'सेंकड इनिंग' समाजासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2019   
Total Views |



रवींद्र गजानन कर्वे, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या सेवाकार्यांत अग्रणी असलेले नाव. नि:स्वार्थी नि:स्पृह समाजसेवा करणारे रवींद्र कर्वे यांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख...


रवींद्र कर्वे यांना घरातल्यांच्या आग्रहास्तव अभाविपचे मुंबई येथील प्रचारकाचे काम थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला. त्याच दरम्यान 'विश्व हिंदू परिषदे'चे ज्येष्ठ कार्यकर्ते केशवराव केळकर यांनी रवींद्र यांना सांगितले की, "उद्यापासून आतासारखा वेळ तुम्हाला समाजासाठी देता येणार नाही, पण मनात उदय पावलेला समाज संवेदनशीलतेचा दिवा कधीही मालवू नका. तो कमी करा, पण मालवू नका. आयुष्यात कधी स्थिर व्हाल, तेव्हा मात्र तो दिवा मोठा करा. समाजासाठी तेव्हा पूर्णत: स्वत:ला झोकून द्या." केशवराव केळकरांचे म्हणणे रवींद्र कर्वे यांच्या आयुष्याला दिशा देऊन गेले. त्यामुळेच की काय बँकेत सीईओपदावर नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर वयाच्या ५८ व्या वर्षी रवींद्र कर्वे यांनी आरोग्य आणि शिक्षण या दोन आयामांवर काम करण्याचे निश्चित केले. 'नाना पालकर स्मृती सदन'चे ते कार्याध्यक्ष आहेत, तर अलिबाग येथे तीन, तर टिटवाळा आणि पाली परिसरात प्रत्येकी एक-एक शाळा अद्ययावत स्वरूपात उभ्या राहिल्या. केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून रवींद्र विद्यार्थ्यांना सर्वतोपरी साहाय्य करतात. यातूनच मग समाजसेवेची आणि सहयोगाची पंढरी असलेल्या 'सेवासहयोग' या स्वयंसेवी संस्थेच्या विद्यार्थी विकास योजनेचे ते प्रवर्तक म्हणून जबाबादारी सांभाळत आहेत. गेल्या आठ वर्षात शेकडो गुणवंत गरजू मुलांना साधारण सात कोटींपेक्षा जास्त आर्थिक साहाय्य त्यांनी मिळवून दिले. आर्थिक मदत मिळून अत्युच्च शिक्षण प्राप्त केलेले आणि आयुष्यात स्थिर झालेले विद्यार्थीही पुढे दाता म्हणून रवींद्र कर्वे यांच्या सेवाकार्यात सहभागी होतात.

 

समाजकार्यासाठी निधी उभा करणे, ही साधी गोष्ट मुळीच नसते. पण रवींद्र यांच्या परिसकार्याने हे शक्य झाले हे नक्की. रवींद्र हे कसे करू शकतात? यावर त्यांचे म्हणणे आहे, आई आणि भाऊ अरविंद यांच्यामुळे. मोठा भाऊ अरविंद हा प्रत्येक प्रसंगात सकारात्मकपणे खंबीर असायचा. आई तर म्हणायची कष्ट करत राहा, पान उलटतेच. त्यामुळे प्रतिकूलतेमध्येही आपले ध्येय न सोडता परिस्थिती बदलेल हा आशावाद कायम ठेवत प्रयत्न करत राहायचे हे घरचे संस्कार समाजजीवनात उपयोगी पडले. तसेच रा. स्व. संघ आणि अभाविप तर माझ्या आयुष्याचे दीपस्तंभ आहेत, असे ते म्हणतात. मूळ आक्षी-नागावचे कर्वे कुटुंब. गजानन कर्वे आणि शारदा कर्वे दाम्पत्याला सहा मुली आणि तीन मुले. त्यापैकी एक रवींद्र. घरची सांपत्तिक स्थिती अत्यंत उत्तम. समाजात सर्वच स्तरांत उच्चतेची संधी असतानाही कर्वे यांच्या घरात अस्पृश्यता, जातिभेद यांना थारा नव्हता. गजानन यांच्या शब्दाला समाजात मान होता. त्यांनी अनेकांचे जीवन सावरले होते. मात्र, रवींद्र पाच वर्षांचे असताना कर्करोगाने त्यांचे निधन झाले. कर्वे कुटुंबाची परिस्थिती १८० अंशांतून पालटली. आर्थिक स्थिती खालावली. शारदा कर्वे आपल्या नऊ मुलांना घेऊन जगण्यासाठी ठाण्याला आल्या. अत्यंत कष्टाने जिद्दीने शारदा यांनी मुलांना चांगले वळण लावले. त्यावेळी मोठा मुलगा अरविंद हा नुकताच सीबीआयमध्ये नोकरीला लागला होता. आईने आणि त्याने मिळून घराची वाताहत होऊ दिली नाही.

 

याच काळात आठवीला असताना रवींद्र चुलत बहिणीकडे महाडला शिक्षणासाठी गेले. बहिणीचे सासर संघाशी संबंधित. महाडचे डोंगरे घराणे संघ कार्यकर्त्यांचे हक्काचे घर. या घरात राहायला गेल्यावर रवींद्र संघाशी जोडले गेले. याच घरात गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, मोरोपंत पिंगळे यांचे येणे-जाणे असे. त्यांच्या सहवासाने रवींद्र यांना समाज आणि देश याबाबातच्या कर्तव्याची जाणीव स्पष्ट होत गेली. पुढे नाना पालकरांचे बौद्धिक ऐकून मनात सामाजिक बांधिलकी पक्की झाली. अकरावीपर्यंत तिथे शिकल्यानंतर रवींद्र घरी हातभार लागावा म्हणून नोकरी करण्याकरिता ठाण्याला आले. तिथे रेल्वेमध्ये खलाशाची नोकरी करू लागले. अकरावी उत्तीर्ण झालेला मुलगा परिस्थितीमुळे हे काम करतो म्हणून साहेबांना रवींद्रबद्दल सहानुभूती असायची. पण तरीही खलाशीकाम करतानाची अंगमेहनत शब्दातीत होती. पण पुन्हा चुलत बहिणीने रवींद्र यांना पुढील शिक्षणाबद्दल विचारले. रवींद्र पुन्हा महाडला केशवराव डोंगरेच्या घरी गेले. तेथून अभाविपचे कार्यकर्ते झाले. पुढे अभाविपच्या यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे यांच्यासोबत काम करताना विद्यार्थी आणि त्यांच्या समस्यांबाबतचे अणुरेणूगत असलेले पैलूही रवींद्र यांना अभ्यासता आले. याच काळात आणीबाणीमध्ये सत्याग्रह केला म्हणून त्यांनी १८ दिवसांची सजाही भोगली. हे दिवस तसे ध्येयाने मंतरलेले. या मंतरलेल्या दिवसांची धडाडी मात्र आजही रवींद्र यांच्यामध्ये कायम आहे. गुणी गरजू विद्यार्थी घडावा म्हणून रवींद्र तनमनधनाने कार्य करतात. ते म्हणतात, "आयुष्यात यशस्वी झालेल्या ज्येष्ठांनी 'सेंकड इनिंग'मध्ये समाजाच्या विकासाचे प्रवर्तक होऊन काम करायला हवे. जबाबदाऱ्यांमुळे माझी 'पहिली इनिंग' स्वत:साठी, घरच्यांसाठी होती. पण आता 'सेकंड इनिंग' समाजासाठी आहे." आयुष्याची 'सेकंड इनिंग' इतक्या दैवत्वाने जगणाऱ्या रवींद्र कर्वे हे ज्येष्ठांसाठी दिशादर्शकच आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@