प्रेरक रामायण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2019
Total Views |



एकनाथांचा काळ हा समर्थांच्या अगोदरचा होता. स्वराज्याची पहाट अजून उजाडायची होती. तरीही एकनाथ महाराजांच्या मनात अनेक सामाजिक परिवर्तनाचे व राजकीय स्वातंत्र्याचे विचार होते. परकीय जुलमी सत्तेच्या काळात ते उघडपणे मांडणे अत्यंत कठीण होते. याची एकनाथांना कल्पना होती. रामदासांचा काळ हा नंतरचा आहे. त्यांनी त्यांच्या कल्पना व विचार स्पष्टपणे मांडून हिंदू संस्कृती रक्षण व त्यासाठी हिंदवी स्वराज्याला मदत करून रामराज्य आणणे हे आपले ध्येय निश्चित केले. असे असले तरी समर्थांनासुद्धा अनेक प्रसंगी आपल्या कार्याची, योजनांची गुप्तता ठेवावी लागली.

 

. स. १६४६ साली शिवरायांनी स्वराज्याचे तोरण उभारल्यावर आपले विचार मांडण्याचे चित्र सर्व क्षेत्रात तयार झाले. परंतु, प्रत्येक संताची वाङ्मयीन अभिव्यक्ती ही त्याच्या स्वभावानुसार असते. एकनाथांना सर्वजण 'शांतिब्रह्म' म्हणून ओळखतात. कुठल्याही कठीण प्रसंगी शांत राहण्याचे धोरण त्यांच्या चरित्रातून दाखवता येते. रामदासांचा स्वभाव मात्र रोखठोक असल्याने ते कुणालाही भीत नसत. त्यांचा शिष्य मुसळरामाला मसूरच्या मुसलमानांनी कपटाने मारण्याचा सुगावा लागताच समर्थ मसूरला आले आणि तेथील पठाणाला सणसणीत मुस्कटात मारून त्याचा माज उतरवला. तसेच माहुलीच्या मठातील महंत उद्धवबाबा याला बळजबरीने बाटवायला आलेल्या काझीला समर्थांनी वेताच्या छडीने चोप दिल्याची कथा आहे.

 

एकनाथांनी सविस्तर 'भावार्थ रामायण' लिहिले. त्यातील राजकारण हा त्याचा विशेष आहे. देश-काल-परिस्थितीनुसार अगदी योग्य वेळी विशिष्ट सामाजिक हेतूने ही रामकथा एकनाथांनी लोकांसमोर ठेवली. तो हेतू राष्ट्रीय स्वरूपाचा आहे असे दिसते. भोवती काय घडत आहे आणि काय घडायला पाहिजे, याची जाणीव या चतुरस्र संताला होती. त्यामुळे ध्वन्यर्थाने राजकारण त्यांच्या लिखाणात आले. ते तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार योग्य होते. रामावताराचे प्रयोजन सांगताना एकनाथांची 'भावार्थ रामायणा'त विचारपूर्वक पुढील ओवी टाकली.

 

निजधर्माचे रक्षण ।

करावया साधूंचे पाळण ।

मारावया दुष्टजन ।

रघुनंदन अवतरला ॥

 

यातील तत्त्वज्ञान भगवद्गीतेतील 'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥' (४.८) या स्वरूपाचे असले तरी स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी सज्जनांना अभय देण्यासाठी व दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत येणार हा आशावाद राष्ट्रीय ध्वन्यर्थ तेथे होता. रामायणातील या कथांची प्रेरणा घेऊन समर्थांनाही मराठीत रामायण लिहावे, असे वाटले असेल. परंतु, एकनाथांनी जसे संपूर्ण 'भावार्थ रामायण' लिहिले, तसे न करता समर्थांनी रामायणातील फक्त 'सुंदरकांड' व 'युद्धकांड' या दोनच कांडांची निवड केली. रामायणातील या कांडातही सूक्ष्मावलोकन, विस्तृत वर्णने आणि स्पष्टवक्तेपणा हे रामदासी गुण स्पष्टपणे दिसतात. ती वर्णने वीरश्रीयुक्त आणि परिणामकारक आहेत. रामायणातील सर्वांना माहीत असलेल्या पुराणकथा रामदासांनी पुन्हा का सांगायला घेतल्या, अशी शंका काही टीकाकार उपस्थित करतात. त्याचे निराकरण करून नंतर समर्थांनी लिहिलेल्या 'सुंदरकांड' व 'युद्धकांड' यांची विशेषता पाहू.

 

अनेकांचा असा समज आहे की, आजच्या परिस्थितीत रामायण, महाभारतातील कथा या कालबाह्य झाल्या आहेत. पण, तो समज चुकीचा आहे. रामायण, महाभारतातील पात्रे, त्यातील प्रेरणा कधी जुन्या होत नाहीत किंवा कालबाह्यही होत नाहीत. त्या ग्रंथांतील मनुष्यस्वभावाचे नमुने नीट अभ्यासले तर त्यातील प्रवृत्ती आजही जिवंत आहेत, नाश पावलेल्या नाहीत हे लक्षात येते. त्या कथांतील पात्रांचे आधुनिक काळातील मनुष्यस्वभावातील साम्य टिपता आले तर त्या कथा, ती पात्रे जुनी वाटत नाहीत. राम-रावणाची जोडी ही न्याय-अन्यायाची प्रतीके आहेत. तसेच ती शांत आणि गर्विष्ठतेचीही प्रतीके आहेत. श्रीकृष्ण कंसाची जोडी म्हणजे सद्गुण-दुर्गुणाची प्रतीके आहेत.

 

रामायणातील कथा लोकांना ऐकवताना लोकांची करमणूक करावी, हा हेतू रामदासांच्या मनात नव्हता. त्यांच्या मनात सतत हा विचार होता की, तत्कालीन क्षत्रियांनी समर्थकाळातील दुष्ट रावण व कंस ओळखून तसल्या दुष्प्रवृत्तींवर विजय मिळवावा आणि सर्वांना समाधान देणार्‍या रामराज्याची स्थापना करावी. परंतु, ही सांकेतिकता आमच्या टीकाकार मित्रांना समजत नाही. तथापि, ही वाङ्मयीन सांकेतिकता इंग्रजांना बरोबर समजली होती. इंग्रजांचे राज्य असताना कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी 'कीचकवध' नावाचे नाटक लिहून रंगभूमीवर आणले. वास्तविक पाहता त्या नाटकातील कथानक, त्यातील पात्रे, प्रसंग सारे महाभारतकालीन होते, पौराणिक होते.

 

तरीही इंग्रजांनी 'कीचकवध' नाटकावर बंदी आणली. कारण, त्या नाटकातील 'कीचक' म्हणजे 'लॉर्ड कर्झन' हे रुपक लोकांना माहीत होते. लोकांनी 'कीचकवृत्ती' व लॉर्ड कर्झनची वागण्याची पद्धत यातील साम्य ओळखले होते. कीचकाचा वध भीमाने केला हे नाटकात दाखवले म्हणजे लॉर्ड कर्झनचाही अंत कशा होईल, याचा लोक विचार करू लागतील. हे ओळखून इंग्रजांनी 'कीचकवध' नाटकावर बंदी आणली. हे वाङ्मयीन सांकेतिकशास्त्र इंग्रजांना कळत होते. पण, समर्थांच्या रामायणातील सांकेतिकता आजच्या टीकाकारांना समजत नाही, त्याला काय करावे?

 

ही वाङ्मयीन सांकेतिकता समर्थांनी जाणली होती. म्हणून त्यांनी रामायणातील 'सुंदरकांड' व 'युद्धकांड' मराठीतून लिहायला घेतली. या कांडांतून हनुमानाचा व श्रीरामांचा पराक्रम वर्णन केलेला आहे. राम व हनुमान ही समर्थांची आवडती दैवते होती आणि संप्रदायाची ती आराध्य दैवते आहेत. तीर्थाटन संपवून परत आल्यावर समर्थ मसूरला आले आणि तेथे त्यांनी पहिला रामनवमीचा उत्सव केला आणि मारुतीची मंदिरे स्थापन करण्याचा धडाका लावला. मुसलमानी अंमलात मूर्ती स्थापन करणे, देवळे बांधणे, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार करणे या गोष्टींना सक्त मनाई होती. त्याचप्रमाणे हिंदू देवदेवतांचे उत्सव सार्वजनिकरित्या करणे याला बंदी होती. इ. स. १६४५मध्ये मसूरला आल्यावर समर्थांनी हे निर्बंध मोडायला सुरुवात केली. हिंदू धर्म व संस्कृती रक्षणार्थ कमीत कमी विरोध होईल, असे मसूरचे क्षेत्र स्वामींनी निवडले होते.

 

कारण, तो परगणा शहाजीराजांच्या जहांगिरीतील होता. त्या प्रांतावर शहाजीराजांचा दबदबा होता. तेथील हिंदू, रामकृष्णांचे उत्सव करण्याऐवजी मुसलमानांच्या पीरांचे उत्सव करीत होते. तेथे उरूस भरवत होते. याची समर्थांना चीड होती. म्हणून मसूरला आल्यावर स्वामींनी रामजन्मोत्सवाला सुरुवात करून लोकांना स्वधर्माची, स्वाभिमानाची जाणीव करून दिली. तत्कालीन हिंदू समाजाची सर्वदृष्ट्या झालेली अवनती समर्थांनी जाणली होती. शिवकालीन प्रवृत्तींशी आणि आकांक्षांशी रामदास पूर्णपणे समरस झाले होते. तत्कालीन राजकीय परिस्थिती, जुलमी सुलतानशाही आणि रामायणकालीन असूरांचा त्रास, असुरक्षित स्त्रीजीवन ही साम्यस्थळे समर्थांनी ओळखली. त्यातून सुटण्यासाठी रामायणातील रामाचा आणि हनुमानाचा पराक्रम कसा होता, हे दाखवून समर्थकालीन परिस्थितीत त्याचा कसा उपयोग करता येईल, हे सांगण्यासाठी समर्थांनी रामायणातील 'सुंदरकाड' व 'युद्धकांड' ही दोन कांडे मराठीतून लिहिली. त्यातील वीरश्रीयुक्त व परिणामकारक वर्णने सविस्तरपणे पुढील लेखात पाहू.

 

- सुरेश जाखडी

७७३८७७८३२२

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@