'समतोल दीपोत्सव'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019
Total Views |


 


कल्याण (रवींद्र औटी) : घरातून विविध कारणांनी पळून आलेली, स्वप्न हरवून बसलेली, रेल्वेस्थानकावर भीक मागून, कचरा गोळा करून, बूटपॉलिश करून अंध:कारमय जीवन कंठणार्‍या या निष्पाप कळ्यांना त्यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करणार्‍या 'समतोल फाऊंडेशन' या संस्थेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'दीपोत्सव' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कल्याणजवळील मामनोली येथे कार्तिक पौर्णिमनिमित्त या मुलांच्या आयुष्यातही आशेचा एक दीप पेटवून त्यांनादेखील दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन होते. यावेळी ठाणे जिल्हा बाल न्यायालयाचे अध्यक्ष डॉ. सावंत, सुप्रसिद्ध समुपदेशक लाड सर, पोलीस निरीक्षक पाटील, हिंदू सेवा संघाचे उपाध्यक्ष वाणी अण्णा आणि 'समतोल'चे अध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्ष जाधव यांनी प्रास्तविकात 'समतोल'चे कार्य विशद केले व सर्व अतिथींचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला.

 

यासमयी लाड यांनी 'मी आणि माझी स्वप्ने' या विषयावर मुलांना प्रभावी शैलीत मार्गदर्शन केले. ठाणे जिल्हा वनवासी भागातील अंदाजे 350 हून अधिक शालेय गरजू विद्यार्थ्यांना 'समतोल'तर्फे सत्कार करून त्यांना वह्या वाटप केले. कार्यक्रमात रंगत आणली ती 'त्रिनेत्र फाऊंडेशन'च्या सर्व अंध गायक_-वादक वाद्यवृंद कलाकारांनी! आपल्या अंधत्वाच शल्य कवटाळून न बसता तिमिरातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची ऊर्जा या कलाकारांनी, हिंदी-मराठी दर्जेदारगाणी सादर करून उपस्थितांना अक्षरशः नाचायला लावले. अंध कलाकारांच्या या सुरेल मैफिलीच्या मध्यंतरात 'समतोल'ची ही चिमुकली पाखरं, प्रमुख अतिथी आणि विद्यार्थी यांच्या हस्ते रांगोळी भोवती आणि परिसरात सुमारे एक हजार पणत्या लावून, समाजातील भेदांच्या भिंती छेदून एक समान, समतोलचा भव्य दीपोत्सव साजरा केला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रबद्ध नियोजनात 'समतोल'च्या कार्यकर्त्यांसोबतच पोदार कॉलेजची वीसहून अधिक युवायुवतींची फौज एक मिशन म्हणून उल्लेखनीय काम करीत होती.
@@AUTHORINFO_V1@@