
सध्या जगात इराण-इस्रायल युद्धाची भीती दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसते. ते अधिक वाढले, तर ती घराघरात येणार, हेदेखील निश्चित आहे. सामान्य माणसापर्यंत आलेली या युद्धाची प्रत्यक्ष आर्थिक झळ आणि वैचारिक झळ ही त्रासदायक बाबच. तसे बघितले, तर आपला देश गेल्या ११ वर्षांत कितीतरी पटीने विकासाच्या बाबतीत प्रगती करीत आहे. मात्र, जगात जे काही अस्थिरतेचे वातावरण निर्माण होत आहे, त्यामुळे त्याची झळ आपल्या या चांगल्या कामांना बसणार नाही, याची काळजी घेणे अपरिहार्य. त्यासाठी पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयाने आपल्या एकीच्या बळातून हे सिद्ध करण्यास सज्ज असायला हवे. युद्ध लवकर थांबले, तर सामान्यांना याचा लाभ जरी नाही झाला, तरी संभाव्य महागाई आणि अन्य तत्सम परिणामांपासून सुटल्याचे समाधान तरी लाभेल. भारत-पाकिस्तानदरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी परिस्थिती निराळी होती. तो पाकच्या कुरघोडीला दिलेला सडेतोड जबाब होता. त्यासाठी संपूर्ण राष्ट्र हे सगळी सुख-दुःख आणि संभाव्य झळांची पर्वा न करता एकत्र आले होते. आता मात्र तशी परिस्थिती नाही. कारण, अन्य राष्ट्रांत सुरू असलेल्या या संघर्षाचे परिणाम जर आम्हाला आणि आमच्यासारख्या त्यात काही देणे-घेणे नसलेल्या राष्ट्रांना भोगावे लागत असतील, तर ही बाब नक्कीच गंभीर आहे. दुसरीकडे राष्ट्राराष्ट्रांत संघर्षाची प्रकरणे विविध कारणांनी समोर येत आहेत. रशिया-युक्रेनचा काही काळ आम्हाला फटका बसलाच होता. इराण-इस्रायल आणि त्यात अमेरिकेने उडी घेतल्यास होणार्या दुष्परिणामांची कल्पना केली, तर ती भयंकर अशीच आहे. यावर भारत एक सहिष्णू राष्ट्र म्हणून मार्ग काढतदेखील आहे. तरीही अवलंबित्वाचा परिणाम आम्हाला नाहक सोसावा लागणार, हेदेखील तितकेच खरे. त्यासाठी आपल्या राष्ट्राचा संयम आणि व्यूहरचना महत्त्वाची ठरणार आहे. भारतीयांना या जागतिक घडामोडींच्या झळांपासून वाचविण्याचे मोठे आव्हान आता उभे ठाकले आहे. त्याला सामोरे जाताना आपल्या देशातील ‘खोटा नॅरेटिव्ह’ पसरविणार्यांना सामान्य लोकांना वेळीच ओळखणेदेखील तितकेच गरजेचे!
युद्धही मोठे
युद्धाच्या झळा किती काळ सोसाव्या लागतात, याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. पहिल्या अणुबॉम्ब स्फोटानंतर जपानने जे भोगले ते जगजाहीर आहे आणि त्या राष्ट्राला त्यातून सावरण्यासाठी किती काळ लागला, हेदेखील कालची आणि आजची पिढी ओळखून आहे. त्यामुळे भारताने प्रारंभीपासूनच शांतता प्रस्थापित करण्याला स्व संरक्षणाला प्राधान्य दिले. जगात मात्र प्रत्येक राष्ट्राने लष्करी खर्चात प्रचंड वाढ केली असल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालात जागतिक लष्करी खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.४ टक्के इतकी वाढ झाली आहे. संरक्षण खर्च हा जागतिक सकल उत्पादनाच्या २.५ टक्के इतका झाला असून, संघर्षग्रस्त राष्ट्रांमध्ये तो ४.४ टक्के वाढला असल्याचे या अहवालातून निदर्शनास येते. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये संरक्षण खर्चात सर्वाधिक म्हणजे १७ टक्के वाढ झाली आहे. रोमानिया, पोलंड आणि जर्मनीत ती त्याखालोखाल आहे. अमेरिका हा सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश असून, तेथील संरक्षणावरील खर्च जवळपास ९९७ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे आणि हा चीनच्या तिप्पट असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि, शस्त्रनिर्मिती ही युद्धासाठीच असते, इतके आकलन असलेल्या सामान्यांना युद्धाच्या काळात ज्या प्रसंगांना आणि संकटांना सामोरे जावे लागते, ती अवस्था किंवा परिस्थितीदेखील भयावह असते, हे समजते. त्यामुळे सशस्त्राची चढाओढ करण्यात प्रतिष्ठा पणाला लावलेल्या राष्ट्रांनी मानवतेचादेखील विचार करण्याची वेळ आली आहे. युद्ध हे काही सर्व समस्यांवर चपखल उत्तर नाही, त्यामुळे आत्मरक्षणार्थ ठीक आहे. उगाच आगीचे भांडार निर्माण करायचे आणि ती आग पसरवित सुटायचे हे जे काही लोण पसरत आहे, ते कुठेतरी थांबण्याची आवश्यकता आहे.
आपले राष्ट्र अशा जीवघेण्या स्पर्धेत कधीच उतरत नाही. तथापि, आपल्याकडे वाकडी नजर ठेवणार्यांनादेखील सोडत नाही. हे नजीकच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले आहे. इराण-इस्रायल युद्ध थांबणे हाच अंतिम उपाय आहे. ते भडकत गेले, तर त्याची झळ आपल्यापर्यंत येणार नाही, यासाठी काळजी घेणे आणि सावध असणे एवढेच आपल्या हाती आहे.