मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Muhammad Yunus Resignation) बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा चांगलीच उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसतायत. सरकार आणि लष्कर यांच्यातील बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या तणावामुळे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येतेय. बांगलादेशातील एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मोहम्मद युनूस यांना बांगलादेशात प्रभावीपणे काम करणे दिवसेंदिवस कठीण होत असून या कारणास्तव ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत.
नॅशनल सिटीझन पार्टी (एनसीपी) चे संयोजक नाहिद इस्लाम यांनी गुरुवारी संध्याकाळी मोहम्मद युनूस यांची भेट घेतली. मोहम्मद युनूस यांच्या मते त्यांना राजकीय पक्षांसोबत काम करणे त्यांच्यासाठी कठीण होत चालले आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी देखील युनूस यांना कडक इशारा देत डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचा अल्टिमेटम दिला होता.
बांगलादेशातील अंतरिम सरकारला राजकीय पक्षांकडून पुरेसा न मिळणारा पाठींबा, पक्षीय संघर्ष आणि परस्पर मतभेदांमुळे सरकारच्या निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी न होणे, तसेच बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषतः हिंदूंवरील वाढते हल्ले, बांगलादेश लष्कर आणि अंतरिम सरकारमधील वाढते मतभेद, बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी निवडणुका घेण्याबाबत दिलेला अल्टीमेटम अशा काही कारणांमुळे मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची शक्यता वाढली आहे.