प्रसंग एक
शिक्षक : अहो, हा मारतो वर्गातल्या मुलांना आणि शिक्षकांना उलट उत्तरं देतो.
पालक : इथेही? घरी पण मारामारी करत असतो. त्याची चुलत बहीण दोन वर्षांनी मोठी आहे, पण हा तिलाही मारतो.
शिक्षक : तेच ना... आता इतर पालकांच्या तक्रारीही यायला लागल्या आहेत.
पालक : तुम्हाला सांगते, परवा तर याला असा राग आला की, कप आपटून फोडले याने टेबलावर ठेवलेले.
शिक्षक : बाप रे, आत्तापासून इतका बेशिस्त वागायला लागला, तर काही खरं नाही पुढे.
पालक : हो ना... आम्ही तर अगदी हात टेकलेत याच्यापुढे. तुम्हीच काय ते करा आता.
शिक्षक : अहो, आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवणार? अशी २५-३० मुलं सांभाळायची असतात वर्गात.
पालक : ते आहे हो. पण शिस्त शाळेतच लागणार ना? वाटलं तर द्या दोन ठेऊन. घरी आमचं आजिबात ऐकत नाही हा.
शिक्षक : हं... ही आजकालची पिढी म्हणजे ना अतिस्मार्ट आहे. पालक-शिक्षकांचं काही खरं नाही.
पालक : अगदी बरोबर. आपल्या वेळी आपण पालक-शिक्षकांचं सगळं ऐकायचो. उलट बोलायची तर हिंमतच नव्हती.
शिक्षक : हो ना. हाताबाहेर गेलीये ही पिढी...
(तात्पर्य: हतबल पालक, हतबल शिक्षक आणि गोंधळलेलं मूल)
प्रसंग दोन
शिक्षक : नमस्कार. हे पाहा, याने काल किती छान चित्र काढलं आहे. याला रंगसंगतीची छान जाण आहे.
पालक : हो. घरीही काढत असतो चित्र. आम्हाला आज शाळेत बोलावण्याचं काही विशेष कारण?
शिक्षक : हो. कारण म्हणजे आम्हाला जरा याची काळजी वाटली.
पालक : का? काय झालं?
शिक्षक : काही दिवसांपासून हा इतर मुलांना मारायला लागला आहे. राग आला की, खूप तीव्र प्रतिक्रिया देतो.
पालक : इथेही करतो का असं? घरी पण राग आला की मारामारी, तोडफोड करायला लागला आहे इतक्यात.
शिक्षक : तुमच्या घरात वेगळं काही घडलंय का एवढ्यात? मुलांना काही वेळा बदलांना योग्य प्रतिक्रिया देता येत नाहीत.
पालक : हो. त्याला चुलत भाऊ झाला मागच्या महिन्यात. तोपर्यंत आमच्या एकत्र कुटुंबात हाच सगळ्यात लहान होता.
शिक्षक : अच्छा... आता सगळं घर बाळाभोवती असतं, असंच ना?
पालक : हो. पण आम्ही याला आधी पूर्ण कल्पना दिली होती. तो तर इतका उत्साहात होता, बाळ येणार म्हणून.
शिक्षक : हं... पण मुलांच्या भावनांची काहीवेळा सरमिसळ होते आणि मग त्यांना ते हाताळता येत नाही.
पालक : शक्य आहे. आता काय करूया आपण?
शिक्षक : त्याच्या वर्तनामागच्या कारणाचा अंदाज आला ते बरं झालं. आता आपण उपायांकडे वळूया...
(तात्पर्य: समाधानी पालक, समाधानी शिक्षक आणि आनंदी मूल)
सर्वसाधारण पालक-शिक्षक मिटिंगमधले हे दोन प्रसंग. दोन्ही प्रसंगात चर्चा ही मुलाच्या खटकणाऱ्या वर्तनांबद्दलच झाली. दोन्हीकडे खरेतर पालक व शिक्षक काही मुद्द्यांवर सहमतही झाले. पण, तरीदेखील पहिला प्रसंग अधिक समस्यांसह पुन्हापुन्हा घडण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरा प्रसंग समस्येच्या निराकारणाचे मार्ग शोधणारा आहे. यातून समस्येवर उपाय मिळेल आणि पालक-शिक्षकांमधले संबंधही दृढ होतील. ही टीम छान जमली की, मुलाची वाढ जास्त सकारात्मक होईल यात शंका नाही.
आफ्रिकन भाषेतील एक म्हण आहे, ‘इट टेक्स अ व्हिलेज टू रेझ अ चाईल्ड.’ मूल वाढवण्यासाठी संपूर्ण समाजाचा हातभार आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम’ याच्याशी साधर्म्य सांगणारी ही म्हण किती योग्य आहे ना? मागे वळून बघताना आपल्या आयुष्यावर ज्यांचा दूरगामी प्रभाव आहे अशा एक-दोन शिक्षकांची नावे तरी आपल्याला आठवतातच. त्यामुळे ‘शाळा’ नावाच्या समाजव्यवस्थेचे मुलांच्या आयुष्यातील स्थान खूप मोठे आहे. शाळा ही केवळ व्यावसायिक सेवा पुरवणारी फॅक्टरी असून चालणारच नाही. मुलांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक ऊर्जेला दिशा देण्याचे काम करण्यासाठी पालक आणि शाळेमध्ये सहकार्य हवे. मुलांच्या सक्षम वाढीसाठी शाळेकडून पुरवल्या जाणाऱ्या भौतिक सुविधांपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आवश्यक आहे, ते शाळा आणि पालकांमधले ‘सुजाण नाते.’
गुंजन कुलकर्णी
(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
7775092277
gunjan.mhc@gmail.com