काँग्रेस पक्ष किती लोकशाहीवादी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आणि मुक्त राजकीय विचारधारेला समर्पित वगैरे आहे, याचे गोडवे त्याच पक्षाचे भाट मंडळी नित्यनेमाने गात असतात. पण, ज्या क्षणी गांधी परिवारातील कुणाही सदस्यावर पक्षांतर्गत टीका-टिप्पणी केली जाते, तेव्हा याच काँग्रेसमधील लोकशाही, अभिव्यक्ती वगैरे क्षणार्धात श्वास सोडते. कारण, टीकाकाराला या पक्षात कदापि स्थान नाही. याचाच नुकताच प्रत्यय काँग्रेसचे माजी आमदार आणि खासदार राहिलेल्या लक्ष्मण सिंह यांच्या निलंबनाच्या आदेशातून आला.
मध्य प्रदेशातून पाचवेळा खासदार, तीनवेळा आमदार राहिलेले लक्ष्मण सिंह हे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे बंधू. पहलगाम हल्ल्यानंतरच्या एका कार्यक्रमात मृतांप्रति संवेदना व्यक्त करताना लक्ष्मण सिंह म्हणाले की, "राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हे इतके भोळे आहेत की, त्यांच्या अपरिपक्वतेचे परिणाम सारा देश भोगत आहे.” रॉबर्ट वाड्रा यांच्यावर टीका करताना सिंह म्हणाले, "मुस्लिमांना रस्त्यावर नमाज अदा करू न दिल्याने दहशतवाद्यांनी हल्ला केला, हे रॉबर्ट वाड्रा यांचे विधान केवळ बेजबाबदारपणाचेच नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे. काँग्रेसने बोलण्यापूर्वी दहावेळा विचार करावा, अन्यथा जनता निवडणुकीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.” म्हणजे, एकाअर्थाने सिंह यांनी सत्य सांगून काँग्रेसला सावध करण्याचाच प्रयत्न केला. पण, त्यांची ही वक्तव्ये काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली. इतकी की, सिंह यांच्यावर पक्षातून सहा वर्षांसाठीच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. एवढ्यावरच हा वाद थांबला नाही तर, ‘राहुल गांधी पंतप्रधान होतील, असे लिहून माफीनामा सादर करा, तुमचे निलंबनही रद्द करू’ असे त्यानंतर सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोटही सिंह यांनी केला. यावरून भाजपमध्ये हुकूमशाही, हिटलरशाही आहे, म्हणून सातत्याने टीका करणार्या काँग्रेसचा खरा चेहरा समोर यावा. म्हणा, गांधी घराण्याकडे बोट दाखवले म्हणून नेते-कार्यकर्त्यांना ‘हाता’ वेगळे करण्याचा हा काँग्रेसमधील पहिला प्रकार नाहीच. त्यामुळे काँग्रेसच्या निष्ठा गांधी घराण्याच्या चरणीच समर्पित होत्या, आहेत आणि भविष्यातही राहतील, यात तीळमात्र शंका नाही.
युवराजांची मिठाची गुळणी राहुल गांधी म्हणे पुन्हा एकदा परदेश दौर्यावर रवाना झाले. नेमके कुठे ते आता तेच जाणो! ‘कशासाठी?’ असे विचारणे तर त्याहूनही महापाप! आता राहुल गांधींचे असे अधूनमधून परदेशवार्या करणे, यात काँग्रेसला, त्यांच्या नेत्यांना यत्किंचितही गैर वाटणे नाही. पण, मोदींचे देशहितासाठीचे व्यापक परदेश दौरे मात्र काँग्रेसला सलतात. म्हणजे त्यांच्याच पक्षाचे युवराज वैयक्तिक कारणास्तव परदेशात खासगी दौरे करतात, त्यावर काँग्रेस अगदी चिडीचूप. परंतु, देशाचे पंतप्रधान परराष्ट्र संबंध, व्यापार-करार यासाठी जे दौरे करतात, त्यावर काँग्रेसींचा सडकून आक्षेप. अशी ही राष्ट्रापेक्षा ‘घराणे प्रथम’ पाळणारी काँग्रेसची कुनीती! काँग्रेसच्या कुनीतींचा पाढा कितीही वाचला तरी म्हणा कमीच! नुकतीच आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मिळालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पायाजवळ ठेवण्याचा आणि नंतर ती कचर्यातही आढळल्याचा धक्कादायक प्रकार बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी उघडकीस आला. त्यावरून लालू कसे आंबेडकरविरोधी आणि दलितद्रोही आहेत, असा भाजपने त्यांच्यावर निशाणाही साधला. आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आटापिटा करणारे ‘जन सुराज’चे प्रशांत किशोरही लालूंवर अक्षरशः तुटून पडले. पण, संविधानाचे लाल पुस्तक सदानकदा हातात मिरवणारे, मुखी संविधानाचा सातत्याने जप करणारे राहुल गांधी यांचे लालूंच्या या कृतीवर म्हणणे काय? तर काहीच नाही. राहुल गांधींची यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही की साधे ट्विट नाही. त्यामुळे आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता, लालूंनाच थेट जाब विचारणे किंवा घडल्या प्रकाराची माफी मागायला लावणे, इतपतही राहुल गांधींचे वजन नाही. खरं तर आज संविधान आणि बाबासाहेबांचा वारसा सांगणार्या काँग्रेसनेच, डॉ. आंबेडकरांचा लोकसभा निवडणुकीत एकदा नव्हे दोनदा पराभव केला होता, याचा त्यांनाच सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. त्यामुळे हाच काँग्रेस पक्ष आता लालूंनी केलेल्या आंबेडकरांच्या अपमानावरून यादव कुटुंबीयांशी फारकत घेईल, अशी अपेक्षा बाळगणेच गैर. पण, यानिमित्ताने का होईना, यादव आणि मुस्लीम मतपेढीवरच धुरा असलेल्या राजदला संविधान, आंबेडकर, दलित-पिछडे यांच्याशी काही देणेघेणे नाही, हे मात्र जनतेसमोर आले.