रोहिंग्यांचा फुटीरतावाद - भाग १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018   
Total Views |



१८८६ ते १९४८ दरम्यान चित्तगावमधील मुस्लिम शेतमजूर मोठ्या प्रमाणात रखिनमध्ये स्थलांतरित झाले. जपानने म्यानमारवर आक्रमण केले तेव्हा स्थानिक बौद्ध जपानच्या बाजूने व रोहिंग्या मुस्लिम ब्रिटिशांच्या बाजूने उभे राहिले. परिणामतः बौद्ध - मुस्लिम दंगे उसळले. ब्रिटिशांनी त्यांच्या गनिमी सेनेत - व्ही फोर्समध्ये जपानी सैन्यावर अचानक हल्ला करून कत्तल करण्यासाठी रोहिंग्या मुस्लिमांची भरती केली. ब्रिटिशांविरुद्धच्या रखिन बौद्धांच्या स्वातंत्र्यलढ्यात रोहिंग्या मुस्लिम ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. रोहिंग्या मुस्लिमांच्या ह्या एकनिष्ठतेला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिटिशांनी उत्तर अराकन भाग 'राष्ट्रीय मुस्लिम प्रदेश' करू अशी घोषणा केली. दुसऱ्या महायुद्धानंतर चित्तगावमधून झालेले स्थलांतर व १९४२ ला भारतात गेलेले हजारो निर्वासित आता दक्षिण रखिनमधून उत्तर रखिनमध्ये परतू लागले त्यामुळे मुस्लिम लोकसंख्या पुष्कळ वाढली. काही मुस्लिम म्यानमारपासून फुटून कलादन व मायु नदीच्या दरम्यान स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र स्थापिण्याची किंवा पाकिस्तानात सामील होण्याची स्वप्न पाहू लागले. मे १९४६ ला त्यांनी उत्तर अराकनचा भविष्यातील पाकिस्तानात (पूर्व पाकिस्तानात) समावेश करण्याची मागणी मोहम्मद अली जिनांकडे केली व त्यासाठी काही चित्तगाव व अराकन मुस्लिमांनी जुलै १९४६ला 'उत्तर अराकन मुस्लिम लीग'ची स्थापना केली होती. परंतू जिना नंतर पाकिस्तानला त्रासदायक होईल म्हणून म्यानमार शासनाला डिवचण्यास तयार नव्हते व त्यानुसार त्यांनी जनरल आँग सान ह्यांना शाश्वती दिली की ते फुटीरत्यावाद्यांना पाठिंबा देणार नाहीत. काही दशकांपासून किंवा शतकांपासून शांतताप्रिय बौद्धांसोबत राहणारे मुस्लिम बौद्धांच्याऐवजी ब्रिटिशांशी एकनिष्ठ का होते ?

जपान विरुद्धच्या मुस्लिमांच्या ब्रिटिश एकनिष्ठतेचा मोबदला म्हणून त्यांना ब्रिटिशांनी १९४५ ला अधिकारपद दिली होती पण म्यानमार स्वातंत्र्यानंतर त्यांना डच्चू देऊन त्याजागी बौद्धांची नेमणूक करण्यात आली. मागील काही वर्षात दक्षिण अराकनमध्ये राहणाऱ्या बौद्ध निर्वासितांचे त्यांना त्यांच्याच गावातून व घरातून हाकलून दिलेल्या गावातच व घरातच त्यांचे पुर्नवसन करण्यात आले व ज्या मुस्लिमांनी बौद्धांच्या जमिनी बळकावलेल्या होत्या त्या त्यांना परत करून त्यांना हकलून दिले. ह्या बौद्ध गावकऱ्यांना परत दक्षिण भागात पिटाळण्यासाठी त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला, त्यांना पिण्याचे पाणी व अन्नपुरवठा नाकारण्यात आला व इतर अनेक प्रकारे छळ करण्यात आला. एप्रिल १९४८ मध्ये मुल्लांनी 'अराकन श्रद्धाहीनां' विरुद्ध जिहाद घोषित केला व थोड्या वेळातच बरेचसे मुजाहिदीन माँग बाजार येथे जमा झाले व त्यांनी उत्तर अराकनचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला. त्यांना पांगवण्यासाठी पाठवण्यात आलेली शस्त्र सज्ज सैनिकांची नाव पेटवून देण्यात आली व काही पोलिसांचा खून करण्यात आला.


सगळ्या अराकन किंवा रोहिंग्या मुस्लिमांचा ह्या मुजाहिदीन बंडाला पाठिंबा नसला तरी आधीच मुस्लिमांच्या एप्रिल १९४७ च्या माँगडाँव सभेत ठरल्याप्रमाणे त्यांना म्यानमारपासून स्वतंत्र नसला तरी बौद्धबहुल रखिन राज्यापासून वेगळा विशेष मुस्लिम प्रदेश 'सीमवर्ती राज्य' म्हणून हवा होता.

जून १९५१ मध्ये अलेथांग्यॅव गावात 'अखिल अराकन मुस्लिम परिषद' भरली. त्यात 'अराकनी मुस्लिमांच्या घटनात्मक मागण्यांची सनद' प्रकाशित करण्यात आली. 'अराकनमधील दोन प्रमुख वांशिक- मुस्लिम व माघस (अराकनीज)- ह्यांच्यात सत्तेचा समतोल राखावा' असे नमूद केले. “उत्तर अराकन हे स्वतंत्र मुस्लिम राज्य त्वरित स्थापन करून शान राज्य, कारेन राज्य, चिन राज्य व काचिन राज्यांप्रमाणे त्यांस बर्मा संघराज्याचे समान घटक सदस्य करून सैन्य, पोलिस व सुरक्षादले संघराज्याच्या जनरल कमांडच्या आधिपत्याखाली असावीत.” अशी मागणी सनदेत करण्यात आली. (Department of the Defence Service Archives, Rangoon: DR 1016/10/13).४ काही रोहिंग्या वेगळ्या व स्वतंत्र मुस्लिम राज्यासाठी लढत होते तर काही रखिन राज्यातील रोहिंग्या मुस्लिमबहुल प्रदेशाच्या स्वायत्ततेची मागणी करत होते. रोहिंग्या मुस्लिमांना त्यांची ओळख जपून ठेवायची असेल तर ते त्यांची ओळख म्यानमार नागरिकांमध्ये मिसळूनसुद्धा जपू शकतात, (बर तेव्हा त्यांना नागरिकत्वाचे अधिकार होते व राजकीय प्रतिनिधीत्वही होते.) त्यासाठी स्वायत्त दर्जा किंवा स्वतंत्र राज्याची गरजच काय? कसली भीती होती त्यांना? का व कशासाठी हा फुटीरतावाद, अलगतावाद, पृथकपणा ?

संदर्भ:


१. Edi- Singh, Nagendra Kr & Khan, Abdul Mabud. Encyclopaedia of the World Muslims: Tribes, Castes and Communities, Volume 1, Global Vision Pub, 2001, Page 65-66


२. उपरोक्त, पृष्ठ ६५-६६


३. Christie, Clive J., A Modern History of Southeast Asia: Decolonization, Nationalism and Separatism, I.B. Tauris Pub, 2000, पृष्ठ १६८


४. Ahmad, Syed Neaz. BURMESE MUSLIMS: Stateless at home & no refuge elsewhere!, The Milli Gazette, 7 January 2015


- अक्षय जोग
@@AUTHORINFO_V1@@