अमेरिकेत गदर; भारतात कधी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018   
Total Views |



भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फक्त एकच परिवार आणि त्या परिवाराचा पक्ष सहभागी असल्याचे विशिष्ट लोकांकडून नेहमीच कानीकपाळी ओरडून ओरडून सांगितले जाते. पण ते तसे नव्हते, तर सर्वच भारतीयांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्षाचा पवित्रा घेतलाच होता. अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, लाला हरदयाळ, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु आणि असंख्य असंख्य क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी आपल्या आयुष्याचा होम केला. पण, काँग्रेस आणि त्या पक्षाच्या मालकांनी, मालकांच्या नोकरांनी नेहमीच भारतीयांच्या मनावर स्वतःचीच महती बिंबवताना इतर सर्वांचीच नावे पुसण्याचा, त्यांचे योगदान अन बलिदान नाकारण्याचाच करंटेपणा केला. ६०-७० वर्षे देशांवर राज्य केलेल्यांनी ब्रिटिशांविरोधात तन-मन-धन अर्पून रस्त्यावर उतरलेल्या भारतमातेच्या कितीतीरी सुपुत्रांचा उल्लेखही होऊ दिला नाही, अन् झालाच तर केवळ एक उतारा, अर्धे पान वा एक पान एवढाच! भारतीय स्वातंत्र्यालढ्यात सहभाग घेतलेल्या क्रांतिकारकांचा उल्लेख टाळण्याचा कृतघ्नपणा काँग्रेस, त्यांच्या पाळलेल्या, नेमलेल्या इतिहासकार, इतिहास अभ्यासकांनी केला असला तरी सर्वसामान्य जनतेला मात्र या लोकांचा खरा चेहरा आता समजला आहे. पण, आजची गोष्ट भारतातली नव्हे, तर अमेरिकेतली आहे आणि त्याचा संबंध भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी आहे.

 

अमेरिकेच्या शाळांशाळांमध्ये भारताच्या इतिहासाशी संबंधित काही भाग शिकवला जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. अमेरिकेतील अस्टोरिया शहरात झालेल्या एका कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेत राहून प्रयत्न करणाऱ्या गदर पार्टीचा इतिहास आता इथल्या शाळांमध्ये शिकवला जाईल. गदर पार्टीच्या स्थापनेला १०५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने ओरेगन राज्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. आपण सर्वच शाळेत असताना इतिहासाचा अभ्यास केला, पण त्यात आपल्याला गदर पार्टीबद्दल एखाद्या उताऱ्याव्यतिरिक्त अधिक काही माहिती मिळालीच नाही. तर इथे गदर पार्टीच्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम करण्याची गोष्ट खूपच दूरची, मात्र अमेरिकेत हे होत आहे. गदर पार्टी ही अशी संघटना होती, ज्यांनी भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. विशेष म्हणजे, गदर पार्टीने ब्रिटिश साम्राज्याविरोधात सशस्त्र संघर्षांचा एल्गार पुकारला होता. २१ एप्रिल १९१३ रोजी कॅनडा आणि अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी लाला हरदयाळ यांच्या नेतृत्वात गदर पार्टीची स्थापना केली होती. सरदार सोहन सिंह भाकना गदर पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते, तर पार्टीचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे होते. गदर पार्टीच्या स्थापनेवेळीच ‘गदर’ नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशित करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता, ज्याची जबाबदारी करतार सिंह सराभा यांच्याकडे देण्यात आली होती. ‘गदर’ वृत्तपत्रात नेहमीच देशभक्तीचा सळसळता उत्साह, जोश जागवणाऱ्या कविता प्रकाशित केल्या जात असत, ज्याचा लोकांवर मोठा प्रभाव पडत असे. विशेष म्हणजे, गदर पार्टीच्या स्थापनेमागे लाला हरदयाळ यांची प्रेरणा आणि संकल्पना होती. लाला हरदयाळ अमेरिकेला गेले व त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांना ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकत्र करण्याचे काम सुरु केले आणि गदर पार्टीची स्थापना केली.

 

पुढे गदर पार्टीने ब्रिटिशांविरोधात देशात विद्रोह करण्यासाठी २१ फेब्रुवारी १९१५ हा दिवस मुक्रर केला होता. पण, मुखबिर किरपाल सिंह या गद्दार इसमाने ब्रिटिशांना याची माहिती दिल्याने ब्रिटीशांनी हा उठाव मोडून काढण्याची तयारी सुरु केली. क्रांतिकारकांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी विद्रोहाची तारीख पुढे ढकलत १९ फेब्रुवारी केली, पण त्याचीही माहिती ब्रिटिशांना मिळाली. दोन वेळा विद्रोहाची माहिती ब्रिटिशांना कोणातरी फितुपराने दिल्याने गदर पार्टीची योजना फसली व ब्रिटिश सरकारनेही गदर पार्टीच्या कार्यकर्ते, क्रांतिकारकांच्याविरोधात कारवाईही सुरु केली. गदर पार्टीबद्दलची ही माहिती काहींना असेल, तर काहींना नसेलही पण गदर पार्टीचा फक्त एवढाच इतिहास नाही. आता हाच इतिहास भारतात जरी शिकवत नसले तरी अमेरिकेत मात्र शिकवला जाणार आहे, ही समाधानाची, आनंदाची की आणखी कसली गोष्ट म्हणायची, हा प्रश्न मात्र पडतोच.

@@AUTHORINFO_V1@@