थानिक जैवविविधतेशी खेळण्यासारखेच आहे. कारण, एखादा परदेशी जीव आपल्याकडील स्थानिक जैवसाखळीचा भाग झाल्यास तो ती उद्ध्वस्त करून तिचे अनुवांशिक चक्र बिघडविण्याचे काम करतो. त्यामुळे परदेशी प्राण्यांच्या खरेदी-विक्रीपासून त्यांना पाळण्यासंदर्भात कायद्याची चौकट निर्माण होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


बंदी नको
, नियंत्रण महत्त्वाचे


परदेशी पशुपक्ष्यांच्या खरेदी-व्रिकी किंवा त्यांना पाळण्यावर पूर्णत: बंदी आणणे शक्य नाही आणि तसे करूदेखील नये. कारण, एखाद्या वन्यजीवाच्या तस्करीवर जेव्हा पूर्णत: बंदी येते, त्यावेळी त्याची गुप्तमार्गे तस्करी होण्यास सुरुवात होते, जे त्यांच्या अस्तित्वाला अधिक हानिकारक ठरते. त्यामुळे परदेशी जीवांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. याकरिता वनविभागानेच एक पाऊल पुढे टाकत कायद्याची चौकट करावी. सर्वप्रथम पशुपक्षी पाळण्याकरिता परवानगी मिळविणे सक्तीचे करणे गरजेचे आहे, तरच देशांतर्गत होणार्‍या परदेशी जीवांच्या खरेदीची नेमकी आकडेवारी समोर येईल. परदेशी प्राण्यांच्या खरेदी किमतीवरही काही बंधने निर्माण करावीत. खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर कर किंवा त्या रकमेचा काही भाग वनविभागाला देणे बंधनकारक केल्यास परदेशी जीवांच्या अवाजवी खरेदी किमतीला आळा बसेल. शिवाय या माध्यमातून वनविभागालाही उत्पन्न मिळेल. याशिवाय पाळत असलेल्या प्राण्याचे आरोग्य प्रमाणपत्रही विभागाकडे सादर करण्याचा नियम करावा. जेणेकरून, परदेशी प्राण्यांमार्फत देशी जीवांना होणार्‍या रोगांच्या संक्रमणाबाबत वेळीच पाऊल उचलता येईल. महत्त्वाचे म्हणजे, अशा परदेशी जीवांची सुटका करण्याबाबतही काही नियमांची आखणी करावी. यामध्ये पालकाला परदेशी जीव पाळणे कठीण झाले असल्यास त्यास वनविभागाकडे सुपूर्द करणे सक्तीचे करावे. यासाठी विभागानेदेखील परदेशी जीवांकरिता निवारा केंद्र उभारून त्यांचे व्यवस्थापन प्राणीप्रेमी संस्थांकडे द्यावे. कारण, आजही विभागाकडे परदेशी प्राण्यांची तस्करी पकडल्यानंतर त्यांना ठेवण्यास कोणतेही केंद्र उपलब्ध नाही. ‘स्थानिक पोलीस’, ‘वनविभाग’, ‘महसूल गुप्तचर संचालनालय’ आणि ‘केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग’ या चारही विभागांद्वारे परदेशी प्राण्यांसंदर्भात केल्या जाणार्‍या कारवाईंना संलग्नित केल्यास तस्करांच्या साखळीबाबत महत्त्वाची माहिती समोर येईल. परदेशी प्राण्यांची अवैध मार्गाने खरेदी-विक्री करणार्‍या लोकांची एक साखळीच देशात अस्तित्वात आहे. त्यामुळे या तस्करांची साखळी उद्ध्वस्त करण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेसमोर आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@